सुसंस्कार, संवाद, परंपरा आणि त्याग यांची जपणूक करून सुदृढ समाज व सक्षम राष्ट्र घडविण्याचा पाया म्हणजे भारतीय कुटुंब व्यवस्था होय.
आपल्या समाज जीवनात, राष्ट्र जीवनात आणि समाज रचनेत कुटुंब संस्थेचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे, हे सर्वजण मान्य करू लागले आहेत. आता प्रत्येकाच्या बोलण्यात आमच्या बालपणी आमच्या आई-वडिलांनी व आजी-आजोबांनी आमच्यावर कुटुंबामध्ये कशाप्रकारे संस्कार केले, आम्हाला कोणत्या सवयी लावल्या, वाईट सवयींपासून कसे दूर ठेवले, ह्या गोष्टींचे महत्त्व पटू लागले आहे. कुटुंब हे समाजाचे पहिले संस्कार केंद्र आहे. त्यामध्ये बालकाला भाषा व परंपरा शिकविल्या जातात. संस्कार म्हणजे काय? आपण जे पाहतो, ऐकतो, बोलतो, पाठ करतो, वाचन करतो, त्याचा सूक्ष्म परिणाम आपल्या मनावर होत असतो, त्याला संस्कार म्हणतात. संस्काराचे पहिले केंद्र कुटुंब होय.
आई-वडील मुलांना बोट धरून चालणे शिकवितात. त्याचबरोबर संस्कार करण्याचे कार्य करतात. आजी-आजोबा मुलांना रामायण, महाभारतातील कथा सांगून संस्काराचे कार्य करतात. कुटुंब हे व्यक्ती निर्माणाच्या प्रक्रियेचे मूळ स्थान होय. कळत नकळत संस्कार करण्याचे कार्य कुटुंब करीत असते, हे आपल्याला सध्याच्या काळात अधिक जाणवते. म्हणूनच कुटुंब व्यवस्था आणि तिचे रुजविलेले संस्कार प्रत्येकाने जीवापाड जपले पाहिजेत. कुटुंबातून आपण भाषा शिकतो व वडीलधारी मंडळी जसे बोलतात ते आपण शिकत असतो. वाईट काही तोंडातून निघत असेल तर आई-वडील ते दुरुस्त करण्याचे कार्य करतात. नात्यातील मोठ्यांशी कसे बोलावे, शेजारी-मित्र परिवारासोबत कसे वागावे, कसे बोलावे, हे कुटुंबातूनच आपल्याला सांगितले जाते.
संयुक्त कुटुंब व्यवस्था हा समाजाचा मोठा आधार होता. संयुक्त कुटुंब व्यवस्थेत आपुलकी, स्नेह आणि संकटाचा सामना कसा करावा, हे आपापसातच शिकवले जात असे. सुख-दुःखात सहभागी होणे हे कार्य पिढ्यानपिढ्या एकत्र राहण्याच्या प्रक्रियेतूनच होत होते. त्यामधून आमची धार्मिक, सामाजिक व भावनिक सुरक्षितता होत होती. सतत एकत्र असल्यामुळे कुटुंबात संवाद होता, त्यातून मने जुळत असत. एखाद्या मुद्यावर मतभेद असले तरी मनभेद मात्र नक्कीच नसत. हे संयुक्त कुटुंब व्यवस्थेचीच देण आहे.
भारतीय समाजाचा मूळ आधार कुटुंब व्यवस्था होय. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये शेती, उद्योग, हस्तकला यामध्ये कुटुंबातील सदस्यांचा सक्रिय सहभाग होता. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये काहीजण उद्योग, तर काहीजण शेती करून उदरनिर्वाह करत असत. सामूहिक श्रमातून आनंद मिळायचा, काम करणे सोपे जायचे. एकत्र कुटुंबामध्ये व्यवस्थापन करणे सोपे जायचे. स्त्रियांकडे स्वयंपाक करण्याचे काम जरी होते, तरी ते वाटून घ्यायचे व अतिशय आनंदाने ते कार्य व्हायचे. कामामध्ये उदासीनता दिसत नव्हती, अगदी आनंदाने व हसत-खेळत ते कार्य व्हायचे. आजही अनेक ठिकाणी असे चित्र पहायला मिळते. आर्थिक स्थितीबरोबरच मानसिक स्थितीवर सुद्धा त्याचा परिणाम होतो.
एकत्र कुटुंब पद्धतीने आर्थिक नियोजनाबरोबरच धार्मिक व सांस्कृतिक मूल्यांची जोपासना देखील होत असे. एकत्रित उत्सव साजरे करणे, पूजा विधी करणे तसेच सामूहिक स्नेहभोजन कार्यक्रमातून आपुलकी व स्नेह वाढतो. धार्मिक कार्यक्रमातून भारतीय परंपरेचे जतन, सामूहिक स्तोत्र पठणातून भगवंताची उपासना होते. जणू सामूहिक कार्यक्रमातून एका टीम वर्कचे प्रशिक्षणच मिळते. पुढच्या पिढीत संस्कार रुजविण्याचे कार्य सामूहिकतेतून होते. म्हणूनच म्हणता येईल की कुटुंब व्यवस्थेची धार्मिक व सांस्कृतिक बाबतीत अतिशय महत्त्वाची भूमिका आहे. याचा वेळोवेळी अनुभव येत असतो. प्रत्यक्ष शब्दात सांगणे कठीण आहे, पण जे असा प्रत्यक्ष अनुभव घेतात, त्यांना मिळणारे ते समाधान शब्दा पलीकडचेच आहे, यात शंका नाही.
संसार रथाची दोन चाके आहेत - स्त्री आणि पुरुष. कुटुंब व्यवस्थेत या दोघांचीही भूमिका फार महत्त्वाची आहे. पुरुषाचे कुटुंबातील स्थान घराला आधार देणे, आर्थिक नियोजन करणे, संपूर्ण परिवाराला सुरक्षा प्रदान करणे, तर स्त्री ही संपूर्ण घरावर संस्कार करण्याचे कार्य आपल्या
कृतीतून करीत असते. स्त्रियांमध्ये सहनशीलता अधिक असते. 'जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाचा उद्धार करी', असे म्हणतात ते खरेच आहे. सावित्रीबाई फुले, मा जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, मावशी केळकर, भगिनी निवेदिता, संत मीराबाई, संत जनाबाई अशी कितीतरी उदाहरणे सांगता येतील. घराला घरपण देत असते म्हणून संस्कारमय स्त्री कुटुंब व्यवस्थेचा आत्मा आहे. अलीकडच्या काळात सिंधुताई सपकाळ यांचे कार्य आपल्यासमोर आहेच.
समाज रचनेमध्ये उद्योग, कुटुंबाचा छोटा व्यवसाय, धंदा आपल्या पूर्वजांचा वारसा आणि ज्ञान पुढील पिढीपर्यंत टिकविण्याचे कार्य कुटुंब संस्था करीत आली आहे. पुढील पिढीतील सदस्य आपल्या वडीलधाऱ्या मंडळींचा व्यवहार पाहूनच उद्योग, धंदा शिकतात व संस्कार ग्रहण करतात. आपली समाज उपयोगी परंपरा जतन करण्याचे कार्य कुटुंब व्यवस्थेने केले आहे. आपल्या कुटुंबातील सदस्य संस्कारी व्हावेत, आपल्या परंपरांचे जतन व्हावे, याची काळजी कुटुंबातील वरिष्ठ सदस्य घेत, हे आता आपल्या लक्षात येते. आपले उत्सव, सण ते किती काळजीने करीत. दसऱ्याला दाराला तोरण का लावावे हे ते सांगत, नारळच का फोडावा, हातामध्ये रक्षासूत्र का घालावे, टिकली का लावावी, बांगड्या का घालाव्यात याची उत्तरे त्यांच्याजवळ होती. तुळशी मातेच्या नमस्काराचा आग्रह आता आपल्या लक्षात येतो. त्यामागे विज्ञान आहे, तुळस २४ तास ऑक्सिजन देते. तुळशी मातेचा सहवास सर्वांना लाभदायक आहे. वर्तमानामध्ये तो मिळावा व लाभदायक व्हावा म्हणून अभियान चालवावे लागते. त्यातून जागृती करावी लागते. म्हणून आपली कुटुंब व्यवस्था जेवढी बळकट राहील तेवढा आपला समाज सुदृढ राहील, हे कुटुंब व्यवस्थेने वारंवार दाखवून दिले आहे.
आपल्या दिनचर्येमध्ये सुद्धा कुटुंब व्यवस्थेने काही गोष्टी ठरवून दिल्या आहेत व त्या सातत्याने केल्या आहेत. नमस्कार करूनच घराबाहेर जावे, घरी कधी परत येणार हे सांगावे, देवाला दिवसातून चार वेळा नमस्कार करावा, वडीलधाऱ्यांचे आज्ञापालन करावे, हे आपल्या पूर्वजांनी सातत्याने केले आहे.
आजच्या आधुनिक युगात संपर्क सुलभ, पण संवाद दुर्लभ झाला आहे. जग जवळ आले पण माणसे एकमेकांपासून दुरावलेली दिसतात. घरे मोठी, अनेक खोल्यांची, पण मन मात्र संकुचित झाले आहे. सर्व प्रकारच्या सार्वजनिक व्यवहारात क्षीण होत चाललेला सुसंवादाचा प्रवाह क्रियाशील बनविणे आवश्यक आहे. या प्रक्रियेचाही आरंभबिंदू म्हणजे कुटुंब व्यवस्थेचाच भाग आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये अधिक संवाद दिसतो. प्रत्येकाची विचारपूस, सहभोजन, एकत्र निवास, त्यामुळे मनातले त्वरित सांगणे, संकटे आली तरी सामूहिकरीत्या त्याचा सामना करणे, हे एकत्र कुटुंब व्यवस्थेत सहज शक्य होत असे. संघर्षाची वेळ आली तर सल्ला देण्याची पद्धत, त्यांच्या अनुभवाचा लाभ कुटुंबाला होत असे आणि त्यांच्या पुढाकाराने व त्यागने कुटुंब सुरळीत चालत असे. कुटुंब व्यवस्थेत वडीलधाऱ्यांना त्याग करणे शिकविले आहे. आपल्या समाजात अशी कितीतरी उदाहरणे आहेत. आपली वडीलधारी मंडळी
आधी कुटुंबातील सर्वांच्या गरजा पूर्ण करीत व नंतर व्यवस्था असेल तर स्वतःच्या गरजांचा विचार करीत. मुलांच्या कपड्यांवर खर्च करणारे वडील स्वतः मात्र फाटके व छिद्र पडलेले बनियान वापरताना आनेकांनी बघितले असेल. या त्यागामुळे वडीलधाऱ्या मंडळींचा आदरपूर्वक धाक कुटुंबामध्ये होता. अशी अनेक कुटुंबे मिळून समाज बनतो व यासारख्या गोष्टीमुळे समाजात एक प्रकारची न्यायव्यवस्था, समता व चारित्र्य निर्माण झालेली दृष्टोत्पत्तीस पडतात. कुटुंबामध्ये काही नियमांचे संकेत असतात, जसे ठराविक वेळेच्या आत घरात येणे, मोठ्या आवाजात न बोलणे, चोरी न करणे, इतरांना त्रास होईल अशी कुठलीही वागणूक असू नये, हे सांगायला कुटुंबच हवे. कुटुंबे ही व्यक्तींना दिशादर्शन करणारे केंद्र आहे. घरामध्ये देव, धर्म व समाज याबद्दल श्रद्धा भाव जागृत करण्याचे वातावरण कुटुंब व्यवस्थाच करीत असते. परिवारातील आपापसातील सहवासामुळे वातावरण संतोषमय राहत असते.
समाज व राष्ट्रनिर्मिती यातील कुटुंबाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. कुटुंबातून समाज तयार होतो व त्यातून सुदृढ राष्ट्र निर्मिती होते. म्हणून कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व खूप आहे. आपल्या पूर्वजांनी हे कार्य अतिशय परिश्रमपूर्वक केले आहे.
समाज व राष्ट्रनिर्मिती यातील कुटुंबाची भूमिका खूप महत्त्वाची आहे. कुटुंबातून समाज तयार होतो व त्यातून सुदृढ राष्ट्र निर्मिती होते. म्हणून कुटुंब व्यवस्थेचे महत्त्व खूप आहे. आपल्या पूर्वजांनी हे कार्य अतिशय परिश्रमपूर्वक केले आहे.
आपले संस्कार हे आपल्या कुटुंब व्यवस्थेचा कणा आहे. आपल्या संस्काराच्या गंगोत्रीचा प्रवाह अक्षुण्ण ठेवण्याचे कार्य कुटुंब व्यवस्थेने केले आहे. कुटुंब व्यवस्था भारतीय संस्कृतीचा प्राण आहे. जोपर्यंत कुटुंब व्यवस्था आहे तोवर भारतीयता, भारतीय संस्कृती, भारतीय जीवनमूल्ये चिरायू राहणार आहेत. आपले कुटुंब शक्तिमान, भक्तिमय व आनंदमय करण्याचे कार्य आपण करू व पुढे जाऊ.
- राजेंद्र उमाळे कुटुंब प्रबोधन, विदर्भ प्रांत संयोजक संदर्भ- विदर्भ हुंकार नोव्हेंबर २०२५|युगाब्द ५१२७
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment