भंडारा जिल्ह्यातील भिलेवाडा पाड्यावर उत्साहात भरला अमृतवर्ग

अमृत संस्थेच्या उपक्रमाचा मुलांनी घेतला आनंद आणि पालकांकडून झाले कौतुक

भंडारा जिल्ह्यातील भिलेवाडा पाड्यावर उत्साहात भरला अमृतवर्ग मुख्य फोटो
भंडारा जिल्ह्यातील भिलेवाडा पाड्यावर उत्साहात भरला अमृतवर्ग अतिरिक्त फोटो

भंडारा : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत संस्थेतर्फे भंडारा जिल्ह्यातील भिलेवाडा येथील पाड्यावरच्या ३०-३५ घरांच्या वस्तीतील विद्यार्थ्यांकरिता आज (१६ मे) अमृतवर्ग आयोजित करण्यात आला होता. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात हा वर्ग पार पडला. या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक, सामाजिक, शारीरिक व मानसिक विकासासाठी विविध खेळ, ॐकार साधना, सूर्यनमस्कार आदी उपक्रम घेण्यात आले. तसेच, प्रेरणादायी बोधकथाही सांगण्यात आल्या. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवून त्यांना योग्य दिशा देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. 

उपक्रमात सात-१४ वयोगटातील १४ विद्यार्थी उपस्थित होते. सकाळी साडेसहा वाजता सुरू झालेल्या या वर्गाचा प्रारंभ भारतमाता पूजनाने करण्यात आला. भटक्या विमुक्त कल्याणकारी संस्थेचे विदर्भ प्रदेश प्रतिनिधी आणि वस्तीप्रमुख विकेश तांदुळकर, तसेच वस्ती निवासी श्री. ठाकरे उपस्थित होते. 

अमृतसखी साक्षी जोशी यांनी अमृतच्या गीतमालेतील “मातृभूमि गान से” हे गीत सर्वांकडून म्हणवून घेतले. तसेच, हात-पायांचा तोल, संतुलन शरीराचे नियंत्रण राखणारे भारतीय क्रीडासंस्कृतीतील खेळ खेळ खेळवण्यात आले. अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक ओमकार हरदास यांनी विद्यार्थ्यांकडून ॐकार साधना आणि समंत्र सूर्यनमस्कार करवून घेतले. स्मरणशक्ती वाढवण्याकरिता बैठे खेळ दोन गटांमध्ये खेळवण्यात आले. यानंतर अमृतमित्र हेमंत चंदवासकर यांनी एक प्रेरणादायी बोधकथा सांगितली. गुरूवर अखंड विश्वास ठेवावा आणि गुरू दाखवेल तीच योग्य दिशा असते, हा संदेश त्यातून मुलांना मिळाला. अल्पोपाहाराने उपक्रमाची सांगता करण्यात आली.

पालकांनी उपक्रमाचे कौतुक केले. 'समर्थ भारतासाठी समर्थ समाज घडवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे,' असे प्रतिपादन भटक्या विमुक्त कल्याणकारी संस्थेचे विदर्भ प्रदेश प्रतिनिधी आणि वस्तीप्रमुख विकेश तांदुळकर यांनी केले. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या विकासासाठी उपयोगी असल्याने सातत्याने घेण्यात यावा, अशी विनंती पालकांतर्फे करण्यात आली. उपक्रमाच्या यशस्वितेकरिता भटक्या जमाती विमुक्त कल्याणकारी संस्थेचे विदर्भ प्रांत प्रकल्पप्रमुख श्रीकांत तिजारे यांचे सहकार्य मिळाले. अमृत वर्गाच्या माध्यमातून समर्थ भारतासाठी समर्थ समाज घडवण्याचा प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन करून ओमकार हरदास यांनी वस्तीप्रमुखांचे आभार मानले. 

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: Hemant Chandwaskar News publisher name | Date: 16-05-2026 News publication date | Time: 05:20 PM News publication time | Views: 489 Number of times this news has been viewed | District: Bhandara Related district of the news
Publisher: Hemant Chandwaskar News publisher name | Date: 16-05-2026 News publication date | Time: 05:20 PM News publication time | Views: 489 Number of times this news has been viewed | District: Bhandara Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement