ज्ञानेश्वर नाडकर्णी

कला व नाट्य समीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांच्या जन्मदिनानिमित्त (२१ मे) त्यांच्या कार्याचा अल्प परिचय...

ज्ञानेश्वर नाडकर्णी मुख्य फोटो
मुख्य फोटो

कला व नाट्य समीक्षक ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी मराठी व इंग्रजी भाषेतून कलासमीक्षेच्या क्षेत्रात ५०हून अधिक वर्षे कामगिरी केली. त्यांचा जन्म २१ मे १९२८ रोजी झाला. आस्वादपर समीक्षक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. इंग्रजीमध्ये एमए पूर्ण केल्यानंतर १९५१मध्ये ज्ञानेश्वर नाडकर्णी लंडनच्या भारतीय दूतावासात रुजू झाले. दोन वर्षांतच ते भारतात परतले आणि मुंबईतील महाविद्यालयांमध्ये १९५६पर्यंत त्यांनी इंग्रजीचे अध्यापन केले. त्यानंतरची चार वर्षे त्यांनी जाहिरातींचे कॉपीरायटिंग केले. याच काळात त्यांनी फ्री प्रेस जर्नलसाठी सहसंपादक म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली. १९५९ ते १९६१ आणि नंतर १९६१ ते ६८ या काळात त्यांनी काम पाहिले. कलासमीक्षक या नात्याने त्यांनी इंग्रजी व मराठीत भरपूर लेखन केले. साहित्य, चित्रकला, नाटक, चित्रपट आदी विविध कलाप्रकारांचा मागोवा घेताना याच काळात येऊ पाहणाऱ्या नवनव्या बदलांचा ते पाठपुरावा करत असत. याविषयीचे लेखन त्यांनी भारतातील बहुतेकशी अग्रगण्य दैनिके व नियतकालिकांत सातत्याने केले. १९९६ साली त्यांच्या कलासमीक्षणाचा गौरव करणारे एक प्रदर्शन जहांगीर कलादालनात पार पडले. त्या वेळी अनेक ज्येष्ठ-श्रेष्ठ कलावंतांनी त्यांच्या कलाकृती या प्रदर्शनासाठी त्यांच्या गौरवार्थ देऊ केल्या होत्या. त्यात एम. एफ. हुसेन, अकबर पदमसी यांचाही समावेश होता. याच प्रदर्शनावेळी नाडकर्णींनी युवा कलाकांरांसाठी ज्येष्ठ कलावंतांच्या नावाने सुमारे १३ पारितोषिके जाहीर केली होती.

त्यांच्या कलासमीक्षण लेखांना जगभर चांगला प्रतिसाद मिळाला. फ्रान्स सरकारने कला क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार देऊन १९८६मध्ये त्यांना गौरवले. ब्रिटिश सरकारने १९९४ साली त्यांना गौरवचिन्ह बहाल केले. महत्त्वाचे म्हणजे शिल्पकलेच्या प्रांतात नवकलेचे वारे आणण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जगप्रसिद्ध शिल्पकार हेन्री मूर याच्या जन्मशताब्दीनिमित्ताने ब्रिटिश सरकारने संपूर्ण वर्षभरासाठी एका महत्त्वपूर्ण प्रदर्शनाचे आयोजन केले होते. त्या प्रदर्शनाच्या पूर्वतयारीमध्ये नाडकर्णी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांना त्यासाठी सरकारने खास ब्रिटनमध्ये पाचारण केले होते. आर्टिस्ट्स सेंटर व बॉम्बे आर्ट सोसायटी या कला क्षेत्रातील महत्त्वपूर्ण संस्थांचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. त्यांना फ्रेंच सरकारतर्फे ‘अक्षरांचे शिलेदार’ हा किताब बहाल करण्यात आला होता.

ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनी समीक्षक या नात्याने नियतकालिकांत विपुल लेखन केले, तसेच साहित्याच्या विविध प्रकारांतही त्यांच्या पुस्तकांनी वेगळे स्थान मिळवले होते. पाऊस, भरती, चिद्घोष, प्रस्थान हे कथासंग्रह, दोन बहिणी, कोंडी, नजरबंदी, वलयांकित या कादंबऱ्या आदींबरोबरच विख्यात चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्यावरील ‘अनवाणी’, तसेच पिकासो, गायतोंडे, डी. डी. दलाल व हिचकॉक यांच्यावरील चरित्रग्रंथांचे लेखनही त्यांनी केले. अश्वत्थाची सळसळ, अभिनय, प्रतिभेच्या पाऊलवाटा, प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुप आदी समीक्षाग्रंथांची त्यांनी निर्मिती केली. ‘विलायती वारी’ हे प्रवासवर्णनात्मक पुस्तक त्यांनी लिहिले. बालगंधर्वांवरील इंग्रजी चरित्राचे लेखन करून त्यांनी मराठीतील या अजोड कलावंताची जागतिक पटलावर ओळख करून दिली. २३ डिसेंबर २०१० रोजी ज्ञानेश्वर नाडकर्णी यांचे निधन झाले.

(संदर्भ : मराठीसृष्टी)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 21-05-2026 News publication date | Time: 09:48 AM News publication time | Views: 103 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 21-05-2026 News publication date | Time: 09:48 AM News publication time | Views: 103 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement