मराठवाड्यातील वेताळवाडीचा ‘वेताळगड’ पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरत आहे.
मराठवाड्याच्या पर्यटन नकाशावर झळकतोय वेताळवाडीचा ‘वेताळगड’.
सिल्लोड : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात वसलेला वेताळवाडी किल्ला अर्थात ‘वेताळगड’ हा मराठवाड्याचा एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक वारसा ठरत आहे. डोंगरमाथ्यावर वसलेला हा किल्ला इतिहासप्रेमी, ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र बनू शकतो.
किल्ल्यावर तटबंदीचे काही अवशेष, पाण्याच्या टाक्या आणि जुन्या बांधकामांचे अवशेष आजही पाहायला मिळतात. इतिहासाच्या अनेक खुणा जपणारा हा किल्ला सध्या दुर्लक्षित असला तरी त्याच्या पर्यटन विकासासाठी मोठी संधी उपलब्ध आहे.
वेताळगडाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला सुंदर जलाशय आणि आजूबाजूचा हिरवागार परिसर. घनदाट झाडे, झुडपे आणि डोंगररांगांमुळे येथील निसर्ग अधिकच मनमोहक बनतो. विशेषतः पावसाळा आणि हिवाळ्यात हा परिसर हिरवाईने नटलेला दिसतो आणि किल्ल्यावरून दिसणारे नयनरम्य दृश्य पर्यटकांना भुरळ घालते.
या किल्ल्यावर पोहोचण्यासाठी छत्रपती संभाजीनगरहून सोयगावमार्गे वेताळवाडी गावापर्यंत रस्ता उपलब्ध आहे. बसेसची सोय आहे. अनेक खाजगी वाहने सुद्धा येथे जाण्यासाठी उपलब्ध होतात. तसेच सिल्लोड–उंडणगाव–हळदा या मार्गेही पर्यटकांना येथे सहज पोहोचता येते. विशेष म्हणजे किल्ल्याच्या पायथ्यापासून सोयगाव तालुक्याची हद्द सुरू होते. पावसाळ्यात वेताळगड आणि त्या आसपासचा परिसर पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते.
इतिहास, निसर्ग आणि साहसी पर्यटनाचा सुंदर संगम असलेला वेताळवाडी किल्ला पर्यटनाच्या दृष्टीने विकसित झाल्यास मराठवाड्याच्या पर्यटन नकाशावर एक महत्त्वाचे ठिकाण म्हणून उदयास येऊ शकतो.
-संकलित
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment