प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा तिसरा टप्पा सुरू; विद्यावेतनही मिळणार
केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, तसेच पदवी (बीई, बीटेकसह) शिक्षण झालेल्या युवक-युवतींना नामांकित कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव घेण्याची संधी या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आली आहे. या इंटर्नशिप योजनेसाठी १८ ते २५ वर्षे वयोगटातील पूर्णवेळ शिक्षण, कौशल्य किंवा नोकरीत नसलेला भारतीय युवावर्ग पात्र आहे.
या योजनेअंतर्गत भारतातील नामांकित कंपन्यांमध्ये युवकांना सहा ते नऊ महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाणार असून, प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा नऊ हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. याचबरोबर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा आणि सुरक्षा विमा योजनेचे संरक्षणही त्यांना दिले जाणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर त्या युवक-युवतींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
या इंटर्नशिप योजनेत सहभाग घेण्यासाठी http://pminternship.mca.gov.in या वेबसाइटवर रजिस्टर लॉगिन/ रजिस्टर या टॅबवर क्लिक करून उमेदवारांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करण्यासाठी उमेदवारांच्या आधार क्रमांकाला मोबाइल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे. आधार लिंक मोबाइल क्रमांकावर ओटीपी पाठवण्यात येतो. त्यानंतरच उमेदवारांची नोंदणी होऊ शकते. १८ ते २५ वयोगटातील जास्तीत पात्र युवक-युवतींनी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेअंतर्गत नोंदणी करून प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्यातील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात संपर्क साधावा.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment