१८५७च्या स्वातंत्र्यलढ्यातील धगधगती मशाल म्हणजे तात्या टोपे. १६ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिन. त्यानिमित्त त्यांचा कार्य परिचय...
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाला ‘राष्ट्रीय अस्मितेचा लढा’ म्हणून संबोधले होते. अनेक वीरांनी या स्वातंत्र्यसंग्रामात आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते. वेगवेगळ्या भागातील, पंथांची, विचारांची माणसे एकत्र येऊन लढली होती. या सर्व लढ्याचे नेतृत्व करणारे नेतेसुद्धा खूप पराक्रमी होते. या नेतृत्व करणाऱ्या मंडळींपैकी एक नाव म्हणजे तात्या टोपे. १६ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिन. त्या निमित्ताने त्यांचा कार्याचा अल्प-परिचय...
इंग्रजांविरुद्ध मुकाबला करणारा १८५७ च्या उठावातील एक प्रसिद्ध सेनानी म्हणजे तात्या टोपे. त्यांचे संपूर्ण नाव रामचंद्र पांडुरंग भट (येवलेकर). टोपे या त्याच्या आडनावाबद्दल तज्ज्ञांत एकमत नाही. तरीसुद्धा त्या संदर्भात दोन भिन्न मते आहेत - एक म्हणजे बाजीराव पेशव्यांनी त्यांना एक मौल्यवान टोपी दिली होती. दुसरे मत असे, की काही दिवस त्यांनी इस्ट इंडिया कंपनीच्या तोफखान्यावर काम केले. त्या वेळपासून हे नाव रूढ झाले असावे. प्रथम ते पेशव्यांकडे तोफखान्यावर नोकरीला होते. त्यांनी मध्य भारतात अनेक संस्थानिकांकडे तोफखान्यावर काम केले. पुढे ते ब्रह्मावर्त येथे नानासाहेब पेशव्यांकडे नोकरीला होते. झाशीहून निसटून आलेल्या राणी लक्ष्मीबाईंनी पेशव्यांना ग्वाल्हेर जिंकायचा सल्ला दिला. तात्यांनाही तो पटला. ग्वाल्हेरचे शिंदे क्रांतिपक्षाला येऊन मिळण्यात उदासीन होते. त्यांनी क्रांतिकारकांसमवेतच युद्ध चालू केले; पण तात्यांना समोर पाहताच शिंद्यांचे सारे सैन्य तात्यांना येऊन मिळाले. तात्यांनी मग रावसाहेब पेशव्यांच्या आधिपत्याखाली ग्वाल्हेरला एक स्वतंत्र राज्यच प्रस्थापित केले.
तीन जून १८५८ या दिवशी रावसाहेब पेशव्यांनी भर राजसभेत एक रत्नजडित तलवार देऊन तात्यांना सेनापतिपदाचा मान दिला. तात्या टोपे यांनी १८५७मध्ये सैन्याची जमवाजमव करून नानासाहेब, लक्ष्मीबाई वगैरेंच्या मदतीने इंग्रजांशी अनेक ठिकाणी मुकाबला केला, काही महत्त्वाची स्थळे जिंकली. १८५७चा उठाव मेरठ, दिल्ली, लाहोर, आग्रा, झांशी, ग्वाल्हेर इत्यादी ठिकाणी पसरला. उठावात तात्या टोपे यांनी नानासाहेब पेशव्यांना संपूर्ण सहकार्य देऊन नानासाहेबांबरोबर वाराणसी, अलाहाबाद इत्यादी ठिकाणी दौरे काढले. जून १८५७मध्ये जनरल हॅवलॉकने कानपूरला वेढा दिला, त्या वेळी तात्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. पुढे त्यांनी कानपूरवर हल्ला करण्यासाठी विठूरला मुक्काम ठोकला. परंतु तेवढ्यात १६ ऑगस्ट १८५७ रोजी हॅवलॉक विठूरवर चालून गेला. तात्या व त्यांचे सहकारी शौर्याने लढूनही इंग्रजच जिंकले. शिंद्यांचे सैन्य आपल्या बाजूला वळवून घेण्यासाठी तात्या व रावसाहेब ग्वाल्हेरला गेले. तेथून पुढे जाऊन त्यांनी काल्पी येथे छावणी केली. १८५७च्या नोव्हेंबरमध्ये त्यांनी कानपूरवर चढाई करून जनरल विनडॅमचा पराभव केला आणि कानपूर शहर ताब्यात घेतले. परंतु थोड्याच दिवसांत सर कोलिन कँबेलने अचानकपणे हल्ला करून तात्या टोपे यांचा पराभव केला.
कानपूर जिंकण्याचा प्रयत्न फसला, तरी इंग्रजांना हैराण करण्याची त्यांची जिद्द कमी झाली नाही. याच सुमारास सर ह्यू रोझच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी झाशीला २२ मार्च १८५८ रोजी वेढा दिला. तात्या झाशीच्या लक्ष्मीबाईच्या मदतीस धावून गेले. परंतु ह्यू रोझपुढे त्यांचा निभाव लागला नाही. त्यांना माघार घ्यावी लागली. तात्या, लक्ष्मीबाई व रावसाहेब यांनी एकत्र होऊन ग्वाल्हेरवर हल्ला केला. ग्वाल्हेर काबीज केले; पण सर ह्यू रोझने ते पचू दिले नाही. या युद्धात लक्ष्मीबाई मरण पावली. तात्यांनी यापुढे गनिमी काव्याने इंग्रजांना हैराण करण्याचे ठरवले. त्यांना पकडण्यासाठी इंग्रजांनी त्यांचा एक वर्षभर पाठलाग केला. या पळापळीत २१ जून १८५८ ते ९ ऑक्टोबर १८५८ पर्यंत जावरा, अलीपूर, राजगढ, इसागढ, चंदेरी, मंग्रौली इत्यादी ठिकाणी तात्यांनी लढाया जिंकल्या. १० ऑक्टोबर १८५८ रोजी मंग्रौली गावी तात्यांचा पराभव झाल्यावर ललितपूर येथे त्यांची व रावसाहेबाची गाठ पडली.
इंग्रज त्यांच्या पाठलागावर असताना त्या दोघांनी महाराष्ट्रात शिरण्याचा प्रयत्न केला. नागपूर, मंदसोर, झिरापूरवरून ते कोटा संस्थानात नाहरगढला गेले. इंद्रगढला त्यांनी १३ जानेवारी १८५९ रोजी फिरोजशहाची भेट घेतली. फिरोजशहा व तात्या देवास येथे थांबले. तेथे इंग्रजांनी छापा घातला. फिरोजशहाने तात्याला सोडल्यामुळे, तात्या शिंद्यांचे सरदार मानसिंग यांच्या आश्रयास गेले. परंतु मानसिंगाच्या विश्वासघातामुळे जनरल मीडने तात्यांना कैद केले. त्यांना प्रथम सीप्री येथे नेण्यात आले. त्यांचे धैर्य व गंभीर वृत्ती शेवटपर्यंत ढळली नाही. सतत पराभव होऊनही ते शेवटपर्यंत डगमगले नाहीत. १८ एप्रिल १८५९ रोजी तात्यांना फाशी देण्यात आले. तात्यांबरोबर १८५७ चा स्वातंत्र्यसंग्रामही समाप्त झाला.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment