चक्क मोफत! लाखो रुपयांचा ड्रोन पायलट प्रशिक्षण कोर्स

अमृत संस्थेतर्फे ब्राह्मणांसह खुल्या प्रवर्गातील २५ घटकांसाठी योजना

चक्क मोफत! लाखो रुपयांचा ड्रोन पायलट प्रशिक्षण कोर्स मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी, त्यांच्यातून उद्योजक घडवण्यासाठी ही संस्था विविध योजनांसह वेगवेगळ्या प्रकारचे उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमही राबवते. त्यामध्येच ड्रोन पायलट बनण्यासाठीच्या प्रशिक्षणाचाही समावेश आहे. त्यासाठी अमृत ड्रोन मिशन या नावाने मोहीम राबवली जाते. हा प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत दर्जेदार असून, एरव्ही ज्यासाठी किमान लाख-दीड लाख रुपये मोजावे लागतात, तो निवासी कोर्स अमृत संस्थेकडून लक्ष्यित घटकांसाठी मोफत राबवला जातो. या प्रशिक्षणाचा कार्यक्रमाचा लाभ आजपर्यंत शंभरहून अधिक लाभार्थ्यांनी घेतला असून, त्यातील काही जणांनी यातून प्राप्त केलेल्या कौशल्याच्या आधारे चांगली कमाई करण्यासही सुरुवात केली आहे. अमृत संस्थेच्या या दर्जेदार कोर्सची कीर्ती ऐकून गोवा सरकारने आपल्या तीस अधिकाऱ्यांना अमृत संस्थेकडून ड्रोनचे प्रशिक्षण दिले. राज्यात आठ ठिकाणी संस्थेतर्फे प्रशिक्षण दिले जाते.

ड्रोन ऑपरेटर (पायलट) प्रशिक्षण कार्यक्रमामुळे युवकांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअरच्या नव्या संधी खुल्या होत आहेत. ड्रोनच्या वापराची क्षेत्रे आज विस्तारली असून, शेती फवारणी, पीक सर्वेक्षण, भूमापन (सर्व्हे), व्हिडिओग्राफी व फोटोग्राफी, सरकारी प्रकल्प निरीक्षण अशा अनेक क्षेत्रांमध्ये ड्रोनचा प्रभावी वापर केला जातो. त्यामुळे या क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. हे नेमके ओळखून अमृत संस्थेने ड्रोन मिशनची सुरुवात केली. महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवकांना, विशेषत: ग्रामीण क्षेत्रात स्वयंरोजगार व रोजगार निर्मिती करणारे प्रशिक्षण देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

कोण घेऊ शकते या योजनेचा लाभ?

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ घेऊ शकतात.

कार्यालय कुठे? अर्ज कसा करायचा?

पुण्यात औंधमध्ये अमृत संस्थेचे मुख्यालय आहे. तसेच, अमृत संस्थेची कार्यालये राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत. संस्थेचा कारभार पूर्णतः पारदर्शक असून, सर्व प्रक्रिया ऑनलाइन होते. त्यामुळे संस्थेचे कामकाज पेपरलेस आहे. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांना थेट वेबसाइटवर अर्ज करावा लागतो. अधिक माहिती आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाकडून मिळू शकते.

काही नियम :

- अर्जदाराने अमृत संस्थेच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषांची पूर्तता करणे बंधनकारक आहे.

- प्रशिक्षणार्थी लाभार्थ्याचे वय १८ ते ५५ वर्षांदरम्यान असावे.

- उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असावा.

- शेतकरी कुटुंबातील उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.

- अन्य सर्व कागदपत्रांसह वैद्यकीय अधिकाऱ्याकडून फिटनेस दाखला घेणे आवश्यक.

संपूर्ण माहिती आणि ऑनलाइन अर्जासाठी लिंक :

या योजनेविषयीची सविस्तर माहिती पुढील लिंकवर उपलब्ध असून, त्या लिंकवरूनच योजनेसाठी अर्ज करता येतो. https://app.mahaamrut.org.in/amrut-new/scheme/245

अधिक माहितीसाठी

अमृत संस्था मुख्यालय : पाचवा मजला, अमृत इमारत, भीमसेन जोशी सभागृहाजवळ, वॉर्ड क्र. ८, पीएमआरडीए, औंध, पुणे - ४११०६७

ई-मेल : info@mahaamrut.org.in

मोबाइल : 9730151450

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

अमृत संस्थेच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांचे अनुभव वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


(निवडक शासकीय योजनांची माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)



Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 25-04-2026 News publication date | Time: 10:54 AM News publication time | Views: 3,111 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 25-04-2026 News publication date | Time: 10:54 AM News publication time | Views: 3,111 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement