छत्रपती संभाजीनगरमधील पालचे प्राचीन सिद्धेश्वर महादेव मंदिर

हेमाडपंती स्थापत्याचा अनमोल ठेवा

छत्रपती संभाजीनगरमधील पालचे प्राचीन सिद्धेश्वर महादेव मंदिर मुख्य फोटो
छत्रपती संभाजीनगरमधील पालचे प्राचीन सिद्धेश्वर महादेव मंदिर अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यातील पाल येथील सिद्धेश्वर महादेव मंदिर अत्यंत प्राचीन श्रद्धास्थान आहे. गिरिजा नदीच्या शांत काठावर वसलेले हे मंदिर संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाते. गिरिजा हे नाव नदीचे आहे, तसेच ते माता पार्वतीचेही नाव असल्याने येथे पार्वतीसोबत सिद्धेश्वर महादेव वास्तव्य करत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.

हे मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैलीत बांधलेले असून, त्याचे प्राचीन दगडी बांधकाम, कोरीव काम आणि शांत परिसर भाविकांना विशेष आकर्षित करतात. येथे असलेले शिवलिंग स्वयंभू आणि जागृत मानले जाते. त्यामुळे मराठवाड्यासह राज्यभरातून हजारो भाविक वर्षभर दर्शनासाठी येथे येत असतात.

या मंदिराबाबत एक रंजक आख्यायिका सांगितली जाते. अनेक वर्षांपूर्वी येथे सिद्धमय नावाचे तपस्वी राहत होते. ते भगवान शंकराची अखंडपणे सेवा करत होते. काशीला जाऊन गंगाजल आणून शिवलिंगावर अभिषेक करण्याची त्यांची इच्छा होती; मात्र अंतर खूप असल्याने ते शक्य होत नव्हते. एका रात्री त्यांना स्वप्नात भगवान शंकराने दृष्टान्त देऊन सांगितले, की 'मंदिराजवळील कोरड्या विहिरीतच गंगा प्रकट झाली आहे.' दुसऱ्या दिवशी त्यांनी पाहिले असता ती विहीर पाण्याने भरलेली दिसली. तेव्हापासून या मंदिराला सिद्धेश्वर महादेव मंदिर म्हणून ओळख मिळाली.

मंदिरात प्रवेश करताच समोर दगडात कोरलेली आकर्षक नंदीची मूर्ती दिसते. नंदीच्या मूर्तीवरील भौमितिक कोरीव काम, त्रिकोणी शिंगे आणि गळ्यातील घंटामाळ विशेष लक्ष वेधून घेतात. मंदिराच्या सभामंडपात दगडी खांबांवर सुंदर यक्षमूर्ती आणि नक्षीकाम कोरलेले आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर सुरसुंदरींच्या प्रतिमा, कीर्तिमुखे आणि विविध शिल्पकला पाहायला मिळते.

गर्भगृहातील मोठे पितळी शिवलिंग आणि त्यावरील शाळुंकेची रचना अत्यंत आकर्षक आहे. मंदिरावरील उंच शिखर नागरशैलीशी साधर्म्य दर्शवते. त्यावर विविध देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिर परिसरात गंगा प्रकट झाल्याचे मानली जाणारी बारव, गणेश मंदिर, संतोषी मातेचे मंदिर तसेच संतांच्या समाध्याही आहेत.

दर सोमवारी येथे भाविकांची मोठी गर्दी असते. विशेषतः श्रावण महिन्यातील सोमवारी आणि महाशिवरात्रीच्या दिवशी येथे मोठा उत्सव भरतो. मंदिर परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघतो आणि यात्रेचे स्वरूप प्राप्त होते.

हे मंदिर फुलंब्रीपासून अवघ्या नऊ किलोमीटर अंतरावर आणि छत्रपती संभाजीनगरपासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर आहे. येथे एसटी बसची सुविधा उपलब्ध असून, खासगी वाहनानेही मंदिरापर्यंत सहज पोहोचता येते. श्रद्धा, इतिहास, अध्यात्म आणि प्राचीन स्थापत्य यांचा सुंदर संगम अनुभवायचा असेल तर पाल येथील सिद्धेश्वर महादेव मंदिराला एकदा अवश्य भेट द्यावी.

Publisher: Rucha S. Sharma News publisher name | Date: 25-05-2026 News publication date | Time: 02:43 PM News publication time | Views: 159 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Rucha S. Sharma News publisher name | Date: 25-05-2026 News publication date | Time: 02:43 PM News publication time | Views: 159 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement