परभणीतील लाभार्थ्याला अमृत संस्थेकडून आतापर्यंत मिळाला ६५,६८० रुपयांचा व्याजपरतावा
परभणी : व्यवसायवाढीसाठी कर्ज हा चांगला पर्याय असला, तरी त्याची परतफेड काही वेळा अवघड होऊ शकते. अशा वेळी कर्जावरचे व्याज माफ झाले तर? व्यावसायिकांना नक्कीच मोठा दिलासा मिळू शकतो. ही कल्पना नव्हे, तर वास्तव आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेली अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था व्यावसायिकांसाठी कर्ज व्याजपरतावा योजना राबवत असून, त्याचा लाभ अनेकांना मिळत आहे. परभणी शहरातील अजय हमदापूरकर हेदेखील या योजनेचे लाभार्थी आहेत. त्यांच्याविषयी जाणून घेऊ या.
हमदापूरकर कृषी सेवा केंद्र चालवतात. त्यांनी व्यवसायवाढीसाठी १३ लाख रुपये कर्ज घेतले आहे. त्यानंतर अमृत संस्थेच्या वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी या योजनेसाठी अर्ज केला होता. सर्व निकषांत बसत असल्यामुळे त्यांचा अर्ज मंजूर झाला आणि त्यांना कर्जावरील व्याजाचा परतावा मिळायला सुरुवात झाली. आतापर्यंत अमृत संस्थेकडून व्याजपरताव्याच्या रूपाने त्यांना ६५ हजार ६८० रुपये मिळाले आहेत. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
व्यवसाय उभारणे व तो वाढवण्याकरिता भांडवलाची गरज असते. त्यासाठी अनेक व्यावसायिक कर्ज काढतात. परंतु काही कारणाने व्यवसायात चढ-उतार झाले, तर त्यात कर्ज हा बोजा ठरतो. अशा वेळी महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेची वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजना गरजू व्यावसायिकांसाठी मोठा आधार ठरत आहे.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
तुम्हीही घेऊ शकता या योजनेचा लाभ; कशी आहे योजना?
वैयक्तिक व्याजपरतावा योजना ही विशेषतः व्यावसायिक कर्ज घेतलेल्या उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे. योग्य कागदपत्रे सादर करून आणि वेळेत अर्ज केल्यास या योजनेचा लाभ सहज मिळू शकतो. लक्ष्यित गटातील जातींमधील व्यावसायिकांनी वैयक्तिक व्यवसायासाठी १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतले असेल, तर त्याचा १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा दोन वर्षांपर्यंत अमृत संस्थेतर्फे दिला जातो. यासाठी लाभार्थ्यांनी कर्जफेड नियमितपणे करणे बंधनकारक असून, व्याजासह कर्जाचे हप्ते नियमितपणे भरल्यास दर तीन महिन्यांनी त्या कालावधीतील व्याजाची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा होते. याचाच अर्थ असा, की दोन वर्षांच्या कालावधीतील कर्ज व्याजमुक्त होते. त्यामुळे बचत झालेली रक्कम व्यवसायाच्या वृद्धीसाठी वापरणे व्यावसायिकांना शक्य होऊ शकते.
अमृत संस्थेच्या या आणि अन्य योजनांच्या अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संपर्कासाठी पत्ता
अमृत परभणी जिल्हा कार्यालय,
जुनी प्रशासकीय इमारत,
पहिला मजला,
बीएसएनएल ऑफिसच्या बाजूला,
परभणी.
मोबाइल : 7391065473
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment