योगी अरविंद

योगी अरविंद यांचा पाच डिसेंबर हा स्मृतिदिन… त्या निमित्ताने…

योगी अरविंद मुख्य फोटो
मुख्य फोटो

आधुनिक भारतातील प्रख्यात तत्त्वचिंतक, स्वातंत्र्यवीर, योगी आणि कवी असे बहुपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे अरविंद घोष अर्थात योगी अरविंद. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १८७२ रोजी कोलकात्यात एका सुसंस्कृत कुटुंबात झाला. त्यांचे वडील कृष्णधनबाबू प्रख्यात डॉक्टर होते. मुलांना संपूर्णपणे पाश्चात्त्य धर्तीवर शिक्षण द्यावे, म्हणून त्यांनी अरविंदांना वयाच्या सातव्या वर्षीच इंग्लंडला पाठवले. अरविंद हे असामान्य बुद्धीचे विद्यार्थी होते. तेथील परीक्षांत त्यांनी अनेक बक्षिसे मिळवली. लॅटिन, ग्रीक, इंग्रजी या भाषांवर त्यांचे असामान्य प्रभुत्व होते. फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, इटालियन या भाषाही ते तिथे शिकले. भारतात आल्यावर त्यांनी बंगाली, गुजराती, मराठी व संस्कृत या भाषांचा अभ्यास केला. लहानपणापासूनच त्यांना कविता करण्याचा छंद होता. लॅटिन, ग्रीक, इंग्रजी व बंगाली भाषांत त्यांनी कविता केलेल्या आहेत.
केंब्रिजला असताना ते तेथील ‘इंडियन मजलिस’चे सचिव होते आणि त्यांनी मजलिसमध्ये क्रांतिकारक भाषणे करून भारताने सशस्त्र उठाव करूनच स्वातंत्र्य मिळवावे, असे प्रतिपादन केले. इंग्रज सरकारची नोकरी न करण्याचा निर्णय घेऊन ते १८९३ मध्ये भारतात परतले व बडोदा संस्थानच्या नोकरीत रुजू झाले. बडोद्याला ते १९०७पर्यंत होते. १९०१ मध्ये त्यांचा मृणालिनी देवींशी विवाह झाला. बडोदा महाविद्यालयात प्रथम ते फ्रेंच आणि इंग्रजीचे प्राध्यापक, नंतर महाविद्यालयाचे उपप्राचार्य व नंतर प्राचार्य होते. बडोद्याच्या वास्तव्यात त्यांनी पुढील कार्याची साधना केली. योगसाधनाही ते करीत होतेच. वेद, उपनिषदे, महाकाव्ये इ. संस्कृत ग्रंथांचा सखोल अभ्यास करून ते इंग्रजीत कविता, नाटके व निबंध लिहू लागले. देश स्वतंत्र झाला पाहिजे, सशस्त्र क्रांतीनेच स्वातंत्र्य मिळेल, भारताचा पुनर्जन्म झाला पाहिजे, असे प्रतिपादन ते करत.

मुंबईच्या इंदुप्रकाश पत्रात १८९३पासून ते आपली राजकीय मते मांडू लागले. बंगालमधील क्रांतिकारक चळवळीचे अरविंदबाबू हे एक प्रवर्तक होते. ते जहालमतवादी होते. ते टिळकांना नेते मानत. राजकीय स्वातंत्र्याप्रमाणेच योगसिद्धीकडेही त्यांचे लक्ष होते. विष्णू भास्कर लेले हे त्यांचे योगमार्गातील गुरू. युगांतर हे बंगाली दैनिक त्यांनी सुरू केले व बिपिनचंद्र पॉल यांच्या वंदेमातरम् ह्या इंग्रजी दैनिकातूनही ते लिहू लागले. काही काळ या पत्राचे ते संपादकही होते. या दोन पत्रांनी त्यांच्या उदात्त व प्रखर राष्ट्रीय भावना जनतेपर्यंत पोहोचवून लोकांच्या मनात स्वातंत्र्यज्योत प्रज्वलित केली. त्यांना काही काळ तुरुंगवासही भोगावा लागला होता.
ते योगसाधना १९०४ पासूनच करीत होते. १९०७मध्ये ध्यान करीत असता त्यांना मनाच्या संपूर्ण एकाग्रतेचा व दिव्य मनःशांतीचा अनुभव आला आणि त्यांचा संपूर्ण दृष्टिकोन बदलला. तेव्हापासून आपले लिहिणे व बोलेणे मनाच्या उच्च पातळीवरून घडते असे ते म्हणत. पाँडिचेरीला आल्यावर त्यांच्यात आमूलाग्र बदल घडून आला आणि ते राजकारणातून संपूर्णपणे निवृत्त झाले. त्यांनी स्वतःला साहित्य व तत्त्वज्ञानास वाहून घेतले.
एसेज ऑन द गीता (१९२२), द सिंथिसिस ऑफ योग (१९५०), द आयडियल ऑफ ह्यूमन युनिटी (१९५०), द लाइफ डिव्हाइन (१९५१), द फ्यूचर पोएट्री (१९५३), द फाउंडेशन ऑन इंडियन कल्चर (१९५३), ऑन द वेद (१९५६), द ह्यूमन सायकल (१९६२), द सिग्निफिकन्स ऑफ इंडियन आर्ट (१९६४), द सुपर मॅन (१९६८) इ. महत्त्वपूर्ण ग्रंथांतून त्यांचे विविध मौलिक लेख व विचार संग्रहित आहेत. अरविंदांचे सावित्री (१९७०) हे निर्यमक छंदातील २३,८१३ ओळींचे आध्यात्मिक स्वरूपाचे इंग्रजी महाकाव्य त्यांच्या प्रतिभेचा आविष्कार आहे. भारतीय व परदेशी समीक्षकांनी त्याची मुक्त कंठाने प्रशंसा केली आहे. त्यांनी अनेक कविता व नाटकेही लिहिली आहेत. त्यांची भाषणे, निबंध व पत्रव्यवहार तसेच वेदोपनिषदांवरील भाष्यांची भाषांतरे यांचे अनेक संग्रह आहेत. अरविंदांनी १९२६पासून शेवटपर्यंत एकांतवास पत्करला. पाच डिसेंबर १९५० रोजी रात्री दीड वाजता त्यांनी महासमाधी घेतली.

(स्रोत : मराठी विश्वकोश)

Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 05-12-2025 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 23 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 05-12-2025 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 23 Number of times this news has been viewed | District: ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words