अमृत मानसमित्र या अभिनव उपक्रमाविषयी या उपक्रमाच्या प्रशिक्षण समितीचे सदस्य आणि महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ या संस्थेचे संचालक डॉ.प्रसाद देशपांडे यांच्याशी केलेल्या चर्चेचे शब्दांकन -
आजच्या डिजिटल युगात संवादाची माध्यमे बदलली आहेत. विशेषतः तरुण पिढी प्रत्यक्ष संवादापेक्षा डिजिटल माध्यमांवर अधिक सहजपणे व्यक्त होताना दिसते. परंतु या बदलत्या जीवनशैलीसोबत मानसिक ताण, भावनिक अस्थिरता, एकटेपणा, नैराश्य, स्पर्धेचा ताण आणि स्वतःची इतरांशी तुलना करण्याची प्रवृत्तीही वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीला कोणताही पूर्वग्रह न ठेवता, कोणताही न्यायनिवाडा न करता आपले मन समजावून घेणारी व्यक्ती किंवा व्यासपीठ आवश्यक आहे. हीच गरज ओळखून ‘अमृत मानसमित्र’ हा मानसिक आरोग्य, समुपदेशन आणि सकारात्मक संवाद यांचा अभिनव उपक्रम साकारण्यात आला आहे. अमृत मानसमित्र ॲपची संकल्पना ही केवळ डिजिटल संवादापुरती मर्यादित नसून, व्यक्तीच्या भावनिक अभिव्यक्तीला सुरक्षित आणि विश्वासार्ह व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची आहे. अनेकदा एखादी व्यक्ती आपले मन मोकळे करण्याचा प्रयत्न करते; मात्र समोरून "तूच चुकीचा आहेस", "असे विचार मनात कसे येतात?" अशा प्रतिक्रिया मिळाल्यामुळे तिच्या आत्मसन्मानाला धक्का बसतो आणि ती आणखी अंतर्मुख होते. याउलट, ‘अमृत मानसमित्र’ व्यक्तीला कोणत्याही अपराधीपणाच्या भावनेशिवाय आपल्या भावना, चिंता, आनंद, दुःख, राग किंवा संभ्रम व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून देते. व्यक्त होण्याची ही प्रक्रिया मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
या उपक्रमाचा दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे ‘अमृत मानसमित्र प्रशिक्षण कार्यक्रम’. मानसिक आरोग्य क्षेत्रात संवेदनशील, प्रशिक्षित आणि समाजाभिमुख समुपदेशक तयार करण्याच्या उद्देशाने हा विशेष अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे. एम.आय.एम.एच. यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या १५ दिवसांच्या इन-हाऊस प्रशिक्षणामध्ये मानसिक आरोग्याची मूलतत्त्वे, विद्यार्थी समुपदेशन, प्रभावी संवादकौशल्य, सक्रियपणे ऐकण्याची कला, सहानुभूतीपूर्ण वर्तन, मानसशास्त्रीय संकटांमध्ये हस्तक्षेप, जीवनकौशल्ये तसेच सायको-सोशल वर्तन अशा विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे. केवळ सैद्धांतिक ज्ञान न देता प्रत्यक्ष व्यवहारात उपयोगी पडणारी कौशल्ये विकसित करण्यावर या अभ्यासक्रमात विशेष भर देण्यात आला आहे. आजच्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोरील बदलत्या मानसिक, सामाजिक आणि भावनिक आव्हानांचा अभ्यास करून हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. पौगंडावस्थेत होणारे हार्मोनल बदल, शारीरिक परिवर्तनांविषयीची उत्सुकता, आकर्षण, अभ्यासातील अनास्था, झटपट यश आणि प्रसिद्धीची अपेक्षा, स्वतःची इतरांशी सतत तुलना, अवास्तव कल्पना, स्व-विकासाचा अभाव, भावनिक अस्थिरता, वैचारिक गोंधळ तसेच शिकण्यातील अडचणी अशा अनेक समस्यांचा यात सखोल विचार करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशिक्षण घेणाऱ्या मानसमित्रांना विद्यार्थ्यांच्या मनातील गुंतागुंत अधिक संवेदनशीलपणे समजून घेता येईल आणि योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करता येईल. या प्रशिक्षणासाठी एम.ए. (सायकोलॉजी) आणि एम.एस.डब्ल्यू. या शाखांतील विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. कारण या विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य, समुपदेशन आणि सामाजिक कार्याची प्राथमिक जाण आधीपासूनच असते. प्रशिक्षणानंतर त्यांना एक महिन्याचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव दिला जाणार आहे. याशिवाय पुढील तीन ते पाच महिन्यांपर्यंत तज्ज्ञांकडून सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि पर्यवेक्षण मिळणार आहे. त्यामुळे प्रशिक्षणापासून प्रत्यक्ष कार्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर त्यांचे कौशल्य विकसित होईल आणि मानसिक आरोग्य क्षेत्रात त्यांचे सक्षम करिअर घडण्यासही मोठी मदत होईल. अमृत मानसमित्रचे अंतिम ध्येय केवळ एक ॲप विकसित करणे किंवा समुपदेशक तयार करणे इतकेच नाही. समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त कराव्यात, स्वतःचा स्वीकार करावा, मानसिक आरोग्याविषयी सकारात्मक दृष्टीकोन विकसित करावा आणि इतरांच्या भावनांबद्दलही संवेदनशील व्हावे, हा या उपक्रमाचा व्यापक उद्देश आहे. "व्यक्त झालो तरच मुक्त राहू शकतो" हा विचार या उपक्रमाच्या केंद्रस्थानी आहे. आनंद, दुःख, राग, भीती किंवा संभ्रम यांसारख्या प्रत्येक भावनेचा स्वीकार करून त्यातून सकारात्मक वाटचाल करण्यासाठी आवश्यक आधार आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हेच अमृत मानसमित्रचे वैशिष्ट्य आहे. स्वतःचे स्वत्व ओळखणे, स्वतःचा स्वीकार करणे, समाजाप्रती जबाबदारीची जाणीव निर्माण करणे आणि स्वभानासोबत समाजभान जागृत करणे, या मूल्यांवर आधारित अमृत मानसमित्र हा उपक्रम मानसिक आरोग्याविषयी जागरूक, संवेदनशील आणि सशक्त समाज निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे. - डॉ.प्रसाद देशपांडे यांनी मनोविकार शास्त्रात एम.बी.बी.एस व एम.डी. केले आहे.ते फेब्रुवारी -२०२६ पासून महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ या संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय महाविद्यालयात ते मनोविकृती शास्त्राचे प्राध्यापकही आहेत. या क्षेत्रात त्यांचा दीर्घकाळ अनुभव आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment