महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था ‘अमृत’ यांच्या वतीने २५ व २६ जुलै रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘अमृतपेठ’ थेट बाजारपेठेला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था ‘अमृत’ यांच्या वतीने २५ व २६ जुलै रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘अमृतपेठ’ थेट बाजारपेठेला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्थानिक व स्वदेशी उद्योजकांना थेट ग्राहकांशी जोडण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या दोन दिवसीय उपक्रमात २५ उद्योजकांनी आपल्या दर्जेदार, स्वदेशी आणि स्थानिक उत्पादनांचे आकर्षक स्टॉल उभारले होते. ग्राहकांच्या भरघोस प्रतिसादामुळे या बाजारपेठेत सुमारे पाच ते सहा लाख रुपयांची विक्रमी उलाढाल झाली असून, उपक्रमाला मोठे यश मिळाले.
या अमृतपेठेचे वैशिष्ट्य म्हणजे सहभागी प्रत्येक उद्योजक हा स्वदेशी उत्पादनांचा प्रचार व विक्री करणारा होता. भारतीय बनावटीच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनांना ग्राहकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने 'वोकल फॉर लोकल' आणि स्वदेशीचा संकल्प अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
अमृतपेठेच्या पहिल्या दिवशी झालेल्या उद्घाटन समारंभास साईलीला फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती रश्मी उपाध्याय, पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. नंदिनी किरण भावे तसेच उत्कर्ष समिती गोरेगाव अध्यक्ष श्री. सन्मान गावकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी उद्योजकांना प्रोत्साहन देत अशा उपक्रमांची समाजाला, स्थानिक अर्थव्यवस्थेला आणि स्वदेशी उद्योगांना मोठी गरज असल्याचे मत व्यक्त केले.
दुसऱ्या दिवशी जयप्रकाश नगर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह श्री. उदयजी फणसळकर तसेच ज्येष्ठ सिने-नाट्य कलाकार श्री. विजय निकम यांनी अमृतपेठेला भेट देऊन सहभागी उद्योजकांचे कौतुक केले व त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी शुभेच्छा दिल्या.
अमृतपेठेच्या निमित्ताने प्रत्येक सहभागी उद्योजकाला भारतमातेची आकर्षक तस्वीर भेटस्वरूपात प्रदान करण्यात आली. स्वदेशी उद्योग, राष्ट्रभक्ती आणि भारतीय संस्कृती यांचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला.
याच दिवशी गोरेगाव येथे ‘अपराजित योद्धा- श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे’ यांच्या पराक्रम, नेतृत्व आणि राष्ट्रनिष्ठ कार्याचा परिचय करून देणाऱ्या विशेष माहितीपर पोस्टरचे अनावरण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी थोरल्या बाजीराव पेशवे यांच्या अद्वितीय लष्करी नेतृत्वाची माहिती जाणून घेत त्यांच्या कार्याला अभिवादन केले. इतिहासाबरोबरच राष्ट्रप्रेम आणि स्वाभिमान जागविण्याचा हा उपक्रमही विशेष आकर्षण ठरला.
ग्राहकांसाठी आयोजित करण्यात आलेली ‘लकी ड्रॉ कूपन’ योजना हे अमृतपेठेचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले. दररोज तीन भाग्यवान ग्राहकांची निवड करून त्यांना ₹२००, ₹३०० आणि ₹५०० मूल्याची कूपने देण्यात आली. विशेष म्हणजे ही कूपने रोख स्वरूपात न देता सहभागी २५ स्टॉलधारकांकडूनच खरेदी करण्यासाठी वापरता येतील, अशी अभिनव संकल्पना राबविण्यात आली. त्यामुळे ग्राहकांसोबतच सहभागी उद्योजकांनाही थेट आर्थिक लाभ मिळाला आणि स्थानिक विक्रेत्यांच्या विक्रीला अधिक चालना मिळाली.
या यशस्वी उपक्रमासाठी राज्यस्तरीय व्यवस्थापक श्री. दीपकजी जोशी, विभागीय व्यवस्थापक श्री. मंगेशजी खाडीलकर तसेच श्री. अमितजी सामंत यांनी दूरध्वनीद्वारे मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. तसेच कोकण विभागातील सर्व सहकाऱ्यांनी नियोजन, व्यवस्थापन आणि अंमलबजावणीत मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. शैलेशजी मराठे, श्री. अमित आठवले, सौ. माया खेत्रे यांच्यासह सर्व सहकारी, सहभागी उद्योजक, ग्राहक आणि स्वयंसेवकांचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.
स्थानिक आणि स्वदेशी उद्योजकांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या उत्पादनांना ग्राहकांपर्यंत थेट पोहोचविणे, भारतीय उत्पादनांबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि स्वावलंबी उद्योजकतेला बळ देणे हा ‘अमृतपेठ’ या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. मुंबईतील या उपक्रमाला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे भविष्यात राज्यातील विविध शहरांमध्ये अधिक व्यापक स्वरूपात अशा स्वदेशी बाजारपेठांचे आयोजन करण्यात येईल.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment