काजूप्रक्रियेतून साडेसहा लाखांची उलाढाल; रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांच्या गटाची यशोगाथा

मावळंग उत्पादक गटातील प्रत्येकीला दरमहा मिळते सरासरी पाच हजार रुपये उत्पन्न

काजूप्रक्रियेतून साडेसहा लाखांची उलाढाल; रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांच्या गटाची यशोगाथा मुख्य फोटो
काजूप्रक्रियेतून साडेसहा लाखांची उलाढाल; रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांच्या गटाची यशोगाथा अतिरिक्त फोटो

रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील धामापूर तर्फे देवरुख हे गाव निसर्गसंपन्न आहे. डोंगरदऱ्या आणि मुसळधार पाऊस असलेल्या या भागात शेती हाच उपजीविकेचा मुख्य आधार. पारंपरिक शेतीकडून व्यावसायिक बागायतीकडे वळताना येथील महिलांनी एकत्र येऊन गटशक्तीच्या जोरावर आर्थिक क्रांती घडवून आणली आहे.

काही वर्षांपासून हवामानातील बदल आणि काजू पिकासाठी असलेली पोषक स्थिती पाहून गावातील शेतकऱ्यांनी काजूची मोठ्या प्रमाणावर लागवड केली. गावात काजूची उपलब्धता भरपूर होती; मात्र वैयक्तिक विक्रीमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत होत्या. व्यापाऱ्यांची अनुपलब्धता आणि वाहतुकीचा वाढता खर्च यामुळे नफा कमी होत होता. या समस्येवर उपाय म्हणून उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत १० महिला शेतकरी एकत्र आल्या आणि १० ऑक्टोबर २०१८ रोजी मावळंग काजू उत्पादक गटाची स्थापना झाली.

गट स्थापनेपूर्वी महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. वैयक्तिक विक्रीमुळे काजूला योग्य भाव न मिळणे, वाहतुकीचा खर्च जास्त असणे,. बाजारपेठेच्या ज्ञानाचा अभाव, शेतीसाठी लागणारी खते वेळेत उपलब्ध न होणे, अशा समस्यांचा त्यात समावेश होता. उमेद अभियानातील उद्योगसखी, एम-सीआरपी आणि प्रभाग समन्वयक यांच्या मार्गदर्शनामुळे महिलांना उत्पादक गट तयार करण्याचे महत्त्व समजले. एकत्रितपणे काजू गोळा करणे आणि विक्री करणे सुरू केल्यामुळे वाहतुकीचा खर्च कमी झाला आणि घाऊक विक्रीमुळे व्यापाऱ्यांशी घासाघीस करण्याची ताकद वाढली.

सेंद्रिय शेती आणि खर्च कपात

गटातील महिलांना उमेद अभियानाद्वारे सेंद्रिय निविष्ठा तयार करण्याचे प्रशिक्षण मिळाले. आज या महिला स्वतःच्या घरीच जीवामृत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क आणि गांडूळ खत, कंपोस्ट खत तयार करतात. स्वतः सेंद्रिय खते तयार केल्यामुळे रासायनिक खतांवरील खर्च कमी झाला आणि उत्पादनाचा दर्जा सुधारला. या नैसर्गिक पद्धतीमुळे पर्यावरणाचेही रक्षण होत आहे.

केवळ कच्च्या काजूबियांची विक्री न करता, महिलांनी त्यावर प्रक्रिया करण्यावर भर दिला. काजूगरांची प्रतवारी केल्यामुळे बाजारात उत्कृष्ट भाव मिळत आहे. आकर्षक पॅकेजिंगमुळे ग्राहक या उत्पादनांकडे आकर्षित होत आहेत. बियांवर प्रक्रिया करून काजूगर उत्पादित केल्यामुळे नफ्याचे प्रमाण वाढले आहे.

प्रशिक्षण आणि आर्थिक पाठबळ

व्यवसायवाढीसाठी गटाला उमेद अभियानाकडून पन्नास हजार रुपये पायाभूत सुविधा निधी आणि दीड लाख रुपये खेळते भांडवल कर्ज स्वरूपात मिळाले. याव्यतिरिक्त महिलांनी स्वतःचे प्रत्येकी एक हजार रुपये भांडवल गुंतवले. तालुका स्तरावर महिलांनी विपणन सर्वेक्षण, आर्थिक व्यवस्थापन आणि उद्योजकता विकासाचे तांत्रिक प्रशिक्षण घेतले. त्याचा फायदा प्रत्यक्ष व्यवसाय करताना होत आहे.

प्रगतीचा आलेख आणि आर्थिक उन्नती

गटाची आर्थिक कामगिरी कौतुकास्पद आहे. मागील वर्षाची उलाढाल साडेचार लाख रुपये असून, चालू वर्षाची उलाढाल आतापर्यंत साडेसहा लाख रुपये आहे. गेल्या दोन वर्षांत सर्व खर्च वजा जाता ९५ हजार रुपये नफा झाला आहे. प्रत्येक महिलेला मासिक सरासरी पाच हजार रुपयांहून अधिक उत्पन्न मिळत आहे. तालुका स्तरावरून तालुका अभियान व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक, प्रभागसंघ व्यवस्थापक, समुदाय संसाधन व्यक्ती, उद्योगसखी, कृषीसखी व स्वयंसाह्यता समूहातील महिला यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.

मावळंग काजू उत्पादक गटातील महिलांचा आत्मविश्वास आता उंचावला आहे. गावातील कच्चा माल म्हणजेच काजू, कोकम, आंबा इत्यादींच्या साह्याने भविष्यात स्वतःचे अद्ययावत प्रक्रिया केंद्र स्थापन करण्याचा या गटाचा मानस आहे.

धामापूर तर्फे देवरूख येथील या १० महिलांनी हे सिद्ध केले आहे, की योग्य मार्गदर्शन, तांत्रिक प्रशिक्षण आणि सामूहिक प्रयत्नांची जोड मिळाली, तर ग्रामीण भागातील महिला केवळ घरच नाही तर व्यवसायही यशस्वीरीत्या सांभाळू शकतात. तालुका अभियान व्यवस्थापन यंत्रणेचे मार्गदर्शन आणि महिलांची जिद्द यामुळे मावळंग गट आज इतर महिलांसाठी प्रेरणास्थान बनला आहे.

- अमृता भातडे-धुंदूर, रत्नागिरी

Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 18-04-2026 News publication date | Time: 04:31 PM News publication time | Views: 205 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 18-04-2026 News publication date | Time: 04:31 PM News publication time | Views: 205 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement