विदर्भ प्रांताच्या संघ शिक्षा वर्गाचा वर्ध्यात प्रारंभ
वर्धा : 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वयंसेवकांच्या अथक परिश्रम व त्यागाने आज समाजाने संघटनेला आपलेसे मानले आहे. संघटनेच्या कार्यक्रमात समाज प्रत्यक्ष सहभाग घेत आहे, सहयोग देत आहे. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांना हिंदू समाजाचे हिंदू म्हणून संघटन करायचे होते. तेच काम शाखांच्या माध्यमातून अव्याहतपणे सुरू आहे. प्रशिक्षण वर्गात शाखा चालवण्याच्या तंत्राचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणातून धेय समर्पित कार्यकर्ता तयार व्हायला हवा,' असे प्रतिपादन प्रांत कार्यवाह अतुल मोघे यांनी केले.
स्थानिक नागठाणा येथील अग्निहोत्री अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विदर्भ प्रांताच्या वतीने संघ शिक्षा वर्गाच्या (सामान्य) उद्घाटन सत्रात ते बोलत होते. या वेळी प्रांत सह संघचालक श्रीधर गाडगे, वर्गाचे सर्वाधिकारी मनोहर सपकाळ यांची उपस्थिती होती. प्रशिक्षणात विदर्भातील सर्व जिल्ह्यांतून १६ ते ४० वयोगटातील २०० स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. एकूण २५ शिक्षक त्यांना प्रशिक्षण देणार आहेत. समाजाच्या विविध स्तरातील स्वयंसेवक सामाजिक जीवनाचा उत्कृष्ट अनुभव या वर्गात घेणार आहेत. आठ मे रोजी सुरू झालेला हा वर्ग २४ मेपर्यंत चालणार आहे. या प्रशिक्षण वर्गात वैचारिक सत्रे, शारीरिक व्यायाम, नियुद्ध, बौद्धिक सत्र, संघटनात्मक मार्गदर्शन व सेवेच्या विविध उपक्रमांचा समावेश आहे.
दर वर्षी श्रीरामनवमीच्या दिवशी विदर्भातील संघाच्या सर्व शाखांतील स्वयंसेवक वनवासी कल्याण आश्रमाकरिता निधी संकलन करतात. संघ शिक्षा वर्गाच्या उद्घाटन सत्रात प्रांत सहसंघचालक प्रांत कार्यवाह यांनी तो निधी एकत्रितरीत्या वनवासी कल्याण आश्रमाचे विदर्भ प्रांत सचिव भास्करराव रोकडे यांच्याकडे सुपूर्द केला.
वर्गाचे सर्वाधिकारी मनोहर सपकाळ (नागपूर), कार्यवाह डॉ. दत्तात्रय रत्नपारखी (अमरावती), मुख्य शिक्षक प्रतीक लांजेवार (नागपूर), सह-मुख्य शिक्षक विशाल मोकाशे (धामणगाव), बौद्धिक प्रमुख कृष्णा ठाकरे (भंडारा), सह-बौद्धिक प्रमुख संतोष मुत्तलवार (यवतमाळ), सेवा प्रमुख दीपक भोंगाडे (नागपूर) व सह-सेवाप्रमुख म्हणून अभिषेक मिश्रा या १५ दिवसांच्या प्रशिक्षण वर्गात प्रमुख दायित्वासह संचालन करणार आहेत.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment