अमरावती जिल्ह्यातील श्रद्धास्थान
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथे सुमारे ७५० वर्षांपूर्वी उभारलेले खंडेश्वराचे भव्य आणि ऐतिहासिक मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. श्रावण महिना, तसेच महाशिवरात्रीच्या काळात येथे हजारो भक्त दर्शनासाठी येतात. निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले हे दगडी मंदिर आपल्या अप्रतिम कोरीव शिल्पकलेमुळे आणि रेखीव बांधकामामुळे विशेष लक्ष वेधून घेते. मंदिराची वास्तुरचना पाहून भाविक भारावून जातात. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या कळसावर आजपर्यंत कावळा किंवा कबूतर बसले नसल्याची स्थानिकांची श्रद्धा आहे. खंडेश्वर मंदिरासोबतच लगत असलेल्या बोंडेश्वर आणि कोंडेश्वर मंदिरातील शिवलिंगांचे एकाच दिवशी दर्शन घेतल्यास काशीयात्रेइतके पुण्य लाभते, असे म्हटले जाते.
या मंदिराचा इतिहास अत्यंत समृद्ध आहे. रामदेवरायाच्या कारकिर्दीत शके ११७७मध्ये, म्हणजेच इसवी सन १२२४ ते १२५५ या कालखंडात या मंदिराची उभारणी करण्यात आली. हेमाडपंती वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या मंदिराच्या दगडी भिंतींवर सुंदर कलाकुसर करण्यात आली आहे. मंदिर बांधण्यासाठी वापरण्यात आलेल्या विशेष प्रकारच्या विटा पाण्यावर तरंगतात, अशीही आख्यायिका सांगितली जाते.
रामदेवरायाचे पंतप्रधान हेमाद्री पंत यांनी हे प्राचीन शिवालय उभारल्याची नोंद मंदिरातील देवनागरी लिपीतील शिलालेखात आढळते. कौंडिण्य मुनींच्या शिष्यपरंपरेतील खंड्या नावाच्या शिष्याने येथे महादेवाची स्थापना केली आणि त्यावरूनच या देवस्थानाला खंडेश्वर हे नाव प्राप्त झाल्याचे सांगितले जाते. खंडेश्वराच्या कृपाछायेखाली नांदत असलेले गाव म्हणजेच नांदगाव खंडेश्वर, अशी स्थानिकांची श्रद्धा आहे.
मंदिराभोवतालचा परिसर हिरव्यागार वृक्षांनी नटलेला असून, वातावरण अत्यंत शांत आणि प्रसन्न आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना अध्यात्मिक समाधानासोबतच एक वेगळी सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळते.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment