शेतीमाल वाहतुकीसाठी वाहनाकरिता घेतले कर्ज; पहिला व्याजपरतावा ३१ हजार रुपयांचा
सिन्नर (जि. नाशिक) : शेतकऱ्यांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागते. उत्पादन घेण्यापासून माल बाजारात पोहोचवेपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यात या अडचणी असतात. तरीही ते न थकता, न कंटाळता उत्पादन घेतात आणि त्यामुळेच शेतकऱ्यांना जगाचा पोशिंदा असे म्हटले जाते. नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातल्या निमगाव येथील घनःश्याम मुळे हे असेच एक कष्टाळू शेतकरी. ते विविध भाजीपाला व फळपिकांची शेती करतात आणि दर्जेदार उत्पादन घेतात; मात्र उत्पादित शेतीमाल गावातून बाजारपेठेत घेऊन जाण्यासाठी त्यांना खूपच अडचणींना सामोरे जावे लागत असे. त्यामुळे ते काहीतरी उपाय शोधत होते.
त्यातच मुळे यांना अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या कर्ज व्याजपरतावा योजनेची माहिती मिळाली. त्यांनी आवश्यक सर्व कागदपत्रे अमृत संस्थेच्या नाशिक कार्यालयात पाठवली. त्यांचा अर्ज मंजूर झाला. त्यांनी शेतीमालाच्या वाहतुकीसाठी महिंद्रा कंपनीचे पिकअप वाहन घेण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी बँकेकडून नऊ लाख ९९ हजार रुपयांचे कर्ज घेतले. या वाहनातून त्यांनी शेतीमाल वाहतूक सुरू केली. त्यांची नियमित कर्जफेड सुरू आहे. व्याजपरतावा योजनेचा लाभ मिळाल्यामुळे त्यांना तीन महिन्यांच्या व्याजाची रक्कम ३१ हजार रुपये एवढी मंजूर झाली आहे. त्यामुळे त्यांना खूप मोठा आधार मिळाला आहे. याबद्दल त्यांनी अमृत संस्थेचे खूप आभार मानले आहे. तसेच त्यांनी अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील शेतकरी बांधवांना अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
तुम्हीही घेऊ शकता या योजनेचा लाभ; कशी आहे योजना?
वैयक्तिक व्याजपरतावा योजना ही विशेषतः व्यावसायिक कर्ज घेतलेल्या उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे. योग्य कागदपत्रे सादर करून आणि वेळेत अर्ज केल्यास या योजनेचा लाभ सहज मिळू शकतो. लक्ष्यित गटातील जातींमधील व्यावसायिकांनी वैयक्तिक व्यवसायासाठी १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतले असेल, तर त्याचा १२ टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा दोन वर्षांपर्यंत अमृत संस्थेतर्फे दिला जातो. यासाठी लाभार्थ्यांनी कर्जफेड नियमितपणे करणे बंधनकारक असून, व्याजासह कर्जाचे हप्ते नियमितपणे भरल्यास दर तीन महिन्यांनी त्या कालावधीतील व्याजाची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा होते. याचाच अर्थ असा, की दोन वर्षांच्या कालावधीतील कर्ज व्याजमुक्त होते. त्यामुळे बचत झालेली रक्कम व्यवसायाच्या वृद्धीसाठी वापरणे व्यावसायिकांना शक्य होऊ शकते.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment