केशवराव भोळे

संगीत समीक्षक केशवराव भोळे यांच्या जन्मदिनानिमित्त (२३ मे) त्यांचा अल्प परिचय...

केशवराव भोळे  मुख्य फोटो
मुख्य फोटो

केशवराव भोळे हे संगीत समीक्षक, संगीतरचनाकार, संगीत दिग्दर्शक आणि नाटक, चित्रपट, क्रिकेट इत्यादी विषयांचे चिकित्सक अभ्यासक व लेखक होते. त्यांचा जन्म २३ मे १८९६ रोजी अमरावती येथे झाला. त्यांच्या वडिलांना संगीताची आवड होती. ते स्वत: सतार वाजवत असत. घरातील या संगीतमय वातावरणामुळे केशवरावांना लहानपणापासूनच नाटक-संगीत इत्यादींविषयी आवड निर्माण झाली. वैद्यकीय अभ्यासासाठी ते मुंबईला आले. तेथील संगीतपोषक वातावरणामुळे त्यांच्या संगीतविषयक आवडीला खतपाणी मिळाले. पुढे त्यांनी संगीतासाठी वैद्यकीय अभ्यासही सोडला. 

याच सुमारास त्यांचा दुर्गा केळेकर (विवाहानंतर ज्योत्स्ना भोळे) यांच्याशी विवाह झाला. त्यांनीही कालांतराने संगीत-नाटकाच्या क्षेत्रांत चांगला नावलौकिक संपादन केला. आंधळ्यांची शाळा या प्रसिद्ध नाटकामध्ये ज्योत्स्नाबाईंनी गायलेल्या दोन गाण्यांची भावपूर्ण स्वररचना केशवरावांनीच केली होती. या सगळ्यामुळे केशवराव संगीताचे नवरचनाकार म्हणून प्रसिद्धीस आले. १९३३ साली गोविंदराव टेंबे यांच्यानंतर केशवरावांनी ‘प्रभात’ या सिनेमा कंपनीत संगीत दिग्दर्शक म्हणून प्रवेश केला. ‘प्रभात’ कालखंडात केशवरावांची स्वररचना आणखीच प्रभावशाली झाली. अमृतमंथन, संत तुकाराम, कुंकू, माझा मुलगा, संत ज्ञानेश्वर, संत सखू, चंद्रसेना इत्यादी बोलपटांमधील गीतांच्या त्यांनी केलेल्या स्वररचनांमध्ये आणि संगीताच्या दिग्दर्शनामध्ये ती दिसून येते. 

त्यांखेरीज कित्येक सुट्या भावगीतांनाही त्यांनी चाली लावल्या. भोळे यांचे संगीतवैशिष्ट्य म्हणजे भोळे यांनी पियानो, हवाईयन गिटार आणि व्हायोलीनसारख्या वाद्यांचा वापर करून भारतीय चित्रपटसंगीतात नवीन प्रवाह आणला. पुढे ते आकाशवाणी मुंबई केंद्राच्या संगीत विभागाचे प्रमुख झाले. ‘एकलव्य’ या टोपण नावाने केशवराव भोळे यांनी वसुंधरा या साप्ताहिकात लिहिलेले अभिजात गायक-गायिकांविषयीचे अनेक लेख त्यांच्या उत्तम शैलीमुळे आणि सखोल माहितीमुळे प्रसिद्ध झाले. तेच लेख पुढे आजचे प्रसिद्ध गायक (१९३३) या पुस्तकात संग्रहित करण्यात आले. या पुस्तकाची सुधारून वाढवलेली आवृत्ती म्हणजे संगीताचे मानकरी (१९४९) ही होय. त्यांनी नंतर ‘शुद्धसारंग’ याही टोपण नावाने लेख लिहिले. त्यांत त्याची चिकित्सावृत्ती, परखडपणा, बोचरेपणा इत्यादी विशेष दिसून येतात. आवाजाची दुनिया (१९४८), अस्ताई (१९६२), वसंतकाकाची पत्रे (१९६४), माझे संगीत (१९६४), अंतरा (१९६७) आणि जे आठवते ते (१९७४) हे आठवणीवजा आत्मचरित्र ही त्यांची ग्रंथसंपदा. त्यांच्या संगीताने आजही रसिकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. ९ नोव्हेंबर १९७७ रोजी या प्रसिद्ध संगीत समीक्षकाचे निधन झाले.

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 23-05-2026 News publication date | Time: 10:35 AM News publication time | Views: 123 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 23-05-2026 News publication date | Time: 10:35 AM News publication time | Views: 123 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement