अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथे मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांच्या पुढाकाराने आयोजित जनआरोग्य व कॅन्सर जनजागृती शिबिरात आशा सेविकांना अमृत संस्थेच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथे मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला यांच्या अंतर्गत मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर तसेच कॅन्सर जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करणे, कॅन्सरसारख्या गंभीर आजाराविषयी प्रतिबंधात्मक उपाययोजना व योग्य माहिती पोहोचविणे, यासोबतच अमृत संस्थेच्या विविध स्वयंरोजगार, कौशल्य विकास व प्रशिक्षण योजनांची माहिती गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली. महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या माध्यमातून युवक-युवती, महिला तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी आशा सेविकांना या योजनांची माहिती देण्यात आली. आरोग्य जनजागृतीसोबतच रोजगार व कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
या शिबिरात एकूण ४२ आशा सेविका, ८ प्राथमिक आरोग्य केंद्रांतील (PHC) वैद्यकीय कर्मचारी तसेच आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वैद्यकीय समन्वयक सुनील रामदास सुरतणे, जिल्हा समन्वयक (महात्मा फुले जनआरोग्य योजना) शीतल गावंडे, कॅन्सर तज्ज्ञ डॉ. अमितकुमार बगाडिया तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणाली गोपनारायण आणि डॉ. काजल काळे यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी अमृत संस्थेचे अकोला जिल्हा व्यवस्थापक धनंजय कुलकर्णी यांनी उपस्थित आशा सेविकांना महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या विविध स्वयंरोजगार, कौशल्य विकास व प्रशिक्षण योजनांची सविस्तर माहिती दिली. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवक-युवती, महिला व इच्छुक लाभार्थ्यांपर्यंत या योजनांची माहिती पोहोचवून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी आशा सेविकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आरोग्य जनजागृतीबरोबरच स्वयंरोजगाराच्या संधींबाबतही माहिती मिळाल्याने उपस्थित आशा सेविकांनी समाधान व्यक्त केले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment