थोर इतिहास संशोधक वासुदेव सीताराम बेंद्रे यांच्या जयंतीनिमित्त (१३ फेब्रुवारी) त्यांचा अल्प परिचय...
इतिहास हा असा विषय आहे, जो आपली खरी ओळख सांगतो. आपण कोण होतो, आपली संस्कृती काय होती, या सगळ्याची माहिती आपल्या आजच्या अस्तित्वासाठी खूप महत्त्वाची आहे. भारतासारख्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण इतिहास असलेल्या देशासाठी तर इतिहासातील खऱ्या गोष्टी जाणून घेणे खूप गरजेचे आहे. असेच एक थोर इतिहासकार होते वासुदेव सीताराम बेंद्रे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य इतिहास संशोधनात व्यतीत केले. १३ फेब्रुवारी हा वा. सी. बेंद्रे यांचा जन्मदिनहे. त्या निमित्ताने जाणून घेऊ या, या थोर इतिहासकाराची माहिती.
वा. सी. बेंद्रे यांचा जन्म १३ फेब्रुवारी १८९४ रोजी मुंबईत झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण रायगड जिल्ह्यातील पेण या गावी, तर माध्यमिक शिक्षण मुंबईच्या विल्सन हायस्कूलमध्ये झाले. घरच्या प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे मॅट्रिक होण्यापूर्वीच शिक्षण सोडून द्यावे लागले, सरकारी नोकरी करावी लागली. नोकरीत असताना त्यांनी लघुलेखनपद्धतीचा (शॉर्ट हॅंड) अभ्यास केला आणि पुढे त्यात प्रावीण्य मिळवले. याच अभ्यासाच्या आधारे शिक्षण संचालक के. जी. कॉव्हर्नटन यांनी त्यांना नोकरीत घेतले. त्यांना लघुलेखक म्हणून काम दिले गेले. १९१८पासून ते भारत इतिहास संशोधक मंडळात काम करू लागले. १९३७मध्ये त्या वेळच्या मुंबई राज्याच्या शासनाने ऐतिहासिक संशोधनासाठी दोन वर्षांकरिता बेंद्रे यांना शिष्यवृत्ती दिली. या काळात इंग्लंडमधील इंडिया ऑफिस आणि ब्रिटिश म्युझियममधील ऐतिहासिक साधनसामग्रीची टिपणे त्यांनी संग्रहित केली.
१९४९मध्ये मुंबई राज्याच्या शासनाने संशोधनकार्यासाठी बेंद्रे यांना पेशवे दप्तर तपासण्याची परवानगी दिली. १९५२मध्ये मद्रास (चेन्नई) सरकारने तंजावर येथील दप्तरखान्याची तपासणी करण्यासाठी त्यांची नियुक्ती केली. १९६३मध्ये मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या इतिहास संशोधन मंडळाचे संचालक म्हणून त्यांना नेमण्यात आले, तर महाराष्ट्र इतिहास परिषद या संस्थेच्या प्रमुख कार्यवाहकपदाची जबाबदारी त्यांनी १९६५मध्ये स्वीकारली. बेंद्रे यांचा पहिला ग्रंथ 'साधनचिकित्सा' (१९२८) हा होय. शिवशाहीच्या इतिहासाचा हा प्रास्तविक खंड असून इतिहास संशोधनाच्या साधनांची मार्मिक चिकित्सा त्यात करण्यात आली आहे. त्यानंतर मराठी इतिहासावर त्यांनी बरीच पुस्तके लिहिली आहेत. तथापि छत्रपती संभाजी महाराज (१९६०) हा त्यांचा सर्वांत गाजलेला ग्रंथ होय. छत्रपती संभाजी महाराज हे एक तेजस्वी, कर्तबगार व पराक्रमी पुरुष होते. निग्रही स्वराज्यनिष्ठेने आपल्या कारकीर्दीचा क्षण न् क्षण त्यांनी परकीय आक्रमणाशी झगडण्यात घालवला व शेवटी स्वतःचे बलिदान केले, असा निष्कर्ष बेंद्रे यांनी या ग्रंथात काढलेला आहे.
संत तुकाराम महाराजांबद्दलही बेंद्रे यांनी केलेले संशोधन फार मोलाचे आहे. १९५०मध्ये त्यांनी श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराजकृत श्रीमद्भगवद्गीतेचा अभंगात्मक अनुवाद अथवा मंत्रगीतेचे संपादन केले. या मंत्रगीतेला त्यांनी लिहिलेल्या प्रदीर्घ प्रस्तावनेत तुकाराम महाराजांच्या चरित्रावर त्यांनी पुष्कळच नवीन प्रकाश टाकला आहे. देहूदर्शन (१९५१), तुकाराम महाराज यांचे संतसागाती (१९५८), तुकाराम महाराजांची गुरुपरंपरा (१९६०) आणि संत तुकाराम (१९६३) हे त्यानंतरचे त्यांचे ग्रंथ तुकाराम महाराजांचा कालखंड व त्यांचे जीवन यांवर प्रकाश टाकण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. संतचरित्रकार महीपतिकृत चरित्राच्या आधारे लिहिलेल्या किंवा दंतकथांवर आधारलेल्या तुकारामांच्या परंपरागत चरित्रापेक्षा अगदी वेगळे असे हे चरित्र आहे. तुकारामविषयक अभ्यासाला या ग्रंथांनी प्रथमच शास्त्रशुद्ध बैठक दिली. त्यांच्या अन्य ग्रंथांत सतराव्या शतकांतील गोवळकोंड्याची कुतुबशाही (१९३४), अ स्टडी ऑफ मुस्लिम इन्स्क्रिप्शन्स (१९४४), महाराष्ट्र ऑफ द शिवाजी पीरियड (१९६०) व श्री छत्रपती शिवाजी महाराज (१९७२) इत्यादी ग्रंथांचा समावेश होतो. तारीख–इ–इलाही (१९३०), राजाराम चरितम् (१९३१) हे त्यांनी संपादित केलेले उल्लेखनीय ग्रंथ होत. लघुलेखनावरही त्यांनी मराठी ग्रंथलेखन केले आहे. जो खरा इतिहास आहे तो लोकांसमोर येणे गरजेचे आहे. वासुदेव बेंद्रे यांनी आजन्म इतिहासावर संशोधन केले आणि खरा इतिहास मांडला. त्यांच्या या कार्याला वंदन!
(संदर्भ : मराठी विश्वकोश)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment