आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने...
आठ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन. या खास दिवसाची कहाणी जाणून घ्यायची असेल, तर १९०८पर्यंत मागे जावे लागेल. तेव्हा १५ हजार महिलांनी न्यूयॉर्क शहरात परेड काढली. कामाचे तास कमी करावेत, अशी मागणी या महिलांनी केली. पगारात सुधारणा व्हायला हवी, महिलांनाही मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, असेही त्यांना वाटत होते. या चळवळीच्या एक वर्षानंतर म्हणजे १९०९मध्ये अमेरिकेच्या सोशलिस्ट पार्टीने महिलांसाठी एक दिवस समर्पित करण्याचा निर्णय घेतला. पहिला राष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याची घोषणा केली. हा खास दिवस आंतरराष्ट्रीय बनवण्याचा विचार क्लॅरा झॅटकिन यांच्या मनात आला. झॅटकिन या एक सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्यांनी नेहमीच महिलांचे प्रश्न जोरदारपणे मांडले. १९१०मध्ये डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन येथे भरलेल्या नोकरदार महिलांसाठीच्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत झॅटकिन यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन सुरू करण्याची कल्पना मांडली. १९११मध्ये जर्मनी, ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंडमध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. १९७७मध्ये जेव्हा संयुक्त राष्ट्रांनी तो साजरा करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याला औपचारिक मान्यता मिळाली. संयुक्त राष्ट्रांनी महिला दिनासाठी आठ मार्च ही तारीख निश्चित केली. तेव्हापासून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो.
या निमित्ताने, आपल्या भारतात महिलांचा ‘काल’ कसा होता, ‘आज’ त्या कुठे आहेत? आणि भारताच्या महिलांची भविष्यकालीन स्थिती काय असेल, याचा ऊहापोह करण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.
एक नावाडी रोज नदीत मासेमारी करायचा. नदीपात्रात जाऊन जाळे टाकून मासे मिळवायचा. त्या नदीच्या पैलतीरावर खूप छान झाडे होती. अनेक पक्षी त्याला दिसायचे. हिरवी झाडे, त्यातून जाणारी पायवाट! सगळे कसे मोहून टाकणारे. त्याला फार उत्सुकता वाटत होती, की बाहेरून इतका सुंदर दिसणारा तो पैलतीर प्रत्यक्षात किती मनमोहक असेल ना! आपल्या गावातील गजबज, गर्दी काहीच नसेल तिथे. तो ठरवतो, आपण पैलतीरावर जायचे. बघू तरी काय वेगळे आहे तिथे? ती मोठी रुंद नदी तो पार करतो. आपली सगळी शक्ती लावून ती नाव वल्हवतो. पैलतीरावर पोहोचतो. तिथे पोहोचल्यावर तो अगदी सुखावतो. किती सुंदर निसर्ग! शांतता, स्वच्छता. तो जसजसा त्या बेटाच्या आत जातो, तसतशी त्याला मानवी वस्ती दिसू लागते; पण जेव्हा गाव सुरू होते, तेव्हा त्याला दिसते, की तिथेसुद्धा तीच गर्दी, तोच गोंगाट, तीच भांडणे, तेच वाद म्हणजे वेगळे असे काही नाही! खिन्न मनाने तो परत आपल्या मूळ ठिकाणी येतो. ही गोष्ट वाचून तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल की, या गोष्टीचा आणि लेखाचा काय संबंध? परंतु जरा बारकाईने ही गोष्ट वाचलीत, तर आपल्या लक्षात येईल, की आजच्या आपल्या भारतीय महिलांची स्थिती अशीच आहे ना? पाश्चात्य संस्कृतीच्या मागे लागून आपण महिला स्वातंत्र्य, स्त्री-पुरुष समानता (नको तिथे आणि नको तितकी) अशा गोष्टींच्या मागे लागलो आणि एके काळी महिला केंद्रित असणाऱ्या संस्कृतीचा आपल्याला पार विसर पडला. यासाठी आपण अगदी वैदिक काळात जाऊ या!
अहल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा।
पंचकन्या स्मरेन्नित्यं महापातकनाशनम् ।।
अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा आणि मंदोदरी या पाच पतिव्रता स्त्रियांचे स्मरण केल्यास मोठमोठी पापे नाश पावतात, असा या श्लोकाचा अर्थ. या पंचकन्यांतील एक एक स्त्री लक्षात घ्या. फक्त पतिव्रता म्हणून त्यांचे उदाहरण दिलेले नाही. अहिल्या ही महर्षी गौतम यांची पत्नी. अन्याय सहन करूनही धर्म न सोडणारी क्षमाशील वृत्ती असणारी, क्षमा आणि शुद्धतेचे प्रतीक. द्रौपदी जिचे पती पाच पांडव होते, भाऊ प्रत्यक्ष विष्णूचा अवतार होता. परंतु भर सभेत अपमान होऊनही श्रद्धा आणि न्यायासाठी लढणारी शक्ती म्हणजे द्रौपदी, सामर्थ्य आणि निग्रहाचे प्रतीक. सीता प्रत्यक्ष प्रभू श्रीरामांची अर्धांगिनी. इतकी शक्तिशाली होती, की तिने एकटीने राक्षससेनेला पराभूत केले असते. परंतु कर्तव्य आणि त्याग यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सीता - आदर्श पत्नीचे प्रतीक. तारा ही वानरराज वालीची पत्नी. अत्यंत हुशार, राजकारणी आणि मुत्सद्दी असलेल्या ताराने वालीच्या मृत्यूनंतर सुग्रीवाच्या राज्याला स्थिरता दिली. ती बुद्धिमत्ता आणि धैर्याचे प्रतीक. मंदोदरी ही रावणाची राणी. राक्षसांचा राजा रावणाची पत्नी असूनही, मंदोदरी अत्यंत धार्मिक, नीतिमान आणि समंजस होती. तिने रावणाला अनेकदा योग्य सल्ला देण्याचा प्रयत्न केला. मंदोदरी निष्ठेचे प्रतीक.
या प्रत्येक स्त्रीची परिस्थिती वेगळी होती. संघर्ष वेगळा होता, वेदना भिन्न होत्या; पण त्यांनी मूल्य आणि पवित्रता कधी सोडली नाही. अशा कितीतरी वैदिककालीन महिलांची उदाहरणे आपल्याला देता येतील. ऋषी वचक्नूंची कन्या गार्गी एक महान तत्त्वज्ञानी आणि द्रष्टी होती. तिने राजा जनकाच्या दरबारात पुरुष विद्वानांना ज्ञानाच्या संवादात आव्हान दिले होते. लोपामुद्रा ही अगस्त्य ऋषींची पत्नी. तिचे वेदांच्या रचनेत योगदान आहे. मैत्रेयी ही ऋषी याज्ञवल्क्यांची पत्नी. तिने भौतिक सुखाऐवजी आध्यात्मिक ज्ञानाला प्राधान्य दिले. घोषा ही वैदिक काळातील द्रष्टी महिला. तिने अनेक ऋचांची (स्तोत्रांची) रचना केली. सुलभा ही तत्त्वज्ञानी विदूषी. अदिती ही पौराणिक कथेनुसार देवांची माता. अनसूया ही अत्री ऋषींची पत्नी. ती आपल्या पतिव्रता धर्मासाठी आणि पातिव्रत्य शक्तीसाठी प्रसिद्ध आहे. वेदना मनात ठेवून कर्तव्य निभावणारी माता म्हणजे कुंती.
मध्ययुगीन कालखंडातील राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, महाराणी ताराराणी, राणी दुर्गावती, राणी चेन्नमा, संत मुक्ताबाई, संत मीराबाई आणि १९व्या शतकाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले, डॉ. आनंदीबाई जोशी, रमाबाई रानडे अशा कितीतरी पराक्रमी, प्रतिभावान स्त्रिया होऊन गेल्या. त्यांनी केवळ रणांगणातच नाही, तर अध्यात्म, राजकारण, समाजव्यवस्था, न्यायव्यवस्था अशा अनेक क्षेत्रांत आपल्या कर्तृत्वाने इतिहासात अढळ स्थान प्राप्त केले. आपला भूतकाळ इतका समृद्ध असताना भारतीय महिलांची स्थिती दयनीय होती असे म्हणणे चुकीचे नाही का? आपली स्थिती कधीच दयनीय नव्हती. स्त्री स्वातंत्र्याचे याहून उत्तम उदाहरण कोणते असेल? वर उल्लेख केल्याप्रमाणे पाश्चात्य देशांत महिलांना मतदानाचा हक्क प्राप्त होण्यासाठी १९०८ साल उजाडावे लागले. परंतु आपल्या वैदिक काळातील महिला तर त्याआधी शेकडो वर्षे प्रत्यक्ष राजकारणात सहभाग घेत होत्या. पुरुषांच्या बरोबरीने युद्धकला, शस्त्रकला, राजकारण यांचेही धडे गिरवत होत्या.
भारतावर परकीय आक्रमणे सुरू झाली, तेव्हा मुघल आणि इतर इस्लामिक आक्रमणांमुळे महिलांची सामाजिक स्थिती बिकट झाली. परकीय आक्रमकांच्या भीतीमुळे हिंदू स्त्रियांचे रक्षण व्हावे म्हणून अनेक कुप्रथा जोर धरू लागल्या. वैदिक काळाच्या तुलनेत या काळात महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवले गेले आणि त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्यात आले. आक्रमकांपासून संरक्षणासाठी महिलांना घराच्या आत राहण्यास भाग पाडले गेले. त्यामुळे त्यांच्या सामाजिक सहभागावर मर्यादा आल्या. थोडक्यात, परकीय आक्रमणांनी महिलांना सन्मानाने जगण्यापासून वंचित केले आणि त्या अनेक सामाजिक बंधनांत अडकल्या गेल्या. परंतु अशा स्थितीतही सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई अशा अनेक स्त्रिया लढल्याच ना? त्यांनी समाजातील स्त्रियांचे अस्तित्व नुसते टिकवलेच नाही, तर त्याला एका वेगळ्याच उंचीवर नेले. या स्त्रिया तर प्रत्यक्ष कर्तृत्व गाजवणाऱ्या होत्या. परंतु आपल्या समाजातील थोर पुरुषांच्या सहचारिणी कशा जगल्या असतील याचीही कल्पना करून पाहा! प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे म्हणतात, तेच या स्त्रियांनी सिद्ध केले. स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, महर्षी कर्वे, आगरकर, चापेकर बंधू असे कितीतरी थोर पुरुष! या थोर पुरुषांबरोबर संसार करताना त्यांनीसुद्धा आपल्या परीने समाजसेवाच केली. हे सगळे करताना आपल्या परंपरा सांभाळल्या. जगाने अवहेलना केली, तीसुद्धा सहन केली. हे करताना माझी ओळख काय, याचा विचार केला नाही. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यात एक सूक्ष्म रेषा आहे. स्त्रीस्वातंत्र्य, समानता याचे आता नको इतके अवडंबर झाले आहे. भारतीय महिला स्वैराचाराकडे चालल्या आहेत का?
महिलांवरील अत्याचार, महिलांचा घेतला जाणारा गैरफायदा, घरगुती हिंसाचार याकडे दुर्लक्ष करून चालणारच नाही. त्यावर निर्बंध घालणे गरजेचेच आहे. मुळात हा मुद्दा स्त्री-पुरुष असा नाही, तर विकृत मानसिकतेचा आहे. असे म्हणत असताना हे लक्षात घेतले पाहिजे, की या विषयाला अनेक कंगोरे आहेत आणि विषय जगभर आहे. यावर ताबडतोब आणि कायमस्वरूपी उपाय होणे आत्यंतिक गरजेचे आहे; पण आता सर्वसामान्य महिला काही ठिकाणी या साऱ्या मोकळेपणाचा नको तो फायदा घेतात. उलटपक्षी त्याचे नुकसान मात्र साऱ्या बायकांना भोगावे लागते. त्यांच्या या स्वैराचारी वागण्याला अर्थ आहे का? पुढच्या पिढीला सुसंस्कृत बनवले पाहिजे. मानसिकता बदलायला हवी. आपण शिकतो, पहिला-दुसरा नंबर मिळवतो तो कशासाठी? रांधा, वाढा, उष्टी काढा यासाठी? अजिबातच नाही; पण हा मोकळेपणा अनुभवताना आपण आपल्या जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक आहे. कधी कधी गप्पा मारता मारता बायका सहज बोलतात, "पूर्वी बरं होतं ना!!! पुरुष बाहेर जाऊन कमवायचे आणि बायका घरचं बघायच्या... दोघांनाही ताण नाही." आज स्त्री इतक्या उंचीवर असताना, सर्व क्षेत्रांत पुढे असताना तिच्या मनात ही खंत का असावी, की आपण संसार नीट करू शकत नाही, आपण मुलांवर संस्कार करताना कमी तर पडत नाही? घरचे कुळाचार, परंपरा नीट पाळू शकत नाही. आहे का याचे उत्तर आपल्याकडे? आपण आपल्या कुटुंबव्यवस्थेची बलस्थाने सोडून दिली आहेत का? आर्थिक, व्यक्तिगत स्वातंत्र्य मिळवण्याच्या नादात आपली मानसिक शांती गमावली आहे का? कुटुंबव्यवस्थेतून मिळणारी ‘सपोर्ट सिस्टीम’ गेली आहे का? मग आपण पुढे जातोय की मागे? आपली यशाची, उन्नतीची मानके/प्रमाण काय आहेत? एवढे स्त्रीस्वातंत्र्य असतानाही समाजात महिलांवरचे अत्याचार वाढतच आहेत. उलट इंटरनेट क्रांतीने यात भरच घातली आहे. आपण उन्नतीकडे जातोय की अधोगतीकडे, या सगळ्याचा विचार या महिला दिनाच्या निमित्ताने होणे गरजेचे आहे.
गोष्टीतील नावड्यासारखी आपली स्थिती झाली आहे. ज्या जगाची आपल्याला ओढ असते, ते प्रत्यक्षात आपल्यासमोर आले की आपल्याला त्यातील खाचखळगे समजतात. आपण आज अस्थिर आणि सैरभैर तरुणाई बघतो, लहान-मोठ्या शहरातील घटस्फोट, लैंगिक अत्याचाराच्या समस्या, धर्मांतरण, ढासळती कुटुंबव्यवस्था बघतो, तेव्हा पुन्हा पुन्हा हे प्रश्न निर्माण होतात. भारतीय महिलांचे भविष्य काय? उत्तम नोकरी, सुखासीन आयुष्य, करिअरचा चढता ग्राफ, अमर्याद स्वातंत्र्य मिळूनही आपण सुखी-समाधानी आहोत का? काहीतरी चुकतेय, कुठे आणि कसे? हे आपण जाणतोय. कळतेय, पण वळवता येत नाहीये. आपला ‘आज’ असा आहे, तर ‘उद्या’ काय? एके काळी आपण शिक्षणासाठी, समानतेसाठी, माणूस म्हणून हक्क मिळवण्यासाठी लढलो, आता स्वैराचाराविरुद्ध (स्त्री-पुरुष दोघांच्या बाबतीतला) लढण्याची वेळ आली आहे का? मग तुम्हीच सांगा कोणता तीर चांगला... ऐलतीर की पैलतीर? आहे का उत्तर याचं? कारण आता विचार नाही, तर कृती करण्याची वेळ आली आहे आणि आपण तर मातृशक्ती आहोत ना! मग करायची ना सुरुवात, या महिला दिनाच्या निमित्ताने...
Comments 3 Comments
rhutugandha joshi
खूप सुंदर लेख...
Sadanand Kasture
खूप छान लेख. असेच चांगले विचार मांडत लिहीत जा. माझ्या मित्राची मुलगी म्हणून सांगत नाहीये तर तुझे खरच खरं कौतुक आहे. तुझी लेखणी ज्या पद्धतीने चालते त्याला तोड नाही. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
Vivek Tarte
सौ.कौमुदी परांजपे यांनी 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त खूप छान लेख लिहिला आहे,त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा.
Write a Comment