बिपिनचंद्र पाल यांच्या स्मृतिदिनानिमित्त (२० मे) त्यांचा कार्यपरिचय...
बिपिनचंद्र पाल हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक थोर बंगाली नेते होते. त्यांचा जन्म पॉइल (सिल्हेट जिल्हा) या गावी सात नोव्हेंबर १८५८ रोजी झाला. त्यांचे वडील रामचंद्र पाल जमीनदार व वकील होते. हळूहळू त्यांना मुन्सफच्या जागेपर्यंत बढती मिळाली. बिपिनचंद्रांचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. त्यानंतर त्यांनी दोन मिशनरी व एका सरकारी माध्यमिक विद्यालयातून इंग्रजीचे शिक्षण घेतले आणि कोलकाता विद्यापीठाची प्रवेश परीक्षा दिली (१८७४). पुढे ते प्रेसिडेन्सी महाविद्यालयात दाखल झाले; पण दोन वेळा नापास झाल्यावर त्यांनी या औपचारिक शिक्षणाला कायमचा रामराम ठोकला (१८७८).
या सुमारास ते ब्राह्मो समाजाकडे आकृष्ट झाले. त्याची अधिकृत दीक्षा त्यांनी नंतर घेतली. बिपिनचंद्रांचे एकूण आयुष्य कष्टमय होते. विद्यार्थिदशेतच त्यांनी विपुल वाचन केले. ब्राह्मो समाजाचे केशवचंद्र सेन यांच्या विचारांची छाप त्यांच्यावर पडली. याशिवाय पी. के. रॉय आनंदमोहन बोस, द्वारकानाथ गांगुली वगैरे विद्वानांचा प्रभाव त्यांच्यावर होता. सुरुवातीला ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. मुख्याध्यापक म्हणून त्यांनी कटक (१८७९), सिल्हेट (१८८०), बंगलोर (१८८१), हबीबगंज (१८८६) इ. ठिकाणी काम केले. वृत्तपत्र व्यवसायाचेही त्यांना आकर्षण होते. १८८० साली त्यांनी परिदर्शक हे बंगाली साप्ताहिक सुरू कले. पुढे बेंगॉल पब्लिक ओपिनियनचे ते सहायक संपादकही झाले (१८८२). लाहोरच्या ट्रिब्युनमध्ये सहायक संपादक म्हणून ते १८८७मध्ये रुजू झाले. कोलकात्याच्या ग्रंथालयात ग्रंथपाल म्हणून त्यांनी काही काळ काम केले. ग्रंथालयाचे ते चिटणीसही होते (१८९०-९१). हे सर्व करत असताना ते काँग्रेसच्या अधिवेशनांना हजर राहत. त्यांनी आसाममधील चहाच्या मळ्यातील मजुरांचा प्रश्न मार्गी लावला (१८९६) आणि मुख्य आयुक्त हेन्रीग कॉटन याला त्यात लक्ष घालणे भाग पडले.
बिपिनचंद्र धर्मशास्त्रांचा अभ्यास करण्यासाठी शिष्यवृत्ती घेऊन इंग्लंडला गेले (१८९८); पण ही शिष्यवृत्ती त्यांनी एक वर्षातच सोडली व इंग्लंडमध्ये ते राजकीय कार्य करू लागले. तेथून ते प्रचारमोहिमेतून अमेरिकेला गेले. १९०१ साली ते भारतात परतले. भारतात आल्यानंतर न्यू इंडिया हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले (१९०२). बंगालच्या फाळणीनंतर लोकमान्य टिळक व लाला लाजपतराय यांच्याबरोबर स्वदेशीच्या चतुःसूत्रीचा त्यांनी पुरस्कार केला. संपूर्ण बंगालमध्ये त्यांनी आपल्या व्याख्यानांनी जागृती केली. बहिष्कार व निःशस्त्र प्रतिकार यांचे ते पुरस्कर्ते होते. त्यांनी मद्रासलाही या विषयांवर भाषणे दिली. त्यांनी वंदे मातरम हे दैनिक सुरू केले (१९०६). यानंतर ते इंग्लंडला जाऊन राहिले (१९०८-११).
बिपिनचंद्र हे एक तत्त्वचिंतक होते. बिपिनचंद्रांनी अनेक वृत्तपत्रे काढली. वंदे मातरमसारखी जहाल वृत्तपत्रे अतिशय लोकप्रिय झाली. या आणि इतर वृत्तपत्रांतून त्यांनी आपले विविध विषयांवरील विचार मांडले. याशिवाय त्यांनी तत्कालीन थोर व्यक्तींची चरित्रे लिहिली. त्यात व्हिक्टोरिया राणी (१८८७-बंगाली), केशवचंद्र सेन (१८९३-इंग्रजी), रवींद्रनाथ टागोर, राजा राममोहन रॉय, अरविंद घोष, आशुतोष मुखर्जी वगैरेंची चरित्रे अंतर्भूत होतात. त्यांनी मेमरीज ऑफ माय लाइफ अँड टाइम्स (१९३२) या शीर्षकाने आत्मचरित्र लिहिले. याशिवाय इंडियन नॅशनॅलिझम (१९१८), द न्यू इकॉनॉमिक मेनेस टू इंडिया (१९२०) व ब्राह्मो समाज अँड द बॅटल ऑफ स्वराज्य इन इंडिया (१९२६) ही त्यांची पुस्तके विशेष उल्लेखनीय आहेत. पहाडी आवाजाचे एक प्रभावी वक्ते म्हणून त्यांची ख्याती होती. लाल (लाला लजपतराय), बाल (बाळ गंगाधर टिळक) व पाल या त्रयीने वंगभंग, स्वदेशी व बहिष्काराचे प्रचंड आंदोलन करून जनजागृती केली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील ते एक प्रेरक पर्व आहे. अशा या थोर देशभक्ताचे २० मे १९३२ रोजी निधन झाले.
(संदर्भ : मराठी विश्वकोश)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment