अमृत संस्थेच्या कर्ज व्याजपरतावा योजनेतून युवा उद्योजकाला नवे बळ

इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात शिवम व्यास यांची भरारी

अमृत संस्थेच्या कर्ज व्याजपरतावा योजनेतून युवा उद्योजकाला नवे बळ  मुख्य फोटो
अमृत संस्थेच्या कर्ज व्याजपरतावा योजनेतून युवा उद्योजकाला नवे बळ  अतिरिक्त फोटो

अकोला : महाराष्ट्र शासनाच्या अमृत या स्वायत्त संस्थेमार्फत राबवण्यात येणारी वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजना स्वयंरोजगार करणाऱ्यांसाठी, तसेच लघुउद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या योजनेचा लाभ अकोला येथील शिवम व्यास यांनी घेतला असून, ते इव्हेंट मॅनेजमेंट या व्यवसायात कार्यरत आहेत.

शिवम व्यास यांनी स्वतःचा इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसाय अधिक विस्तारण्यासाठी वैयक्तिक कर्ज घेतले होते; मात्र कर्जावरील व्याजाचा आर्थिक भार जास्त होता. त्याच वेळी अमृत संस्थेच्या वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेबद्दलची माहिती त्यांना मिळाली आणि ती योजना त्यांच्या दृष्टीने दिलासादायक ठरली.

या योजनेअंतर्गत शिवम व्यास यांना कर्जावरील व्याजाचा परतावा मिळाल्यामुळे त्यांच्या व्यवसायाला आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले. साउंड सिस्टीम, डेकोरेशन साहित्य, लायटिंग, तसेच इतर आवश्यक साधनसामग्री खरेदी करण्यास त्यांना मदत झाली. त्यामुळे त्यांच्या इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसायात गुणवत्तावाढ होऊन अधिक कामे मिळू लागली. आतापर्यंत त्यांना एक लाख ३१ हजार ७०१ रुपये एवढा व्याजपरतावा मिळाला आहे.

या संपूर्ण प्रक्रियेत अमृत संस्थेच्या अकोला कार्यालयाने शिवम व्यास यांना वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य केले. 'अर्ज भरण्यापासून ते कागदपत्रांची पूर्तता आणि योजनेचा लाभ मिळेपर्यंत अमृत कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका बजावली,' असे व्यास यांनी आवर्जून नमूद केले.

अमृत संस्थेच्या या योजनेमुळे शिवम व्यास यांचा व्यवसाय अधिक सक्षम झाला असून, शासनाच्या योजना योग्य मार्गदर्शनाने घेतल्यास त्या किती लाभदायक ठरू शकतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे. अशा योजनांचा लाभ अधिकाधिक युवक व उद्योजकांनी घेऊन स्वयंरोजगाराच्या दिशेने पावले टाकावीत, असे आवाहन अमृत संस्थेने केले आहे.

संपर्क : अकोला कार्यालय (अमृत) 91122 27636
......
तुम्हीही घेऊ शकता या योजनेचा लाभ; कशी आहे योजना?
वैयक्तिक व्याजपरतावा योजना ही विशेषतः व्यावसायिक कर्ज घेतलेल्या उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे. योग्य कागदपत्रे सादर करून आणि वेळेत अर्ज केल्यास या योजनेचा लाभ सहज मिळू शकतो. लक्ष्यित गटातील जातींमधील व्यावसायिकांनी वैयक्तिक व्यवसायासाठी १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतले असेल, तर त्याचा १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा दोन वर्षांपर्यंत अमृत संस्थेतर्फे दिला जातो. यासाठी लाभार्थ्यांनी कर्जफेड नियमितपणे करणे बंधनकारक असून, व्याजासह कर्जाचे हप्ते नियमितपणे भरल्यास दर तीन महिन्यांनी त्या कालावधीतील व्याजाची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा होते. याचाच अर्थ असा, की दोन वर्षांच्या कालावधीतील कर्ज व्याजमुक्त होते. त्यामुळे बचत झालेली रक्कम व्यवसायाच्या वृद्धीसाठी वापरणे व्यावसायिकांना शक्य होऊ शकते.

अमृत संस्थेच्या या आणि अन्य योजनांच्या अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: Dhananjay Kulkarni News publisher name | Date: 26-12-2025 News publication date | Time: 04:11 PM News publication time | Views: 238 Number of times this news has been viewed | District: akola Related district of the news
Publisher: Dhananjay Kulkarni News publisher name | Date: 26-12-2025 News publication date | Time: 04:11 PM News publication time | Views: 238 Number of times this news has been viewed | District: akola Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words