वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील वर्धमानेरी येथील सौ. भारती खिवराज भुतडा यांनी आटा चक्की व्यवसायासाठी घेतलेल्या वैयक्तिक कर्जावर महाराष्ट्र संशोधन उन्नती प्रशिक्षण प्रबोधनी (अमृत) यांच्या व्याज परतावा योजनेअंतर्गत आतापर्यंत ₹59 हजारांचा व्याज परतावा प्राप्त केला आहे.
आर्वी (जि. वर्धा) : महाराष्ट्र संशोधन उन्नती प्रशिक्षण प्रबोधनी (अमृत) यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक कर्जावरील व्याज परतावा योजनेचा लाभ वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील वर्धमानेरी येथील सौ. भारती खिवराज भुतडा यांना मोठ्या प्रमाणात झाला आहे. आटा चक्की व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या वैयक्तिक कर्जावर अमृतच्या माध्यमातून त्यांना आतापर्यंत ₹५९,००० इतका व्याज परतावा प्राप्त झाला आहे.
या योजनेमुळे कर्जावरील व्याजाचा आर्थिक भार मोठ्या प्रमाणात कमी झाला असून त्यांच्या व्यवसायाला नवी उभारी मिळाली आहे. सध्या त्यांचा आटा चक्की व्यवसाय नियमित, सुरळीत व यशस्वीपणे सुरू असून त्यातून त्यांना स्थिर उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला उद्योजकांसाठी अमृतची व्याज परतावा योजना आर्थिकदृष्ट्या मोठा आधार ठरत असल्याचे या उदाहरणातून स्पष्ट होत आहे.
यावेळी अमृतच्या प्रतिनिधींनी लाभार्थीच्या व्यवसायाला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. पाहणीदरम्यान आटा चक्कीचा व्यवसाय योग्यरित्या सुरू असल्याची खात्री करण्यात आली. तसेच, अमृतच्या व्याज परतावा योजनेचा लाभ व्यवसायाच्या प्रगतीसाठी प्रभावीपणे उपयोगात येत असल्याचेही निदर्शनास आले.
याप्रसंगी सौ. भारती खिवराज भुतडा यांनी महाराष्ट्र संशोधन उन्नती प्रशिक्षण प्रबोधनी (अमृत) संस्थेचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. तसेच अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी, विभागीय व्यवस्थापक देवदत्त पंडित व प्रवीण कोळेश्वर यांचे विशेष आभार मानले.
तसेच अमृत जिल्हा व्यवस्थापक, वर्धा ऋषिकेश खराटे यांनी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल, सहकार्याबद्दल व लाभार्थ्यांसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल त्यांनी विशेष कृतज्ञता व्यक्त केली.
याशिवाय, या योजनेची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवून अर्ज प्रक्रियेपासून लाभ मिळेपर्यंत आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य केल्याबद्दल अमृत जिल्हा उपव्यवस्थापक, वर्धा धीरज राठी यांचेही त्यांनी विशेष आभार मानले. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच या योजनेचा लाभ सहजपणे मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
अमृतच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला, युवक आणि लघुउद्योजकांना विविध शासकीय व आर्थिक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत असून, अशा योजनांमुळे अनेक कुटुंबे स्वावलंबनाकडे वाटचाल करत आहेत. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी अमृतच्या विविध योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय उभारावा व आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. अधिक माहितीसाठी संपर्क : अमृत वर्धा जिल्हा कार्यालय प्रशासकीय भवन, तळमजला, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, सिव्हिल लाईन, वर्धा. मोबाईल : 9112227632 अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना शासकीय संस्था, आयोग किंवा महामंडळ यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविते. या लक्ष्यित गटामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार आदी समाजांचा समावेश आहे. वार्षिक उत्पन्न ₹8 लाखांपेक्षा कमी असलेल्या पात्र व्यक्तींना अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेता येतो. अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृतच्या अधिकृत संकेतस्थळ व सोशल मीडिया हँडल्सवरूनही योजनांची सविस्तर माहिती मिळू शकते.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment