गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर

गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांचा १० फेब्रुवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय...

गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर मुख्य फोटो
मुख्य फोटो

काही आवाज हे अजरामर असतात. शास्त्रीय संगीतविश्वात ज्यांचे नाव आदराने घेतले जाते अशा नावांपैकी एक नाव म्हणजे मोगूबाई कुर्डीकर. अशा गानतपस्विनी मोगूबाई यांचा १० फेब्रुवारी हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने त्यांचा हा अल्प परिचय...

मोगूबाई कुर्डीकर या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील जयपूर घराण्याच्या प्रसिद्ध गायिका होत्या. त्यांचा जन्म १५ जुलै १९०४ रोजी कुर्डी (गोवा) येथे झाला. गोव्याच्या निसर्गरम्य परिसरात आणि सोमेश्वर-रवळनाथाच्या देवळात चालणाऱ्या भजनांच्या वातावरणात वाढल्याने मोगूबाईंवर लहान वयातच सुरांचा संस्कार झाला. तिथेच प्रख्यात तबलावादक लयभास्कर खाप्रूमामा पर्वतकर यांच्याशी त्यांची ओळख झाली. त्यांनी मोगूबाईंना शास्त्रीय संगीताचे सुरुवातीचे धडे दिले. १९१९मध्ये मोगूबाई सांगलीत आल्या. मोगूबाईंची त्या वयातील गाण्याची तयारी व समज पाहून जयपूर घराण्याचे ख्यातनाम गायक अल्लादियाखाँ यांनी त्यांना तालीम सुरू केली. १९२१मध्ये खाँसाहेब मुंबईला आले. मोगूबाईही तालमीसाठी मुंबईला आल्या. दोन वर्षांची ही तालीम नंतर खंडित झाल्याने आग्रा घराण्याचे बशीरखाँ व विलायत हुसेनखाँ यांची त्यांनी तालीम घेतली. १९२७ ते १९३२ या काळात अल्लादियाखाँसाहेबांनी आपले बंधू हैदरखाँ यांची तालीम मोगूबाईंना दिली. 

लयप्राधान्य हे मोगूबाईंच्या गाण्याचे खास वैशिष्ट्य असून, लयीचे अवघड प्रकारही त्या सहजतेने करून जात असत. कमीत कमी स्वरयोजनेच्या अर्थवाही उपजा, कणस्वरांची प्रभावी योजना, आवाजाचा अकृत्रिम, अनुनासिकविरहित लगाव, खणखणीत असूनही हळुवार असा स्वर, सुरेल स्वरांचा डौल व लयीचा तोल एकाच वेळी सांभाळण्याचे कसब, लयीशी लडिवाळपणे खेळत केलेले बाल-आलाप व लयीत गुंफलेल्या बोल-ताना, प्रचंड दमसासाच्या ताना, बंदिशीची व ख्यालाची प्रमाणबद्ध मांडणी ही त्यांच्या ख्यालगायनाची ठळक वैशिष्ट्ये होती. मोगूबाईंना रसिकांकडून ‘गानतपस्विनी’ ही सन्मान्य उपाधी मिळाली. जयपूर घराण्याची गानपरंपरा सातत्याने टिकावी, यासाठी त्यांनी मुक्तहस्ताने गानविद्या दिली. 

ख्यातनाम गायिका किशोरी आमोणकर या त्यांच्या कन्या व शिष्या होत. मोगूबाईंच्या अन्य शिष्यवर्गात कौसल्या मंजेश्वर, वामनराव देशपांडे, सुशीलाराणी पटेल, कमल तांबे, सुहासिनी मूळगावकर, पद्मा तळवलकर, सुलभा पिशवीकर आदी गायक-गायिकांचा अंतर्भाव होतो. 

मोगूबाईंना अनेक मानसन्मान मिळाले. त्यांमध्ये संगीत नाटक अकादमीचे पारितोषिक (१९६८), भारत सरकारकडून पद्मभूषण (१९७४) हा सन्मान, गोव्याच्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयात संगीत रिसर्च अकादमीचे पारितोषिक (१९८०) इत्यादींचा समावेश होतो. १० फेब्रुवारी २००१ रोजी मोगूबाईंचे वृद्धापकाळाने मुंबई येथे निधन झाले.

(संदर्भ - मराठी विश्वकोश)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 10-02-2026 News publication date | Time: 06:55 AM News publication time | Views: 124 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 10-02-2026 News publication date | Time: 06:55 AM News publication time | Views: 124 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words