माझिया मना- लेख क्रमांक-६
आजकाल कुणालाही विचारलं, "काय मग, कसं चाललंय?" तर अनेकदा उत्तर येतं – "काय सांगू... काहीच ठीक नाही!" “ आमचं आपलं रोजचंच”. पण काही लोक मात्र अगदी हसत म्हणतात, "आमचं मस्त चाललंय!" हे म्हणताना त्यांचा चेहरा ही समाधानी आणि प्रसन्न दिसत असतो.
आपल्याला प्रश्न पडतो की खरंच त्यांचं सगळं मस्त असतं का? त्यांच्या घरी वाद होत नाहीत का? त्यांच्यावर कर्ज नसतं का? मुलांच्या शिक्षणाची काळजी नसते का? ऑफिसचा ताण नसतो का? आणि आरोग्याच्या समस्या नसतात का?
तर असं अजिबात नाही! ती ही समाजातलीच माणसं आहेत, त्यांना ही आपल्या सारखीच समस्या आणि काळजी आहे पण ते त्याच्यावर विचार करत बसण्यापेक्षा वर्तमानात राहतात आणि आनंदी राहतात म्हणजे फरक एवढाच असतो की त्यांनी परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो.
एका कुटुंबात सकाळी मुलगा शाळेसाठी उशिरा उठतो, आईची घाई सुरू असते, बाबा ऑफिसला निघायच्या तयारीत असतात. घरात थोडी धावपळ, थोडा गोंधळ होतो. पण रात्री सगळे एकत्र बसून जेवतात, दोन विनोद होतात आणि दिवस आनंदात संपतो. दुसऱ्या एका घरातही हेच घडतं. पण तिथे दिवसभर प्रत्येक जण सकाळच्या त्या गोंधळाचाच विचार करत राहतो. राग, चिडचिड आणि तणाव मनात साठत जातो आणि हा राग इतरांवर काढत राहतो.
घटना दोन्हीकडे सारखीच होती पण फरक फक्त दृष्टीकोनाचा होता. समोरच्या परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला की सगळ्या गोष्टींमुळे तणाव न निर्माण करता, गोष्टी आपल्या मनाप्रमाणे करता येतात.
आपल्या आयुष्यातही असंच असतं. पावसात कपडे भिजले म्हणून दिवसभर नाराज राहायचं, की पाऊस पडतोय म्हणजे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलत असेल, असा विचार करायचा?
वाहतूक कोंडीत अडकून वैतागायचं, की "बरं झालं, थोडा वेळ स्वतःसोबत मिळाला," असं म्हणत एखादं छान गाणं ऐकायचं? मुलांनी घर अस्ताव्यस्त केलं म्हणून रागावायचं, की "घरात मुलांचा आवाज आहे, हीच तर खरी श्रीमंती आहे," असं म्हणत हसायचं? खरं तर मनाचा आनंद हा ह्याच छोट्या छोट्या गोष्टीत दडलेला असतो आणि एकदा आनंदी रहायची सवय लागली की ती सोडवणं फार अवघड असतं. आता आनंदी आणि समाधानी राहण्यासाठी काय केलं पाहिजे? तर तुमच्या रोजच्या दिवसातलेच प्रसंग नीट बघा. आईच्या हातचा गरम चहा, बाबांचं काळजीने विचारलेलं "जेवलास का?" मुलाचं अचानक येऊन काहीतरी उत्साहाने सांगणं, जुन्या मित्राचा फोन येणं किंवा संध्याकाळी घरी गेल्यावर सगळ्यांबरोबर टी.व्ही बघताना केलेला विनोद.
हीच तर खरी संपत्ती आहे. आपल्याला नैराश्य बहुतेक वेळा परिस्थितीमुळे नाही, तर आपण सतत काय गमावलं याचाच विचार करत राहतो म्हणून येतं. तिथे नेहमी आपल्याला जे मिळालंय ते इतर काही जणांना अजून मिळालं नाहीये हे लक्षात ठेवायला लागतं. तेव्हा मनाला आहेत त्यात समाधान जाणवायला लागतं आणि त्याचीच सवय लागते. ज्या दिवशी आपण जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहायला शिकतो, त्या दिवशी मन हलकं व्हायला लागतं.
खरं तर ह्या स्पर्धेच्या युगात जीवनात संकटं हे येणारच. कुठेतरी पैशांची चण-चण, कुठेतरी नात्यातले गोंधळ, अविश्वास, त्रास, त्रागा, इ. कोणाचंच आयुष्य सरळ रेषेसारखं नसतं. पण प्रत्येक वादळानंतर आकाश पुन्हा निळं होतंच. त्या क्षणाची आपल्याला वाट बघायची आहे. चला तर मग आजपासून एक छोटासा प्रयोग करून बघा. कोणी विचारलं, "कसं चाललंय?"
तेव्हा उत्तर द्या "आमचं मस्त चाललंय!" म्हणून तर बघा ह्या एका वाक्याने तुमचा दिवस किती छान जातो ते.
—डॉ. मीताली मोरे
औद्योगिक मानसशास्त्रज्ञ आणि करिअर मार्गदर्शक
अमृत मानस मित्र समिती सदस्य.
माझिया मना- लेख-क्र.१ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
'आनंद' हा योगायोग आहे की सवय?
https://amrutmaharashtra.org/news.php?id=1953
माझिया मना- लेख-क्र.२ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती घडवूया ..
https://amrutmaharashtra.org/news.php?id=2036
माझिया मना- लेख-क्र.३ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
मानसिक आरोग्याचे वाढते संकट : भारतीय गुरुकुल परंपरा, प्राणायाम आणि ध्यान हा शाश्वत मार्ग
https://amrutmaharashtra.org/news.php?id=2163
माझिया मना- लेख.क्र.४ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
कृतज्ञता : आनंदी राहण्याचा उत्तम उपाय
https://amrutmaharashtra.org/news.php?id=2298
माझिया मना- लेख.क्र.५ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
भारतीय कुटुंब... माणूस घडवण्याचा प्रवास!
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment