व्यवसायाच्या निवडीपासून ब्रँडिंगपर्यंत आणि परवान्यापासून जाहिरातीपर्यंत... प्रशिक्षणातून मिळाले ज्ञानामृत

अमृत संस्थेतर्फे परभणीत झालेल्या अमृत उद्योग कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद

व्यवसायाच्या निवडीपासून ब्रँडिंगपर्यंत आणि परवान्यापासून जाहिरातीपर्यंत... प्रशिक्षणातून मिळाले ज्ञानामृत मुख्य फोटो
व्यवसायाच्या निवडीपासून ब्रँडिंगपर्यंत आणि परवान्यापासून जाहिरातीपर्यंत... प्रशिक्षणातून मिळाले ज्ञानामृत अतिरिक्त फोटो

परभणी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेने परभणी शहरात आयोजित केलेल्या १० दिवसांच्या अमृत उद्योग कौशल्यवर्धन प्रशिक्षण (ईडीपी) कार्यक्रमाचा नुकताच समारोप झाला. जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेचे सचिव आनंद कोठेकर या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

२२ लाभार्थ्यांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला. या प्रशिक्षण वर्गामध्ये व्यवसाय ओळख आणि उद्योजकता, व्यक्तिमत्त्व विकास आणि व्यवसाय निवड, व्यावसायिक परवाने आणि नोंदणी प्रक्रिया, कच्चा माल खरेदी प्रक्रिया, त्याची उपलब्धता व जुळवाजुळव, आर्थिक नियोजन, ब्रँडिंग अँड पॅकेजिंग, जाहिरात, विक्री व विपणन, शासनाशी संबंधित अधिकाऱ्यांसह बैठक, अमृतपेठ आदी विषयांवर तज्ज्ञ प्रशिक्षकांकरवी लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. लाभार्थ्यांना व्यवसाय उभारणीपासून ते उद्योजक होण्यापर्यंत येणाऱ्या अडचणींवर मात करून आपला व्यवसाय कसा पुढे आणता येईल, याबाबत सविस्तर चर्चा झाली.

व्यक्तिमत्त्व विकास आणि व्यवसाय निवड या विषयासंबंधी बोलताना प्रशिक्षक चंद्रशेखर अळणुरे यांनी व्यक्तिमत्त्वाविषयीचे अनेक पैलू उलगडून सांगितले. तसेच व्यवसाय निवड करताना संभाव्य धोके व घ्यावयाची काळजी याबाबत सखोल मार्गदर्शन केले. 

व्यावसायिक परवाने व नोंदणी प्रक्रिया या सत्रात मार्गदर्शन करताना देविदास देशपांडे यांनी परवान्याची गरज का आहे, व्यवसाय निवडण्याआधी कोणत्या व्यवसायासाठी कोणते परवाने लागतात, परवाने काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे व प्रक्रिया, बँक खाते काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे, याबाबत माहिती संगितली. 

सीए अनुप शुक्ला यांनी त्यांच्या सत्रात आर्थिक नियोजन, व्यावसायिक दरनिश्चिती, व्यावसायिक नफा व तोटा, आर्थिक शिस्त, दैनंदिन लेखाजोखा, दैनंदिन व्यवहारातील रोख रकमेचे व्यवस्थापन याविषयी माहिती दिली.  

ब्रँडिंग अँड पॅकेजिंग या सत्रामध्ये प्रशिक्षक डॉ. सुधीर राजूरकर यांनी लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले. ब्रँडचे नाव ठेवताना ते नाव अर्थपूर्ण असले पाहिजे, तसेच लोगो साधा-वेगळेपणा असणारा-वाचल्यानंतर सहज लक्षात राहणारा असावा याबाबत इत्थंभूत माहिती त्यांनी दिली. यासोबतच उद्योजक कसा असला पाहिजे, व्यवसायाबाबत असलेला अभ्यास, त्याचे राहणीमान, वर्तणूक, जिद्द, मेहनत, चिकाटी, व्यावसायिक कल्पना याबाबतही त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. 

या प्रशिक्षणामुळे व्यावसायिक भेटीच्या माध्यमातून लाभार्थ्यांना प्रात्यक्षिकांसह उद्योग पाहण्याची संधी मिळाली व प्रश्नोत्तर सत्राच्या माध्यमातून शंकानिरसन करून घेता आले.

जाहिरात विषयासाठीच्या सत्रात प्रशिक्षक माधव शर्मा यांनी डिजिटल युगात अल्प दरात जाहिरात कशी करावी, आपल्या ग्राहकांपर्यंत कमीत कमी कालावधीत पोहोचून उत्पादनांची विक्री कशी वाढवता येईल व ग्राहकांना जास्तीत जास्त कसे आकर्षित करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. जाहिरातींचे प्रकार आणि जाहिरातीची पटकथा कशी असावी याबाबत प्रात्यक्षिक करण्यास सांगून त्यातील तांत्रिक बाबी व प्रात्यक्षिकासह ३० ते ४० सेकंदांचा आपला व्हिडिओ कसा तयार करावा याबाबतही त्यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच सध्याच्या युगात कमी पैशांमध्ये डिजिटल मार्केटिंगचे महत्त्व याबाबतही त्यांनी सांगितले. 

शेवटच्या सत्रात आनंद कोठेकर यांनी शासनाशी संबंधित अधिकाऱ्यांसह बैठका या विषयासह कर्जप्रक्रिया व त्यातील येणाऱ्या त्रुटी कशा दूर कराव्यात, त्यासाठी लागणारे प्रोजेक्ट रिपोर्ट कसे असले पाहिजेत, तसेच वेगवेगळ्या अधिकाऱ्यांशी बोलताना व्यावसायिक म्हणून संभाषण कौशल्य कसे असावे याबाबत लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

समारोपावेळी सर्व लाभार्थ्यांनी मिळून अमृत संस्थेचे परभणी जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे, उपव्यवस्थापक रवी कुलकर्णी, अमृतमित्र अनंत जोगदंड यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. निखिल देशपांडे, विजय पिंगळे, पंकज पुरोहित, विनोद पुरोहित, पवनकुमार शर्मा, अश्विनीताई पेडगावकर, रेणुका कुलकर्णी, तेजल मुद्गलकर, वर्षाताई जोशी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त करून त्यांनी अमृत संस्थेचे आभार मानले.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Anirudha Kate News publisher name | Date: 11-02-2026 News publication date | Time: 12:21 PM News publication time | Views: 516 Number of times this news has been viewed | District: parbhani Related district of the news
Publisher: Anirudha Kate News publisher name | Date: 11-02-2026 News publication date | Time: 12:21 PM News publication time | Views: 516 Number of times this news has been viewed | District: parbhani Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words