जागतिक शिक्षक पुरस्कारविजेत्या शिक्षिकेची प्रेरक कथा
जिद्द, चिकाटी आणि समाजासाठी काहीतरी करण्याची ओढ असेल, तर माणूस निश्चितपणे मोठा होतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे रुबल नागी. दुबईत आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर जेव्हा एका भारतीय महिलेचे नाव पुकारले गेले, तेव्हा संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने भरून गेले. भारतातील झोपडपट्ट्यांमधील अंध:कार दूर करणाऱ्या रुबल नागी यांना २०२६चा जागतिक शिक्षक पुरस्कार (ग्लोबल टीचर प्राइझ) देऊन नुकतेच गौरवण्यात आले. या पुरस्काराची रक्कम तब्बल १० लाख अमेरिकन डॉलर्स (अंदाजे नऊ कोटी रुपये) इतकी आहे.
सुरुवातीला आपण या पुरस्काराविषयी थोडी माहिती घेऊ या. वर्की फाउंडेशन आणि युनेस्को यांच्या सहकार्याने दिला जाणारा हा शिक्षकांसाठीचा जगातील सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. याला ‘शिक्षकांसाठीचे नोबेल’ असेही संबोधले जाते. १३९ देशांमधून आलेल्या पाच हजार अर्जांमधून रुबल नागी यांची निवड होणे, ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे. शिक्षकी पेशाचे महत्त्व जगाला पटवून देणे आणि शिक्षकांना प्रेरणा देणे हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे.
रुबल यांचे नाव शैक्षणिक क्षेत्रात नवीन नाही. त्यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमात सहभाग घेतला आहे. रुबल नागी यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. २४ वर्षांपूर्वी अवघ्या तीस मुलांपासून सुरू झालेला हा प्रवास आता दहा लाखांहून अधिक मुलांपर्यंत पोहोचला आहे. झोपडपट्ट्या, दुर्गम भाग, दुर्लक्षित वस्त्या अशा ज्या ज्या ठिकाणी शाळा सुरू करणे शक्य नाही, तिथे रुबल नागी यांनी मुलांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडले. गणित, विज्ञान, भाषा, इतिहास यांचे शिक्षण देणारी भित्तिचित्रे काढून शिक्षणाची नवीन आणि प्रभावी पद्धत त्यांनी सुरू केली. आतापर्यंत त्यांच्या संस्थेमार्फत देशभरात आठशेहून अधिक शिक्षण केंद्रे सुरू झाली आहेत.
रुबल यांनी ‘मिसाल इंडिया’ आणि ‘मिसाल मुंबई’ यांसारखे उपक्रम राबवले आहेत. त्यात शिक्षणाबरोबरच स्वच्छता, पिण्याचे पाणी, जीवनकौशल्ये आणि व्यावसायिक शिक्षण यांवर भर दिला जातो. घरे रंगवणे, स्वच्छता मोहिमा राबवणे आणि मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे अशा सर्वांगीण उद्देशाने त्यांनी हे उपक्रम सुरू केले आहेत. मुळच्या जम्मू-काश्मीरच्या असलेल्या आणि आता मुंबईत असलेल्या रुबल यांनी राज्यशास्त्र या विषयात पदवी संपादन केली आहे. मुळात कलाकार असल्याने संवेदनशील मन आणि सामाजिक जाणीव हीच त्यांच्या कार्यामागची प्रेरणा आहे, असे त्या मानतात. वापरात नसलेल्या वर्गखोल्यांना रंग देऊन त्यांनी त्यावर अनेक विषयांवरील भित्तिचित्रे काढून त्या बोलक्या केल्या आहेत. विविध शाळांना भेटी देणे, तेथील शिक्षकांना मार्गदर्शन करणे, विद्यार्थ्यांशी संवाद साधणे अशी त्यांची कार्यपद्धती आहे. आतापर्यंत ६००हून अधिक स्वयंसेवकांना त्यांनी या कामात प्रशिक्षित केले आहे. नागी यांच्या या प्रयत्नांमुळे जिथे असे उपक्रम झाले, तेथील मुलांच्या शाळा सोडण्याच्या प्रमाणात घट झाली आहे. हे प्रमाण ५० टक्क्यापर्यंत घटले आहे. आपल्याला मिळालेल्या या पुरस्काराच्या रकमेतून व्यावसायिक शिक्षण देणारी संस्था सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.
आपण समाजाचा एक घटक आहोत. त्यामुळे या समाजाचे आपण काही देणे लागतो. ते देणे म्हणजेच आपल्या मनुष्यधर्माचे पालन करणे, ही शिकवण रुबल नागी यांनी कृतीत आणली आहे. त्या समाजाचे देणे आपल्या कार्यातून फेडत आहेत. अशा अनेक रुबल समाजात निर्माण झाल्या, तर विकसित भारताचे स्वप्न साकार होण्यास वेळ लागणार नाही.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment