भारत विकास परिषद दिव्यांग केंद्र, स्कॉन प्रो. फाउंडेशनतर्फे उपक्रम; २४ मे रोजी रत्नागिरीत मोजमाप शिबीर; नोंदणीचे आवाहन
रत्नागिरी : पुण्यातील भारत विकास परिषद दिव्यांग केंद्र, स्कॉन प्रो. फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ स्कॉन प्रो यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांना मोफत कृत्रिम पाय देण्यात येणार आहेत. याकरिता रत्नागिरीत २४ मे २०२६ रोजी एका मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विश्वस्त विनय खटावकर आणि शिबीर समन्वयक अॅड. दीपक पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रत्नागिरी जिल्हा, कोकण किनारपट्टी आणि गोवा परिसरातील दिव्यांग बांधवांना याचा उपयोग होणार आहे.
रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात हे मोजमाप शिबीर होणार आहे. याद्वारे ३०० गरजू दिव्यांगांना उच्च दर्जाचे आधुनिक 'मॉड्युलर' कृत्रिम पाय मोफत दिले जाणार आहेत. यापूर्वी अशी शिबिरे चिपळूण, मार्गताम्हाणे येथे झाली होती. आता ३००हून अधिक दिव्यांग व्यक्ती आल्या, तरीही त्यांना पाय मोफत देण्याची तयारी ठेवल्याची माहिती या वेळी देण्यात आली.
श्री. खटावकर यांनी आधुनिक मॉड्युलर तंत्रज्ञानाचे महत्त्व विशद केले. त्यांनी सांगितले, की बाजारात या आधुनिक कृत्रिम पायांची किंमत ५० हजार रुपयांपेक्षा जास्त आहे; मात्र स्कॉन प्रो. फाउंडेशनच्या सामाजिक निधीतून हे पाय पूर्णपणे मोफत दिले जाणार आहेत. हे पाय पारंपरिक जयपूर फूटपेक्षा अत्यंत वेगळे आणि प्रगत आहेत. वजनाने हलके आणि 'ऑटोफोल्ड' सुविधा असलेले हे पाय बसवल्यानंतर दिव्यांगाना चालता तर येईलच; पण धावणे, पोहणे, उडी मारणे, वाहन चालवणे आणि शेतीची कष्टाची कामेदेखील सहजपणे करता येऊ शकतात. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे दिव्यांग व्यक्तीचे परावलंबित्व संपून ती सन्मानाने स्वावलंबी जीवन जगू शकणार आहे.
गिनीज बुकमध्येही नोंद
भारत विकास परिषदेचे पुण्यातील केंद्र गेल्या २५ वर्षांपासून कार्यरत असून, दर वर्षी सुमारे पाच हजार दिव्यांगांना कृत्रिम अवयव आणि कॅलिपरचे वाटप केले जाते. एप्रिल २०२५मध्ये एकाच शिबिरात ८९२ दिव्यांगांना कृत्रिम पाय बसवून या केंद्राने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जागतिक विक्रमाची नोंद केली आहे.
रत्नागिरी जिल्हा, कोकण किनारपट्टी आणि गोवा परिसरातील दिव्यांग बांधवांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शिबिरासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून, नोंदणीसाठी श्री. कुलकर्णी (९३७१०८८९११) किंवा श्री. संजीव (७०२८०४५९५५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिबिराच्या ठिकाणी येणाऱ्या दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्या सोबत असलेल्या सहायकांसाठी स्कॉन प्रो. उद्योग समूहातर्फे मोफत भोजन, चहाची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती कंपनीचे अधिकारी राहुल पुरकर यांनी दिली.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment