महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृत यांच्या वतीने मालेगाव येथे १० ते १९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन केले जात असून, अमृत मित्र नंदकिशोर वनस्कर हे प्रशिक्षणाचे मार्गदर्शन करीत आहेत. विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर यांनी प्रशिक्षणाला भेट देऊन प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला.
मालेगाव येथे अमृतच्या उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमास विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर यांची भेट युवक-युवतींनी उद्योजकतेच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन साध्य करावे – प्रवीण कोळेश्वर महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने खुल्या प्रवर्गातील लक्षित गटातील पात्र युवक-युवतींसाठी मालेगाव येथे आयोजित दहा दिवसीय उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमास अमृतचे विभागीय व्यवस्थापक श्री. प्रवीण कोळेश्वर यांनी भेट देऊन प्रशिक्षणाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधत उद्योजकतेच्या विविध संधी, व्यवसाय उभारणी आणि आर्थिक स्वावलंबन याबाबत मार्गदर्शन केले. देशपांडे प्लॉट, मालेगाव येथे दिनांक १० ते १९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेला हा प्रशिक्षण कार्यक्रम अमृत मित्र श्री. नंदकिशोर वनस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. प्रशिक्षणासाठी श्री. कैलास खासबागे हे प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करीत आहेत. यावेळी ना. ना. मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मालेगाव येथील सहाय्यक शिक्षक श्री. स्वप्नील जोशी तसेच अमृतचे जिल्हा उपव्यवस्थापक श्री. रोहित देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. भेटीदरम्यान विभागीय व्यवस्थापक श्री. प्रवीण कोळेश्वर यांनी प्रशिक्षणार्थींना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाचा आढावा घेतला. युवक-युवतींनी प्रशिक्षणातून प्राप्त होणाऱ्या ज्ञानाचा आणि कौशल्यांचा उपयोग प्रत्यक्ष व्यवसाय उभारणीसाठी करावा. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी योग्य नियोजन, बाजारपेठेचा अभ्यास, आर्थिक व्यवस्थापन आणि ग्राहकांच्या गरजांचे आकलन करणे आवश्यक आहे. शासकीय योजनांची माहिती घेऊन उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले. या दहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत व्यवसाय संकल्पना व निवड, व्यवसाय नियोजन, बाजारपेठेचा अभ्यास, आर्थिक नियोजन, उद्योगविषयक शासकीय योजनांची माहिती, व्यवसाय व्यवस्थापन, विपणन कौशल्ये तसेच यशस्वी उद्योजक होण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर मार्गदर्शन करण्यात येत आहे. प्रशिक्षणार्थींना व्यवसायाभिमुख ज्ञान व कौशल्ये प्राप्त करून देणे, त्यांच्यामध्ये उद्योजकीय दृष्टिकोन विकसित करणे आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे, हा प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश आहे. अमृत संस्थेमार्फत लक्षित गटातील पात्र युवक-युवतींच्या शैक्षणिक, कौशल्यविकास व उद्योजकता विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमांच्या माध्यमातून युवकांना स्वयंरोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. मालेगाव येथे सुरू असलेला उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम हा या उद्दिष्टपूर्तीसाठी महत्त्वपूर्ण उपक्रम ठरत आहे. अमृतच्या माध्यमातून युवक-युवतींमध्ये उद्योजकीय क्षमता विकसित करून त्यांना स्वयंरोजगाराच्या दिशेने प्रवृत्त करण्यासाठी अशा प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment