तेजःपुंज, बहुपैलू व्यक्तिमत्त्वाच्या नेत्या सुषमा स्वराज यांच्या जन्मदिनानिमित्त (१४ फेब्रुवारी) त्यांच्या व्यापक कार्याचा हा अल्पसा आढावा...
आपल्या अभ्यासपूर्ण आणि अमोघ वक्तृत्वाने देशवासीयांच्या मनावर गारूड निर्माण करणाऱ्या कणखर नेत्या, भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला परराष्ट्रमंत्री आणि उत्कृष्ट संसदपटू सुषमा स्वराज यांचे व्यक्तिमत्त्व तेज:पुंज होते.विद्यार्थी चळवळीतील कार्यकर्त्या, सर्वोच्च न्यायालयातील वकील ते केंद्रीय मंत्री हा त्यांचा प्रवास नुसताच संघर्षमय नसून थक्क करणारा आहे. १४ फेब्रुवारी या त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वाला आणि आठवणींना उजाळा देणारा हा लेख...
हरयाणाच्या अंबाला छावणीमध्ये १४ फेब्रुवारी १९५२ रोजी जन्मलेल्या स्वराज यांना त्यांच्या आजी-आजोबांनी दत्तक घेतलं होतं. सुषमा स्वराज यांचे वडील हरदेव शर्मा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते. सुषमा स्वराज यांनी अंबाला येथे सनातन धर्म कॉलेजमधून संस्कृत, तसेच राज्यशास्त्रात पदवी घेतली होती. एस. डी. कॉलेजमध्ये त्यांची उत्कृष्ट एनसीसी कॅडेट म्हणून निवड झाली होती. त्यांनी चंदीगडमधून कायद्याची पदवी घेतली होती. कॉलेजमध्ये असतानाच त्यांची भेट स्वराज कौशल यांच्याशी झाली. १३ जुलै १९७५ रोजी त्यांनी स्वराज कौशल यांच्याशी विवाह केला. या दोघांनी सोबतच सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून प्रॅक्टिसही सुरू केली होती. १९७०च्या दशकात स्वराज या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत दाखल झाल्या. त्यांचे पती स्वराज कौशल हे समाजवादी नेते होते. ते जॉर्ज फर्नांडिस यांचे निकटवर्तीय होते. त्यामुळे १९७५मध्ये सुषमा स्वराज यासुद्धा फर्नांडिस यांच्या आंदोलनाशी जोडल्या गेल्या. आणीबाणीच्या काळात त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनात सहभाग घेतला होता. आणीबाणीनंतर त्या जनता पार्टीत सहभागी झाल्या. सुषमा स्वराजही पुढे फर्नांडिस यांच्या चळवळीची कायदेशीर बाजू सांभाळू लागल्या. इतकेच नाही, तर आणीबाणीच्या काळात गाजलेल्या बडोदा डायनामाइट प्रकरणात जॉर्ज यांचा बचाव करणाऱ्या वकिली समूहात सुषमा स्वराज यांचाही समावेश होता. पुढे पती स्वराज यांनी आपली वकिली कायम ठेवली, तर आणीबाणीनंतर सुषमा स्वराज भाजपमध्ये दाखल झाल्या.
१९७७मध्ये वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी त्या हरियाणातून आमदार आणि मंत्रीही बनल्या. पुढे त्यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला आणि कधीही मागे वळून पाहिले नाही. २००९मध्ये त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या म्हणूनही काम पाहिले. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात सुषमा स्वराज यांच्यावर परराष्ट्र खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांनी परराष्ट्र मंत्रालयासारखे खाते लोकाभिमुख केलं. परराष्ट्रमंत्री असताना स्वराज यांनी अवघ्या एका ट्विटच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या भारतीयांना मोलाची मदत केली. तुम्ही जगात कुठेही असा, तुमचा देश तुमच्या मदतीसाठी तत्पर आहे, अशी भावना स्वराज यांनी परदेशात असलेल्या भारतीयांच्या मनात निर्माण केली होती. इतकेच नाही तर पासपोर्ट लवकर मिळावा म्हणून सुषमा यांनी जी ऑनलाइन सुविधा सुरू केली तो अगदी महत्त्वपूर्ण निर्णय ठरला. त्यामुळे अनेकांच्या पासपोर्टच्या अडचणी संपल्या. यासाठी त्यांनी मोबाइल अॅपदेखील आणले.
महाराष्ट्रातील निवृत्त अधिकारी असलेल्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने अटक केल्यानंतर सुषमा स्वराज यांनी ज्या पद्धतीने काम केले ते महत्त्वाचे ठरले. याच प्रकरणात त्यांनी हरीश साळवे यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू मांडण्यासाठी पाठवले. त्याचा फायदा झाला. परदेशात अडकलेल्या अनेक भारतीयांना त्यांनी ज्या प्रकारे तत्परतेने मदत केली, ती नक्कीच वाखाणण्याजोगी होती. पाकिस्तानात चुकून पोहोचलेली गीता ही दिव्यांग युवती १० वर्षांनंतर सुषमा स्वराज यांच्या प्रयत्नांनी भारतात परतली होती. २६ ऑक्टोबर २०१५ रोजी जेव्हा गीता भारतात परतली तेव्हा तिचा ‘भारत की बेटी’ असा उल्लेख त्यांनी केला होता.
सुषमा स्वराज यांचे काही विक्रम म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाच्या त्या पहिल्या महिला प्रवक्त्या ठरल्या. हरियाणात जनता पार्टीच्या त्या सर्वांत कमी वयाच्या प्रभारी ठरल्या. हरियाणा सरकारमध्ये सर्वांत कमी वयाच्या कॅबिनेट मंत्री, दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री, राष्ट्रीय पातळीवर भाजपच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री, आउटस्टँडिंग पार्लमेंटरियन पुरस्कार मिळवणाऱ्या एकमेव महिला खासदार, मोदी सरकारमधील पहिल्या पूर्णवेळ महिला परराष्ट्र मंत्री, २००९मध्ये लोकसभेत पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या... असे अनेक विक्रम त्यांच्या नावावर आहेत.
सुषमा स्वराज यांच्याकडे ओघवती वक्तृत्वशैली होती. ११ जून १९९६ रोजी तत्कालीन केंद्र सरकारविरुद्धच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी केलेल्या भाषणाने सर्वांना मंत्रमुग्ध केले होते. त्या वेळी त्यांनी लोकशाही, जनादेश यांच्या व्याख्या करताना रामायण, महाभारत यातील यथोचित दाखले दिले होते. उत्तम विचार, वाचन आणि अप्रतिम समज यांच्या जोरावर केलेले ते भाषण आजही अंगावर रोमांच उभे करते. सुषमा स्वराज यांच्याकडे केवळ राजकीय व्यक्ती या चष्म्यातून पाहता येणार नाही. त्या एक उत्तम वकील, संसदपटू, संवेदनशील नेत्या होत्या. सहा ऑगस्ट २०१९ रोजी त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणातला एक अध्याय कायमचा संपला.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment