महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक परंपरेचे प्रतीक असलेल्या आषाढी वारी २०२६ ला आजपासून उत्साहात प्रारंभ झाला आहे. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज (७ जुलै) श्रीक्षेत्र देहू येथून पंढरपूरच्या दिशेने भक्तिमय वातावरणात भव्य प्रस्थान झाले असून, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे उद्या (८ जुलै) श्रीक्षेत्र आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.
श्रीक्षेत्र देहू येथून पहाटे काकड आरती, पालखी पूजन, धार्मिक विधी आणि पारंपरिक कार्यक्रमांनंतर संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची पालखी मार्गस्थ झाली. ही पालखी आकुर्डी, पुणे, लोणी काळभोर, यवत, वरवंड, बारामती, इंदापूर, अकलूज, बोरगाव, पिराची कुरोली आणि वाखरी मार्गे २४ जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचणार आहे. या प्रवासात बेलवडी, इंदापूर व अकलूज येथे गोल रिंगण, बोरगाव व वाखरी येथे उभे रिंगण, तसेच पिराची कुरोली येथे धावा सोहळा पार पडणार आहे. तर संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांची पालखी ८ जुलै रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. ही पालखी पुणे, सासवड, जेजुरी, वाल्हे, लोणंद, तरडगाव, फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव आणि वाखरी मार्गे २४ जुलै रोजी पंढरपूर येथे दाखल होईल. या प्रवासात लोणंद येथील नीरा स्नान, भंडीशेगाव येथील बंधूभेट आणि विविध रिंगण सोहळे हे प्रमुख आकर्षण ठरणार आहेत. पालखी सोहळ्यानिमित्त पुणे शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. वारकऱ्यांच्या स्वागतासाठी विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि नागरिकांकडून पिण्याचे पाणी, अल्पोपहार, वैद्यकीय सेवा, विश्रांती केंद्रे आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रमुख मार्ग भगव्या पताकांनी सजले असून, ठिकठिकाणी फुलांची उधळण, स्वागत कमानी, रांगोळ्या आणि हरिनाम संकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. पालखी सोहळा सुरक्षित आणि सुरळीत पार पडावा यासाठी पुणे जिल्हा प्रशासन, पुणे महानगरपालिका, पोलीस विभाग, वाहतूक पोलीस, आरोग्य विभाग, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. पालखी मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारे देखरेख, वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका, स्वच्छता मोहीम आणि वाहतूक व्यवस्थेचे विशेष नियोजन करण्यात आले आहे. आषाढी वारी ही भक्ती, समता, सेवा, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा महाराष्ट्राचा लोकउत्सव आहे. आजपासून सुरू झालेल्या या पवित्र पालखी सोहळ्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला असून, "ज्ञानोबा-तुकाराम" च्या अखंड जयघोषात लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment