सुरक्षित व स्वच्छ अन्न- प्रत्येक नागरिकाचा अधिकार

अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ व त्या अंतर्गत नियम/विनियमांच्या पालनासाठी महाराष्ट्र शासनाच्या अन्न, औषध प्रशासनातर्फे आदेश जारी.

सुरक्षित व स्वच्छ अन्न- प्रत्येक नागरिकाचा अधिकार मुख्य फोटो
मुख्य फोटो

अन्न व्यवसाय चालवणे म्हणजे केवळ व्यापार नव्हे, तर ती नागरिकांच्या आरोग्य, प्रतिष्ठा व सुरक्षित अन्नाच्या अधिकाराशी थेट संबंधित सार्वजनिक जबाबदारी आहे. याच भूमिकेतून अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ व त्या अंतर्गत नियम/विनियमांच्या पालनासाठी महाराष्ट्र शासनाच्या अन्न, औषध प्रशासनाने आदेश जारी केला आहे.

या अंतर्गत सर्व हॉटेल्स, उपहारगृहे, खाद्यगृहे, क्लाउड किचन, कॅन्टीन, बेकरी, केटरिंग, ई-कॉमर्स अन्नसेवा, फूड कोर्ट, मिठाई दुकाने, ज्यूस बार, बँक्वेट हॉल, मोबाईल फूड सर्विस अशा सर्व अन्न सेवा आस्थापनांना काही नियम व अटी लागू करण्यात आल्या आहेत.

• परवाना व नोंदणी-
१) कलम ३१ अंतर्गत वैध नोंदणी/परवान्याशिवाय व्यवसाय सुरू करता येणार नाही.
२) मूळ/डाउनलोड केलेले प्रमाणपत्र कार्यस्थळी ठळकपणे प्रदर्शित करणे आवश्यक आहे.
३) व्यवसायाचे स्वरूप, नाव, पत्ता किंवा उत्पादने बदलल्यास ३० दिवसांच्या आत FoSCoS (Food Safety Compliance System) वर कळवणे आवश्यक आहे.
• स्वच्छता व परिसर-
१) स्वच्छ, कीटकमुक्त, धूळ/धूर व दुर्गंधीमुक्त परिसर असणे गरजेचे आहे.
२) व्हेंटिलेशन, एक्झॉस्ट, हात धुण्याची सुविधा, झाकणयुक्त कचरापेटी यांचे काटेकोर पालन आवश्यक आहे.
३) कच्चे व शिजवलेले अन्न क्षेत्र स्पष्टपणे वेगळे असावे.
• खरेदी व साठवण-
१) कच्चा माल अधिकृत/नोंदणीकृत पुरवठादारांकडूनच घेणे.
२) बिल/खरेदी नोंदी किमान ६ महिने जतन करणे.
३) FIFO (First-In, First-Out) तत्त्व व जमिनीपासून व भिंतीपासून अंतर ठेवून साठवण करणे.
• तयारी व तापमान –
१) गरम, थंड व गोठवलेले पदार्थ वेगवेगळ्या तापमानात ठेवणे.
२) तापमान नोंद नियमित ठेवणे.
३) केवळ अनुमत अन्न संयोजक रंग व स्वाद वापरणे.
• अन्न हाताळणारे कर्मचारी-
१) वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र व आवश्यक तपासण्या करणे अनिवार्य आहे.
२) स्वच्छ गणवेश, टोपी/हेअरनेट, हातमोजे असणे तसेच नखे स्वच्छ असणे गरजेचे आहे.
३) अन्न तयार करताना/वाढताना धुम्रपान, तंबाखू, गुटखा, पान मसाला यांचे सेवन निषिद्ध आहे.
• FSMS- Food Safety Management System प्रशिक्षण व लेखापरीक्षण-
१) HACCP (Hazard Analysis Critical Control Point) आधारित दस्तऐवजीकृत फूड सेफ्टी व्यवस्थापन.
२) FoSTaC (Food Safety Training and Certification) प्रशिक्षण; दर २५ कर्मचाऱ्यांमागे किमान एक प्रशिक्षित पर्यवेक्षक आवश्यक.
३) केंद्रीय परवाना व मोठ्या उलाढालीसाठी तृतीय पक्ष FSMS ऑडिट आवश्यक.
याशिवाय रंगसंकेतिक फलक लावणेही बंधनकारक आहे, जसे की-
लाल रंग- कच्चे मांस
निळा रंग – कच्चे मासे
पिवळा रंग- कच्चे कुक्कुट
हिरवा रंग- फळे व भाज्या
तपकिरी रंग- शिजवलेले/खाण्यास तयार अन्न
ग्राहकांना माहिती देणे व मेनू लेबलिंगमध्ये पारदर्शकता हवी, म्हणून काही नियम/अटी आहेत, जसे की-
• शाकाहारी/मांसाहारी अन्न निर्देशक
• उष्मांक/कॅलरी मूल्य (ज्या आस्थापनात गरजेचे आहे)
• कोणतेही आरोग्य दावे, पोषण दावे किंवा दिशाभूल करणारी माहिती निषिद्ध आहे.
• अलर्जन माहिती देणे गरजेचे आहे.
• ग्राहकांना पिण्याचे पाणी नाकारणे, बाटलीबंद पाण्याचा आग्रह करणे किंवा फक्त बाटलीबंद पाणी उपलब्ध असणे असे सांगणे निषिद्ध आहे.
• आरओ किंवा यू.व्ही. किंवा समतुल्य प्रणाली कार्यरत ठेवणे.
• NABL/FSSAI अधिकृत प्रयोगशाळेत पाण्याची गुणवत्ता चाचणी किमान दर सहा महिन्यांनी करणे आवश्यक.
• पाण्याची टाकी स्वच्छता व निर्जंतुकीकरण किमान तीन महिन्यांनी करणे अनिवार्य.
याव्यतिरिक्त पॅकेजिंग व अन्नसंपर्क साहित्यासंदर्भातही काही अटी/नियम आवश्यक आहेत.
• केवळ फूड ग्रेड, स्वच्छ, सुरक्षित व योग्य पॅकेजिंग वापरावे.
• प्रिंटिंग इंक/जड धातू/रासायनिक स्थलांतर मर्यादा पाळाव्यात.
• बटर पेपर, पार्चमेंट पेपर, प्रमाणित गुंडाळणी कागद व अन्न सुरक्षित कंटेनर वापरावेत.
• पॅक केलेल्या पदार्थांवर पूर्ण लेबलिंग- नाव, घटक, पोषण, अलर्जन, तारीख, परवाना क्रमांक, पत्ता असणे अनिवार्य आहे.
• वर्तमानपत्र, छापील कागद, असुरक्षित कागद अन्न गुंडाळणीसाठी वापरू नये.
• गंजलेली/चिरलेली एनॅमल भांडी किंवा अन्नासाठी अयोग्य काळे कंटेनर वापरू नयेत.
• एकदाच वापरायच्या प्लास्टिक/कंटेनरचा पुनर्वापर करू नये.
• तेल शोषण्यासाठी वर्तमानपत्र किंवा इतर साहित्य वापरू नये.
विविध आस्थापनांप्रमाणेच क्लाउड किचन, सेंट्रल किचन, शाखा व ई-कॉमर्स यांना सुद्धा परवाना/नोंदणी नियम व अनेक राज्यात केंद्रे असल्यास केंद्रीय परवाना अशा अनेक नियम/अटी लागू होणार आहेत. याशिवाय निकृष्ट तेल वापरणे, पूर्वी वापरलेले तेल पुन्हा वापरणे, गरम करणे किंवा नवीन तेलात मिसळून वापरणे निषिद्ध आहे. गडद रंग, खवट वास/चव, जास्त धूर, सतत फेस येणे, चिकटपणा अशी लक्षणे धोकादायक मानली जातील. ५० लिटर/दिवसापेक्षा अधिक तेल वापरणाऱ्यांनी तेल खरेदी, वापर, TPC व विल्हेवाट यांच्या नोंदी ठेवाव्यात. तेल नाल्यात, जमिनीत किंवा उघड्यावर टाकू नये. RUCO स्टिकर प्रदर्शित करावे.
वरील कोणत्याही नियमाचे उल्लंघन झाल्यास दंड, खटला व परवाना रद्द करण्याची कारवाई होऊ शकते.
• असुरक्षित अन्न- मृत्यू झाल्यास ७ वर्षांपेक्षा कमी नाही ते आजन्म कारावास व किमान १० लाख रुपये दंड.
• गंभीर दुखापत- सहा वर्षांपर्यंत कारावास व ५ लाखांपर्यंत दंड.
• गंभीर नसलेली दुखापत- एक वर्षापर्यंत कारावास व तीन लाखांपर्यंत दंड.
• दुखापत नाही- तीन महिन्यांपर्यंत कारावास व एक लाखांपर्यंत दंड.
• परवाना नसताना व्यवसाय- वैध परवाना/नोंदणीशिवाय व्यवसाय केल्यास १० लाखांपर्यंत शास्ती.
• Substandard अन्न- उत्पादन, साठवण, विक्री किंवा सेवा अयोग्य असल्यास पाच लाखांपर्यंत शास्ती.
• Misbranded अन्न- चुकीचे/दिशाभूल करणारे नामकरण असल्यास ३ लाखांपर्यंत शास्ती.
• अस्वच्छ प्रक्रिया- अन्नाची अस्वच्छ/अनारोग्यकारक तयारी असल्यास एक लाखांपर्यंत शास्ती.
याव्यतिरिक्त परवाना निलंबन/रद्द होणे, आरोग्य जोखीम असल्यास प्रतिबंध/आणीबाणी आदेश, जप्ती/नाश, रीकॉल, दोषी आस्थापनांची नावे जाहीर करणे आणि योग्य प्रकरणात फौजदारी कायद्यानुसार कारवाई असेही परिणाम भोगावे लागतील.
या सर्व नियम/अटींची तात्काळ अंमलबजावणी आदेश जारी होताच लागू होणार आहे. या आदेशाच्या अनुपालनाची जबाबदारी व्यवसाय मालक, कर्मचारी व तपासणी अधिकारी यांच्यावर आहे. अन्न व औषध प्रशासनातील सर्व अधिकारी या आदेशाची अक्षरशः व भावनेने अंमलबजावणी करतील. वैद्यकीय अधिकारी/रुग्णालयांनी अन्न विषबाधा किंवा अन्नजन्य आजारांची माहिती कार्यक्षेत्रातील अन्न सुरक्षा अधिकारी/सहायक आयुक्तांना देणे अपेक्षित आहे.

या संदर्भात काहीही तक्रार असेल तर खालीलप्रमाणे संपर्क करावा-
FDA महाराष्ट्र टोल-फ्री हेल्पलाईन: 1800222365
FSSAI हेल्पलाईन: 1800112100
FoSCoS मोबाईल ॲप/संबंधित FDA कार्यालय

संदर्भ- अन्न सुरक्षा आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांचा हॉटेल/रेस्टॉरंट/अन्न सेवा आस्थापनांवरील सर्वंकष अनुपालन आदेश- दिनांक- २३ जून २०२६

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 25-06-2026 News publication date | Time: 03:49 PM News publication time | Views: 59 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 25-06-2026 News publication date | Time: 03:49 PM News publication time | Views: 59 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement