इतिहासकार व लेखक त्र्यंबक शेजवलकर यांच्या जयंतीनिमित्त (२५ मे) त्यांच्या कार्याचा परिचय...
मराठ्यांच्या इतिहासाचे भाष्यकार, संशोधक व इतिहासकार त्र्यंबक शेजवलकर यांचा जन्म रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील कशेळी येथे २५ मे १८९५ रोजी झाला. त्यांनी मुंबईच्या आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतून मॅट्रिक (१९११) व विल्सन महाविदयालयातून बीए (१९१७) केले. पुढे मुंबईतच लष्कराच्या लेखा विभागात त्यांनी नोकरीही केली. हे खाते पुण्यात वानवडी येथे हलवण्यात आल्याने शेजवलकर पुण्यात आले. पुण्यात असताना ते भारत इतिहास संशोधक मंडळाचे सभासद झाले. साहजिकच त्यांचा दत्तो वामन पोतदार, दत्तोपंत आपटे, गो. स. सरदेसाई प्रभृतींशी परिचय झाला. या वास्तव्यात गो. स. सरदेसाई यांनी त्यांना बडोद्याला आपल्या सहकार्याकरिता येण्याचे आवाहन केले व त्यानुसार ते बडोद्याला गेले (१९२२). परंतु त्यांना एमए ही पदवी संपादित करायची होती. म्हणून ते मुंबईस आले.
बडोद्याच्या वास्तव्यात शेजवलकरांच्या गुणवत्तेमुळे रियासतकार सरदेसाई प्रभावित झाले होते. त्यामुळे जेव्हा त्यांनी नानासाहेब पेशवे हे पुस्तक लिहिले (१९२६), तेव्हा शेजवलकरांना त्या पुस्तकाला प्रस्तावना लिहिण्याची विनंती केली. त्यांनी भिन्न मतप्रदर्शक व विचारप्रवर्तक अशी दीर्घ प्रस्तावना लिहिली. तेव्हापासून एक साक्षेपी इतिहासकार म्हणून शेजवलकरांचा नावलौकिक झाला. कर्नाटक छापखान्याने (मुंबई) काढलेल्या प्रगती या साप्ताहिकाचे संपादन त्यांनी केले (१९२९-३२) आणि त्याद्वारे अनेक विचारप्रवर्तक लेख लिहिले; पण ब्रिटिश शासनाच्या रोषामुळे ते साप्ताहिक बंद पडले. त्यानंतरचा त्यांचा पाच-सहा वर्षांचा काळ हलाखीत गेला. पुढे मराठ्यांच्या इतिहासाचे संशोधक म्हणून त्यांची डेक्कन कॉलेज (पुणे) येथे नियुक्ती झाली (१९३९). तिथून ते १९५५मध्ये निवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतरही प्राध्यापक म्हणून ते डेक्कन कॉलेजात काम करत. शेजवलकरांचे एक मित्र ह. वि. मोटे यांनी प्रगती साप्ताहिकात व इतरत्र प्रसिद्ध झालेले काही स्फुटलेख शेजवलकरांचे लेख-प्रथम खंड (१९४०) व शेजवलकरांचे लेख - खंड दुसरा (१९५९) अशा नावाने प्रकाशित केले. शेजवलकरांनी इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांत पुढील मोजकीच पुस्तके लिहिली : दत्तोपंत आपटे : व्यक्तिदर्शन (१९४५), पानिपत : १७६१ (इंग्रजी-१९४६), निजाम-पेशवे संबंध (१९५९), पानिपत : १७६१ (मराठी-१९६१) इत्यादी. यांशिवाय त्यांनी काही ऐतिहासिक मूळ पत्रे संपादून नागपूर अफेअर्स भाग १ व २ (१९५४ व १९५९) या शीर्षकाने प्रसिद्ध केली.
मुंबईच्या मराठा मंदिर या संस्थेने त्यांच्याकडे शिवचरित्र लिहिण्याचे काम सोपविले होते (१९५८). अखेरपर्यंत ते या कामात व्यग्र होते. परंतु प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे त्यांचे शिवचरित्र पूर्ण होऊ शकले नाही. २८ नोव्हेंबर १९६३ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर या संस्थेने त्यांनी लिहून ठेवलेली संकल्पित शिवचरित्राची प्रस्तावना (काही भाग), लेख, टिपणे, चरित्राचा आराखडा, ऐतिहासिक व्यक्तींची चरित्रे, कौटुंबिक माहिती इत्यादी साहित्य 'श्री शिवछत्रपती : संकल्पित शिव-चरित्राची प्रस्तावना, आराखडा व साधने' या शीर्षकाखाली प्रसिद्ध केले (१९६४). या ग्रंथावरून शेजवलकरांचा प्रदीर्घ व्यासंग, स्वतंत्र प्रज्ञा आणि निर्भीड ऐतिहासिक दृष्टिकोन यांचे प्रत्यंतर येते. हे अपूर्ण शिवचरित्र पुढील पिढीकरिता एक अत्यंत विश्वसनीय असा संदर्भग्रंथ ठरले आहे. या ग्रंथासाठी शेजवलकरांना साहित्य अकादमी पुरस्काराचा (मरणोत्तर) बहुमान मिळाला.
या ग्रंथलेखनाबरोबरच त्यांनी वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके, गौरवग्रंथ आदींमधून पुष्कळ लेखन केले. तसेच भारत इतिहास संशोधक मंडळातही शोधनिबंध वाचले. यांपैकी काही लेख ‘त्र्यंबक शंकर शेजवलकर : निवडक लेखसंग्रह’ या नावाने ह. वि. मोटे यांनी प्रसिद्ध केले आहेत (१९७७). त्यांच्या 'पानिपत' व 'शिवचरित्र …साधने' या दोन ग्रंथांना विशेष मान्यता मिळाली. पानिपत हा ग्रंथ शेजवलकरांनी जदुनाथ सरकारांचे दोषपूर्ण विवेचन व मराठ्यांवरील अन्यायकारक टीका याला उत्तर म्हणून लिहिला. विविध प्रकारच्या ऐतिहासिक साधनांची सूक्ष्म चिकित्सा, नकाशांचा सूक्ष्म अभ्यास, प्रत्यक्ष भेटी देऊन भौगालिक स्थळांचे सूक्ष्म निरीक्षण, आंतरशाखीय दृष्टी यांचा ताळमेळ घालून हा ग्रंथ लिहिला आहे.
इतिहास-संशोधनपद्धतीत या ग्रंथाने एक उच्च मानदंड निर्माण केला आहे. त्यांचे लेखन अभ्यासपूर्ण, चिकित्सक, विचारप्रवर्तक, अन्वयार्थी आणि बहुआयामी आहे. शेजवलकर निव्वळ संकलक-संशोधक नव्हते, तर इतिहासाचे प्रतिभावंत भाष्यकार आणि समाजचिंतक होते. आधुनिक मराठी इतिहास लेखनपरंपरेत तात्त्विक, बहुशाखीय आणि स्वयंभू मर्मदृष्टी लाभलेल्या न्यायमूर्ती म. गो. रानडे व वि. का. राजवाडे यांच्यासारख्या मोजक्या इतिहासकारांमध्ये शेजवलकर यांची गणना करावी लागेल.
(स्रोत : मराठी विश्वकोश)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment