छत्रपती शिवाजी महाराजांचे रयतेच्या हिताचे, स्वावलंबनाचे आणि स्वराज्य उभारणीचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृतच्या वतीने ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात वाशीम जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, शैक्षणिक संस्था व युवक मंडळांनी स्वतः दुर्गप्रतिकृती तयार करून अधिकृत संकेतस्थळावर छायाचित्र अपलोड करावे. पडताळणीनंतर पात्र सहभागी व्यक्तींना डिजिटल अभिनंदनपत्र देण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर; ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’मध्ये सहभागी होण्याचे वाशीमकरांना आवाहन रयतेसाठी दूरदृष्टी, स्वराज्यासाठी दुर्ग; शिवविचारांना मानवंदना! वाशीम : दुष्काळासारख्या संकटांच्या काळात रयतेला आधार देण्यासाठी आणि स्वराज्य सक्षम करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टीने अनेक उपाययोजना केल्या. रयतेचे हित, स्वावलंबन आणि स्वराज्याची उभारणी या शिवविचारांना मानवंदना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या वतीने ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम केवळ मातीचा दुर्ग उभारण्यापुरता मर्यादित नसून, रयतेच्या राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा, स्वराज्याच्या विचारांना मानवंदना देणारा आणि नव्या पिढीला महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाशी जोडणारा संस्कार आहे. दिवाळीच्या निमित्ताने दुर्गप्रतिकृती तयार करण्याच्या परंपरेला प्रोत्साहन देऊन गड-किल्ल्यांच्या ऐतिहासिक वारशाबद्दल अभिमान आणि दुर्गसंवर्धनाची भावना निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या उपक्रमात वाशीम जिल्ह्यातील नागरिक, कुटुंबे, विद्यार्थी, शाळा-महाविद्यालये, सामाजिक संस्था आणि युवक मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा. सहभागी व्यक्तींनी स्वतः दुर्गप्रतिकृती तयार करून त्यासोबतचे छायाचित्र https://www.amrutdurgotsav.com/ या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करावे. छायाचित्रामध्ये सहभागी व्यक्ती आणि तयार केलेली दुर्गप्रतिकृती स्पष्ट दिसणे आवश्यक आहे. इतर ठिकाणांहून मिळविलेली छायाचित्रे ग्राह्य धरली जाणार नाहीत. प्राप्त नोंदणी व छायाचित्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर आवश्यक निकष पूर्ण करणाऱ्या सहभागी व्यक्तींना डिजिटल अभिनंदनपत्र देण्यात येणार आहे. उपक्रमाच्या सहभागासंदर्भातील सविस्तर नियम व अटी अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ‘रयतेसाठी दूरदृष्टी… स्वराज्यासाठी दुर्ग… शिवविचारांना मानवंदना!’ या प्रेरणादायी विचारातून नागरिकांनी दुर्गप्रतिकृती साकारून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवावा. वाशीम जिल्ह्यातील नागरिकांनी ‘अमृत दुर्गोत्सव २०२६’ या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन अमृत संस्थेमार्फत करण्यात येत आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी ,भूमिहार व हिंदू वीरशैव लिंगायत अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment