संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक विष्णू बापट यांच्या जन्मदिनानिमित्त (२२ मे) त्यांच्या कार्याचा परिचय...
विष्णू बापट यांचा जन्म २२ मे १८७१ रोजी झाला. कोकणातील धालवल (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) हे त्यांचे जन्मगाव. त्यांचे शिक्षण रामदुर्ग, शिरोळ आणि मिरज येथे इंग्रजी पाचवीपर्यंत झाले. त्यानंतर तारमास्तराच्या कामाचे ज्ञान त्यांनी मिळवले. निरनिराळ्या रेल्वे कार्यालयांतून नोकऱ्या केल्या. हे सर्व करत असताना संस्कृतच्या अभ्यासाची ओढ निर्माण झाल्यामुळे ते संस्कृत शिकले व वाई येथील प्रज्ञानंद सरस्वतींकडे सुमारे अकरा महिने राहून त्यांनी वेदान्ताचे अध्ययन केले.
अध्ययनकाळात चरितार्थासाठी वाईच्या मोदवृत्त छापखान्यात मुद्रितशोधक म्हणून त्यांनीनोकरी केली. १९०३ ते १९१२ या काळात सिंध हैदराबाद येथील संस्कृत पाठशाळेचे मुख्याध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिले. १९१२ साली पुण्यात येऊन त्यांनी ग्रंथप्रकाशनाचा व्यवसाय सुरू केला. ब्रह्मविद्याग्रंथरत्नमाला (मासिक), आचार्य (पाक्षिक) आणि आचार्यकुल (मासिक) यांसारखी नियतकालिकेही त्यांनी चालवली. प्राचीन आचार्यांच्या ग्रंथविवरणाच्या माध्यमातून सनातन वैदिक धर्माचे समर्थन करणे, त्याचे ज्ञान बहुजन समाजाला विवेचक पद्धतीने करून देणे आणि श्रुत्युक्त धर्म, तत्त्वज्ञान व संस्कृत विद्या यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी तात्त्विक धर्मविचार व भाषांतरासह शास्त्रीय प्रकरणग्रंथ प्रसिद्ध करणे अशी तीन नियतकालिकांची उद्दिष्टे होती. वैदिक धर्माचा अभिमान असलेले दानशूर व्यापारी विठ्ठलदास दामोदर ठाकरसी यांचे ग्रंथप्रकाशनाच्या कामी बापटांना मोलाचे साह्य झाले. संस्कृतातील बरेचसे प्राचीन तत्त्वज्ञानसाहित्य बापटांनी मराठीत आणले, ही त्यांची फार मोठी कामगिरी होय. गीता, उपनिषदे आणि ब्रह्मसूत्र या तिन्हींचा शांकरभाष्यानुसार परिचय त्यांनी मराठीतून घडवला. तसेच भारतीय तत्त्वज्ञानातील अद्वैतादी विविध दर्शनांवर मराठीतून लेखन केले. रामानुज, पूर्णप्रज्ञ, माहेश्वर, जैमिनी-पाणिनी या दर्शनांवर त्यांनी समतभेद लिहिले, तर जैन, बौद्ध, चार्वाक या दर्शनांचा परिचय घडवताना त्यांचे खंडनही केले.
ब्रह्मसूत्रशारीरभाष्यार्थही त्यांनी तीन भागांत सांगितला. मूळ सूत्र, सूत्रार्थ, शांकरभाष्य, अवतरणे, स्पष्टीकरण आणि भामत्यादी टीकाकारांचा अधिक आशय व्यक्त करणाऱ्या टीपा यांसह हा भाष्यार्थ त्यांनी दिला आहे. शंकराचार्यकृत आत्मबोध आणि अपरोक्षानुभूती या ग्रंथांचे त्यांनी केलेले अनुवादही उल्लेखनीय आहेत. त्यांनी मराठीत अनुवादित केलेल्या ग्रंथात सोमदेवाच्या कथासरित्सागराचाही समावेश होतो. धर्मराजा ध्वरींद्रकृत वेदान्तपरिभाषा या ग्रंथाच्या विवरणाचे, तसेच वेदान्त शब्दकोशाचे कामही त्यांनी हाती घेतले होते. परंतु ते अपूर्ण राहिले. या दोन्ही कामांचा उर्वरित भाग रंगनाथ दत्तात्रेय वाडेकर यांनी पूर्ण केला आणि वेदान्तपरिभाषा व वेदान्तशब्दकोश हा ग्रंथ प्रसिद्ध झाला (१९३३).
बापट हे निष्ठावंत शांकरमत अनुयायी असल्यामुळे टिळकांच्या गीतारहस्यातील कर्मयोगवादी भूमिकेला त्यांनी विरोध केला. बापटांनी १९२५ मध्ये ‘आचार्यकुल’ या नावाची एक अध्यापनसंस्थाही स्थापन केली होती. हंपी मठाधिपतींकडून ‘आचार्यभक्त’ आणि बनारस येथील श्रीभारतधर्ममहामंडळातर्फे ‘शास्त्रसुधाकर’ अशा सन्मानाच्या पदव्या त्यांना मिळाल्या होत्या. २ डिसेंबर १९३३ रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment