अमृतच्या आयात-निर्यात प्रशिक्षणाला लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; तज्ज्ञ मार्गदर्शनातून शंकांचे निरसन
अमृततर्फे आयात-निर्यात प्रशिक्षित लाभार्थ्यांसाठी ऑनलाइन मार्गदर्शन सत्र उत्साहात संपन्न पुणे, दि. २८ जून : व्यवसायाची वृद्धी झाली की पुढचा टप्पा असतो तो आपला माल परदेशी पाठवणे. जशी जशी व्यवसायाची व्याप्ती वाढते, तसे आपला माल परदेशी पाठवणे आणि आपल्या व्यवसायासाठी लागणाऱ्या काही गोष्टी परदेशातून मागविणे क्रमप्राप्त असते. अशा वेळी या आयात-निर्यात क्षेत्राची सखोल माहिती असणे आवश्यक असते. या क्षेत्राशी संबंधित नियम, अटी, वेगवेगळ्या व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता अशा अनेक गोष्टींची माहिती असणे हे त्या व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. याचसाठी अमृत संस्थेने आयात-निर्यात प्रशिक्षण वर्ग हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. या प्रशिक्षण वर्गाच्या आतापर्यंत अनेक बॅचेस सुद्धा झाल्या आहेत. परंतु तरीही यासंदर्भात काही अडचणी असू शकतात किंवा प्रत्यक्ष काम करताना काही अडचणी येऊ शकतात. यासाठीच त्यांचे मार्गदर्शन सत्र घेणे गरजेचे असते. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आयात-निर्यात प्रशिक्षित लाभार्थ्यांच्या ऑनलाइन मार्गदर्शन सत्राला राज्यभरातील लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या संवादात्मक सत्रात आयात-निर्यात क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक कांचन कुलकर्णी यांनी लाभार्थ्यांच्या विविध प्रश्नांची सविस्तर उत्तरे देत त्यांच्या शंकांचे प्रभावीपणे निरसन केले.
राज्यात अधिकाधिक युवक-युवतींना जागतिक बाजारपेठेशी जोडून निर्यातक्षम उद्योजक घडविणे हा अमृतचा प्रमुख उद्देश आहे. यासाठी प्रशिक्षणाबरोबरच उद्योग उभारणीपर्यंत सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्य देण्याची अभिनव संकल्पना अमृतने राबविली आहे.
आतापर्यंत राज्यभरातील 370 लाभार्थ्यांनी अमृतच्या आयात-निर्यात प्रशिक्षणाचा लाभ घेतला असून, आता या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवसाय सुरू करण्यासाठी हँड होल्डिंग, तज्ज्ञ मार्गदर्शन आणि व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक सहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे.
या ऑनलाइन सत्रामध्ये लाभार्थ्यांनी उद्योग सुरू करताना येणाऱ्या अडचणी, आयात-निर्यात नोंदणी प्रक्रिया, परदेशी ग्राहक शोधणे, आवश्यक कागदपत्रे, लॉजिस्टिक्स, आर्थिक नियोजन आणि व्यवसाय विस्तार यासंदर्भात उत्साहपूर्वक प्रश्न विचारले.
कांचन कुलकर्णी यांनी प्रत्येक प्रश्नाचे सविस्तर व व्यवहार्य उत्तर देत लाभार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविला.
अमृतच्या माध्यमातून राज्यभरातील जिल्हा कार्यालयांमध्ये अमृत निर्यात केंद्र विकसित करण्यात येत असून, इच्छुक उद्योजकांना प्रशिक्षण, मार्गदर्शन, व्यवसाय सल्ला, कागदपत्रांची पूर्तता, बाजारपेठेशी जोडणी आणि आवश्यकतेनुसार सातत्यपूर्ण सहकार्य उपलब्ध करून दिले जाणार आहे. व्यवसाय सुरू झाल्यानंतरही उद्योजकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी अमृतचे तज्ज्ञ मार्गदर्शक आणि जिल्हा कार्यालये सतत सहकार्य करतील.
हे प्रशिक्षण हायब्रीड पद्धतीने (ऑनलाइन व प्रत्यक्ष) आयोजित केले जात असून, नवीन इच्छुकांसाठी नियमित नवीन प्रशिक्षण बॅचेस सुरू करण्यात येणार आहेत. प्रशिक्षणामध्ये आयात-निर्यातीची संपूर्ण प्रक्रिया, आवश्यक परवाने, उत्पादन निवड, आंतरराष्ट्रीय विपणन, डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर, कागदपत्रे, लॉजिस्टिक्स, पेमेंट प्रणाली आणि व्यवसाय व्यवस्थापन यांचे सविस्तर मार्गदर्शन दिले जाते.
याशिवाय, अमृतची व्याज परतावा योजना आणि कौशल्य विकास योजना यांची सांगड घालून लाभार्थ्यांना केवळ प्रशिक्षण न देता प्रत्यक्ष उद्योग उभारणीसाठी सक्षम करण्याचे नाविन्यपूर्ण कार्य अमृत करत आहे.
आयात-निर्यात क्षेत्रात करिअर किंवा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या इच्छुकांनी www.mahaamrut.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा आपल्या जवळच्या अमृत जिल्हा व्यवस्थापकांशी संपर्क साधावा. आयात-निर्यात विषयक अधिक माहितीसाठी अमृतच्या अधिकृत आयात-निर्यात वेबपेजचा देखील उपयोग करता येईल.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment