मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा!

संकटांवर जिद्दीने मात करून इतर महिलांकरिता आधार बनलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील ज्योती परब

मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा! मुख्य फोटो
मुख्य फोटो

​जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या स्त्रियांची अनेक उदाहरणे आपण ऐकतो. रत्नागिरी जिल्ह्याच्या गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे येथील ज्योती रामदास परब त्यांपैकीच एक. त्यांचा प्रवास केवळ संघर्षाचा नाही, तर तो एकाकीपणावर मात करून समाजाला दिशा देणारे खंबीर नेतृत्व म्हणून कसे घडावे, याचा आहे.

सुखी-समाधानी आयुष्य सुरू असताना अचानक काळाने घाला घातला आणि ज्योतीताईंच्या पतीचे अकाली निधन झाले. संसाराचा गाडा हाकण्यासाठी आणि मुलीच्या भविष्यासाठी त्यांनी ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरू केला. पदर खोचून त्यांनी संघर्षाला सुरुवात केली, पण नियतीला हे सुखही मान्य नव्हते. काही काळाने त्यांच्या पोटच्या मुलीचेही निधन झाले. पती आणि कन्या असे दोन्ही आधारस्तंभ गमावल्यानंतर ज्योतीताई पूर्णपणे एकाकी पडल्या. आयुष्यात अंधार दाटून आला होता आणि समोर कोणतीही वाट दिसत नव्हती.

​शून्यातून भरारी

कामाची लाज नाही, तर जिद्द मोठी... ओढवलेल्या अत्यंत कठीण परिस्थितीतही खचून न जाता ज्योतीताईंनी पुन्हा उभे राहण्याचे ठरवले. त्यांच्या बहिणीने त्यांना भाकर सेवा संस्थेबद्दल माहिती दिली. सखी वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून त्या संस्थेशी जोडल्या गेल्या. आयुष्यात पुन्हा सावरण्यासाठी त्यांनी लांजा तालुक्यातील कोंड्ये येथील अरुणाश्रमात चक्क आचारी म्हणून कामाला सुरुवात केली. संकटकाळात कोणत्याही कामाची लाज न बाळगता त्यांनी स्वतःला झोकून दिले. हीच जिद्द त्यांना पुढे घेऊन जाणारी ठरली.

​समुपदेशक म्हणून नवी ओळख

​ज्योतीताईंची कामातील कल्पकता, समज आणि दांडगा अनुभव पाहून भाकर सेवा संस्थेने त्यांच्या पुनर्वसनाचा महत्त्वाचा निर्णय घेतला. तीन जुलै २०२५पासून त्यांना महिला पुनर्वसन केंद्रात विशेष प्रशिक्षण देण्यात आले. त्यांच्या कौशल्याची आणि समाजाप्रती असलेल्या ओढीची दखल घेऊन त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या राजापूर तालुक्यातील समुपदेशन केंद्रात समुपदेशक म्हणून करण्यात आली. ज्या महिलेने स्वतःचे आधारस्तंभ गमावले होते, ती आज इतरांचे संसार वाचवण्यासाठी आधार झाली होती.

​पीडितांसाठी मायेचा आधारवड

​गेल्या सात महिन्यांपासून ज्योतीताई राजापूर परिसरात अत्यंत प्रभावीपणे काम करत आहेत. कौटुंबिक हिंसाचार, तसेच घरगुती छळाला बळी पडलेल्या महिलांसाठी त्या एक खंबीर आधार बनल्या आहेत. केवळ कायदेशीर सल्लाच नव्हे, तर मानसिक आधार देऊन त्या महिलांना पुन्हा उभे करत आहेत. गावोगावी महिला मेळावे घेऊन त्या स्त्रियांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देतात. स्वतःच्या आयुष्यातील दु:ख मनाच्या एका कोपऱ्यात ठेवून दुसऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे मोठे कार्य त्या आज करत आहेत.

​'माणूस एकटा पडला की संपतो,' असे अनेकांना वाटते; पण ज्योती परब यांनी दाखवून दिले, की मनात जिद्द असेल आणि योग्य साथ मिळाली, तर माणूस पुन्हा फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून भरारी घेऊ शकतो.

​ज्योती परब यांचा हा प्रवास आजच्या काळातील प्रत्येक स्त्रीसाठी स्वावलंबन आणि धैर्याचे एक उत्तम उदाहरण आहे. संकटे येतात आणि जातात; पण त्या संकटांच्या छाताडावर पाय देऊन उभे राहून दुसऱ्यांच्या डोळ्यातील आसवे पुसण्याचे काम खऱ्या अर्थाने कर्तृत्व ठरते.

अमृता भातडे-धुंदूर, रत्नागिरी

Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 29-04-2026 News publication date | Time: 11:42 AM News publication time | Views: 242 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 29-04-2026 News publication date | Time: 11:42 AM News publication time | Views: 242 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement