नाना फडणवीस

आपल्या शहाणपणाने पेशवाईतील अनेक अंतर्गत आणि बाह्य शत्रूंना नामोहरम करणाऱ्या या मुत्सद्दी व्यक्तिमत्त्वाचा १२ फेब्रुवारी हा जन्मदिन

नाना फडणवीस मुख्य फोटो
मुख्य फोटो

युद्धे ही केवळ रणांगणावरील शौर्यानेच जिंकली जातात असे नाही, तर ती बुद्धीने आणि चातुर्यानेसुद्धा जिंकली जातात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे नाना फडणवीस. पेशवाईतील या अर्ध-शहाण्याने आपल्या शहाणपणाने अनेक अंतर्गत आणि बाह्य शत्रूंना नामोहरम केले होते. १२ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिन. त्या निमित्ताने त्यांचा कार्यपरिचय करून देणारा हा लेख...

पेशव्यांच्या दरबारात साडेतीन शहाणे होते. त्यातील तीन पूर्ण, तर नाना फडणवीस अर्धे शहाणे होते. सखारामबापू बोकील, दिवाण विठ्ठल सुंदर, देवाजीपंत हे तीन पूर्ण शहाणे तर नाना फडणवीस अर्धे शहाणे होते. त्याचे कारण त्यांना लष्कराचे नेतृत्व करता येत नव्हते. नानांनी स्वत:च्या बुद्धिमत्तेवर मराठी राज्य तोलून धरले होते. बाळाजी जनार्दन भानू उर्फ नाना फडणवीस किंवा नाना फडणीस हे पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी होते. त्यांचा जन्म १२ फेब्रुवारी १७४२ रोजी सातारा येथे झाला. नाना फडणवीस यांचे मूळ घराणे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील होते. बालवयातच नानासाहेब पेशव्यांच्या सान्निध्यात आल्यामुळे त्यांना राज्यकारभाराचे शिक्षण मिळाले. नानासाहेब पेशव्यांबरोबर त्यांचे बालपण गेले व कारभाराचे शिक्षणही त्यांच्या सहवासात मिळाले. ‘भाऊसाहेबी कृपा पुत्रवत केली’ असे नानांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे. पत्‍नी व माता यांना घेऊन यात्रेच्या उद्देशाने नाना १७६१मध्ये तिसऱ्या पानिपतच्या स्वारीत सामील झाले होते. लढाईच्या धुमश्चक्रीत ते अखेरपर्यंत भाऊसाहेबांबरोबर होते. भाऊसाहेब गर्दीत नाहीसे झाल्यावर झालेल्या पळापळीत उपवास करून, झाडपाला खाऊन व अनंत यातना सोसून नाना प्रथम रेवाडीस, तेथून जाटांच्या प्रदेशात व तेथून दक्षिणेत आले. या प्रवासात त्यांची अनेक वेळा शत्रूशी गाठ पडली, त्यांच्या कत्तलीतूनही वाचून नाना परत आले. 

वयाच्या २०व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणिशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले. आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती; पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा याबरोबरच पेशवाई आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला. इंग्रजांचा पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले. थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर पेशवाईची विस्कटलेली घडी महादजी शिंद्यांच्या मदतीने त्यांनी पुन्हा बसवली. त्यांचा मुत्सद्दीपणा आणि चातुर्य वाखाणण्याजोगे होते. थोरल्या माधवरावांच्या मृत्यूनंतर पेशवाईत अंतर्गत राजकारण खूप होते. अशा वेळी नाना फडणवीस यांनी अतिशय समयसूचकता दाखवली. नारायणरावाने राघोबास कैद केले व तेढ वाढून नारायणरावाचा खून झाला. ब्रह्महत्या करणाऱ्या रघुनाथरावाविरुद्ध बारभाईचे कारस्थान नानांनी घडवून आणले. 

१७७६मध्ये रघुनाथराव इंग्रजांच्या मदतीने पेशवाईवर चाल करून आले. हैदर व कोल्हापूरकरही नानांविरुद्ध उठले व तोतयाचे बंडही याच वेळी झाले. नानांनी इंग्रजांशी पुरंदरचा तह करून साष्टी, भडोच वगैरे सहा लक्षांचा मुलूख त्यांना देऊन राघोबादादाला ताब्यात घेतले. हरिपंत आणि महादजी यांस अनुक्रमे हैदर व कोल्हापूरकर यांवर पाठवून त्यांचा बंदोबस्त केला. दक्षिणेतील मराठी सत्तेचे वर्चस्व टिकवून ठेवले, पुण्याचे वैभव वाढवले. संकटकाळात मराठ्यांची एकी टिकवणे व इंग्रजांपासून स्वातंत्र्यरक्षण करणे, ही नानांची महत्त्वाची कामगिरी होय. फ्रेंच राज्यक्रांती, इंग्रज-फ्रेंच युद्धे, अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध इत्यादी घटना नानांना माहीत होत्या. अखबारनवीसांची (बातम्या आणणार्‍यांची) प्रथा मराठ्यांच्या राज्यात अगोदरपासूनच होती. मराठी सत्तेचा हिंदुस्थानभर राज्यविस्तार झाल्यावर अखबारनवीसही प्रांताप्रांतांत ठिकठिकाणी नेमले गेले. प्रसिद्ध पानिपतच्या युद्धकाळात ‘बातम्या’ वेळेवर न मिळाल्याने मराठ्यांचे फार मोठे नुकसान झाले. नाना फडणवीस यांनी पानिपत प्रत्यक्षात पाहिले होते. यातूनच धडा घेऊन त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अखबारनवीस आणि नजरबाज यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवली. या कारणामुळे नानांना हिंदुस्थानातीलच नाही, तर परदेशातीलही बातम्या अत्यंत जलद कळत असत. प्रत्येक ठिकाणच्या बातम्या मिळविण्यासाठी नानांनी अतिशोधक आणि भेदतत्पर माणसे मिळवली होती. १३ मार्च १८०० रोजी अशा या मुत्सद्दी नाना फडणवीसांचे निधन झाले. युद्धे ही केवळ रणांगणावरील शौर्यानेच जिंकली जातात असे नाही, तर ती बुद्धीने आणि चातुर्यानेसुद्धा जिंकली जातात याचे उत्तम उदाहरण म्हणजे नाना फडणवीस. पेशवाईतील या अर्ध-शहाण्याने आपल्या शहाणपणाने अनेक अंतर्गत आणि बाह्य शत्रूंना नामोहरम केले होते. 


(संदर्भ - मराठी विश्वकोश)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 12-02-2026 News publication date | Time: 03:55 AM News publication time | Views: 206 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 12-02-2026 News publication date | Time: 03:55 AM News publication time | Views: 206 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words