कौशल्याधारित, आधुनिक, रोजगारक्षम प्रशिक्षणांच्या माध्यमातून सक्षमतेकडे वाटचालीसाठी साह्य
आजच्या स्पर्धात्मक आणि बदलत्या युगात केवळ नोकरीवर अवलंबून राहून प्रत्येकाचे जीवनस्वप्न पूर्ण होईलच असे नाही. स्वतःची ओळख, आर्थिक स्वातंत्र्य आणि समाजासाठी सकारात्मक योगदान करण्याची संधी उद्यमी/उद्योजक बनल्यावरच खऱ्या अर्थाने मिळते. उद्यमशीलतेमुळे व्यक्तीला स्वतःचे निर्णय स्वतः घेता येतात, कल्पकता वापरता येते आणि मेहनतीचे योग्य फळ मिळते. व्यवसाय करताना जोखीम असते. परंतु त्यातूनच अनुभव, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित होतात. अपयश हे यशाकडे नेणारे पाऊल ठरते, हे उद्योजकता शिकवते.
उद्योजक केवळ स्वतःचा विकास करत नाही, तर इतरांना रोजगार देतो, स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत करतो आणि समाजाच्या गरजांनुसार नवे उपाय निर्माण करतो. त्यामुळे उद्यमशीलता ही वैयक्तिक यशाबरोबरच सामाजिक प्रगतीचेही साधन ठरते. थोडक्यात, स्वप्नांना वास्तवात उतरवायचे असेल, आत्मनिर्भर व्हायचे असेल आणि समाजात वेगळी ओळख निर्माण करायची असेल तर उद्योजक बनणे हाच खरा मार्ग आहे. मेहनत, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर उद्योजकीय जीवन नक्कीच यशस्वी होते.
या पार्श्वभूमीवर तरुणांमध्ये उद्योजकता वाढवण्यासाठी अमृत ही शासनाची स्वायत्त संस्था कार्यरत आहे. आजच्या बदलत्या आर्थिक, सामाजिक आणि तांत्रिक युगात तरुणांसमोर बेरोजगारी, दिशाहीनता, व्यसनाधीनता आणि कौशल्यांचा अभाव अशा अनेक समस्या उभ्या आहेत. शिक्षण पूर्ण करूनही नोकरीच्या संधी मर्यादित असल्याने अनेक तरुण निराशेच्या गर्तेत अडकत आहेत. अशा परिस्थितीत अमृत ही संस्था तरुणांसाठी एक आशेचा किरण ठरत आहे.
अमृत संस्थेने सध्याच्या गरजांनुसार कौशल्याधारित प्रशिक्षणावर भर दिला आहे. ड्रोन पायलट प्रशिक्षण, सोलर इन्स्टॉलेशन, बेकरी, ब्युटी पार्लर, फॅशन डिझायनिंग, डिजिटल कौशल्ये, उद्योजकता विकास कार्यक्रम (EDP) यांसारख्या आधुनिक व रोजगारक्षम प्रशिक्षणांमुळे तरुणांना केवळ नोकरीसाठी नव्हे, तर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सक्षम केले जात आहे. हे प्रशिक्षण ग्रामीण व शहरी भागातील तरुणांना समान संधी देणारे ठरत आहे.
अमृत संस्थेची खासियत म्हणजे 'प्रशिक्षण ते रोजगार/स्वयंरोजगार' हा संपूर्ण प्रवास मार्गदर्शनासह पूर्ण करून देणे. शासनाच्या विविध योजना, बँक कर्ज, PMEGP, CSR सहकार्य, मार्केटिंग मार्गदर्शन आणि मेंटॉरशिप या माध्यमातून प्रशिक्षणानंतरही तरुणांचा हात सोडला जात नाही. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि आर्थिक स्वावलंबन साध्य होते.
सध्याच्या स्थितीत तरुणांमध्ये सकारात्मक ऊर्जा, आत्मनिर्भरतेची भावना आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द निर्माण करणे अत्यावश्यक आहे. अमृत संस्था केवळ कौशल्य प्रशिक्षणच नव्हे, तर मूल्यशिक्षण, शिस्त, नेतृत्वगुणही देते आणि सामाजिक बांधिलकीही जोपासते. त्यामुळे अमृत संस्थेचा प्रभाव वैयक्तिक प्रगतीपुरता मर्यादित न राहता कुटुंब, गाव आणि समाजाच्या विकासापर्यंत पोहोचतो.
एकूणच, आजच्या कठीण काळात अमृत संस्था तरुणांसाठी खऱ्या अर्थाने तारणहार ठरत आहे. रोजगार, स्वयंरोजगार आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल करताना अमृत संस्था तरुणांना दिशा, संधी आणि आत्मविश्वास देत आहे. हीच अमृत संस्थेची खरी ओळख आहे.
........
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment