काशीचा कोतवाल म्हणून प्रसिद्ध असलेले देवस्थान
सोनारी : धाराशिव जिल्ह्याच्या परांडा तालुक्यातील श्री क्षेत्र सोनारी येथे लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी यांचा वार्षिक यात्रोत्सव नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. 'काळभैरवनाथाच्या नावानं चांगभलं' अशा जयघोषाने आणि गुलालाच्या उधळणीने संपूर्ण सोनारी नगरी भक्तिमय झाली होती.
यात्रेचे मुख्य आकर्षण असलेला रथोत्सव चैत्र वद्य त्रयोदशीला दुपारी झाला. हजारो भाविकांनी नक्षीदार रथाला कासरा लावून दर्शन घेतले. चैत्र वद्य अष्टमीला रात्री १२ वाजता काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी माता यांचा विवाहसोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडला. मंदिर परिसर आणि पालखी मार्गावर भाविकांनी मोठ्या प्रमाणात गुलाल-खोबऱ्याची उधळण केली. त्यामुळे परिसर केशरी रंगात न्हाऊन निघाला होता.
या रथोत्सवासाठी महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगण राज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी आले होते. प्रशासनाने पिण्याचे पाणी, आरोग्य आणि सुरक्षेची चोख व्यवस्था केली होती. विद्युत रोषणाई आणि सजावटही करणात आली होती. सर्वांना आनंद घेण्यासाठी छोटे-मोठे पाळणे आणि इतर खेळण्यांची दुकानेही होती. काशीचा कोतवाल म्हणून प्रसिद्ध असलेले हे देवस्थान भाविकांच्या श्रद्धेचे मोठे केंद्र असून, या वर्षीही यात्रेला उत्तम प्रतिसाद मिळाला.
- अमित देशमुख (आनाळा)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment