अंदमानची वीरांगना लीपा

१७ मे १८५९ रोजी अंदमानमध्ये झालेल्या एबरडीनच्या युद्धात बलिदान देणारी वीरांगना

अंदमानची वीरांगना लीपा  मुख्य फोटो
मुख्य फोटो

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अनाम वीरांगनांपैकी एक म्हणजे लीपा. त्यांचे बलिदान हे भारतातील प्रेरणादायी व अभिमानास्पद पान आहे. अंदमानचे नाव घेतले, की आपल्या डोळ्यांसमोर सेल्युलर जेल आणि काळ्या पाण्याच्या अमानुष शिक्षा उभ्या राहतात. याच अंदमानच्या भूमीवर १८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात आदिवासी (जनजातीय) वीरांनीही इंग्रजांविरुद्ध संघर्षाचा बिगुल फुंकला होता. १७ मे १८५९ रोजी झालेले एबरडीनचे युद्ध हे आजही शौर्य, स्वाभिमान आणि मातृभूमीच्या रक्षणाचे प्रतीक मानले जाते.

जनजातीय समाजाचे जीवन जंगल, निसर्ग आणि परंपरांशी घट्ट जोडलेले होते. इंग्रजांनी जंगलतोड करून वसाहती उभारणे आणि कैद्यांकडून जबरदस्तीने जंगल साफ करवून घेणे हे स्थानिक जनजातीय समाजाला मान्य नव्हते. त्यामुळे त्यांच्या मनात संताप निर्माण झाला आणि हा विरोध हळूहळू संघर्षात परिवर्तित झाला. याच काळात इंग्रज सैन्यातील दूधनाथ तिवारी हा सैनिक पळून जाऊन ग्रेट अंदमानी समाजात आश्रयाला आला. स्थानिक समाजाने त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला आसरा दिला. इतकेच नव्हे, तर पुत्तिया यांची कन्या लीपा हिच्याशी त्याचा विवाहही लावून दिला; पण दूधनाथने विश्वासघात केला. त्याने इंग्रजांना जनजातीय समाजाची सर्व माहिती पुरवली.

संघर्षाची वेळ आली तेव्हा वीरांगना लीपा पुढे सरसावली. तिने जनजातीय समाजाला संघटित केले आणि १७ मे १८५९ रोजी इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी मोठ्या सैन्यासह कूच केले. हा ऐतिहासिक संघर्ष पुढे एबरडीनचे युद्ध म्हणून ओळखला जाऊ लागला. परंतु दूधनाथच्या विश्वासघातामुळे इंग्रज आधीपासून सज्ज होते. त्यामुळे या युद्धात ग्रेट अंदमानच्या वीरांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर इंग्रजांनी महिलांवर, मुलांवर आणि संपूर्ण जनजातीय समाजावर अमानुष अत्याचार केले. तरीही वीरांगना लीपा यांचे बलिदान केवळ रणभूमीपुरते मर्यादित नव्हते. त्यांनी आपल्या संस्कृतीचे, स्वाभिमानाचे आणि परंपरांचे रक्षण करण्यासाठी सर्वोच्च त्याग केला. त्यांच्या जीवनातून हे सिद्ध होते, की जनजातीय समाज आपला धर्म, संस्कृती आणि सन्मानासाठी कोणतीही किंमत मोजण्यास तयार असतो.

ग्रेट अंदमानची वीरांगना लीपा या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील त्या अनाम वीरांगनांपैकी एक आहेत, ज्यांचे स्मरण राष्ट्राच्या स्वाभिमानाला जागृत करते. त्यांचे बलिदान हे भारतीय इतिहासातील प्रेरणादायी आणि अभिमानास्पद पान आहे.

Publisher: Yogesh Joshi News publisher name | Date: 17-05-2026 News publication date | Time: 03:13 PM News publication time | Views: 643 Number of times this news has been viewed | District: Washim Related district of the news
Publisher: Yogesh Joshi News publisher name | Date: 17-05-2026 News publication date | Time: 03:13 PM News publication time | Views: 643 Number of times this news has been viewed | District: Washim Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement