दोन दिवसांत स्थानिक लघुउद्योजकांच्या सुमारे दीड लाख रुपयांच्या मालाची विक्री
अकोला : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने अकोल्यात डॉ. पार्थसारथी शुक्ल सभागृहात आयोजित केलेल्या अमृतपेठ थेट बाजारपेठ या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. दोन दिवसांत एक लाख ४७ हजार रुपयांच्या मालाची विक्री झाली. अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष शंतनू जोशी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सहकार्यवाह अजय नवघरे, डॉ. पार्थसारथी शुक्ल, डॉ. केसान, डॉ. मंत्री, डॉ. भागवत, डॉ. तुळजापुरे, श्री. राठी आणि डॉ. बगाडिया यांची आदी मान्यवर उपस्थित होते.
२८-२९ मार्च रोजी भरलेल्या या बाजारपेठेत ज्वेलरी, कपडे, खाद्यपदार्थ, फळे, पूजासाहित्य, घरगुती उपयोगाच्या वस्तू, तसेच दिव्यांग उद्योजकांचे स्टॉल्स होते. मान्यवरांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन उद्योजकांशी संवाद साधला आणि खरेदी करून त्यांना प्रोत्साहन दिले.
या उपक्रमात अनेक लघुउद्योजकांनी उत्साहाने सहभाग घेतला. त्यापैकी काही अमृत संस्थेच्या योजनांचे लाभार्थी होते, तर काहींनी प्रथमच अशा प्रकारच्या प्रदर्शनात सहभाग घेतला. नागरिकांकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे स्टॉलधारकांच्या उत्पादनांची चांगली विक्री झाली असून, एक लाख ४७ हजार रुपयांची उलाढाल झाली. त्यामुळे उद्योजकांना समाधान मिळाले आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता.
उद्योजकांनी सांगितले, की अशा प्रदर्शनांचे नियमित आयोजन झाल्यास त्यांना नवीन ऊर्जा मिळेल आणि व्यवसायवृद्धीला मोठी चालना मिळेल. यातून नवउद्योजकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी सकारात्मक दृष्टिकोन मिळाला. सहभागी झालेल्या उद्योजकांना अमृतपेठ या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मबाबत माहिती देण्यात आली. त्यातून त्यांना डिजिटल माध्यमातून व्यवसाय विस्ताराची नवी संधी उपलब्ध होणार आहे.
मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहायता निधी आणि अकोल्यातील धर्मादाय रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने या वेळी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एकंदरीतच, अमृतपेठ थेट बाजारपेठ हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला असून, लघुउद्योजकांसाठी प्रेरणादायी आणि विकासाला चालना देणारा ठरला आहे.
या उपक्रमातून दिव्यांग उद्योजकांनाही व्यासपीठ मिळाले. त्याविषयी वाचा पुढील लिंकवर... https://amrutmaharashtra.org/news.php?id=1365
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment