महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधरस्वामींची पुण्यतिथी (सात फेब्रुवारी)
सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामी हे १३व्या शतकातील एक थोर संत, तत्त्वज्ञ आणि महानुभाव पंथाचे संस्थापक होते. त्यांनी महाराष्ट्रात समता, अहिंसा आणि भक्तीचा प्रसार केला आणि मराठी भाषेला धर्मभाषेचा दर्जा मिळवून दिला. सात फेब्रुवारी (१२७४) या त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्याविषयी थोडक्यात माहिती...
हरिपाळदेव असे चक्रधरस्वामींचे मूळ नाव होते. त्यांचा जन्म गुजरातमधील भडोच (भरुच) येथे एका राजघराण्यात झाला. त्यांचे वडील विशालदेव हे तिथल्या मल्लदेव राजाचे प्रधान होते. त्यांनी ऋद्धिपूर येथे श्री गोविंदप्रभू यांच्याकडून दीक्षा घेतली आणि तिथूनच त्यांच्या अवतारकार्यास सुरुवात झाली. महानुभाव पंथाच्या श्रद्धेनुसार, त्यांना ईश्वराच्या पंचावतारांपैकी पाचवा अवतार मानले जाते. स्वामींनी जातिभेद आणि स्त्री-पुरुष भेदभाव नाकारून सर्वांना भक्तीचा समान अधिकार दिला. त्यांनी आपले तत्त्वज्ञान संस्कृतऐवजी तत्कालीन लोकभाषा असलेल्या मराठीत सांगितले. त्यांच्यामुळेच मराठी साहित्याचा पाया रचला गेला. त्यांनी केवळ श्रीकृष्णाची भक्ती आणि अहिंसेचा मार्ग सांगितला. चक्रधरस्वामींच्या आठवणी आणि त्यांच्या लीळांचा संग्रह असलेला 'लीळाचरित्र' हा मराठीतील पहिला चरित्रग्रंथ मानला जातो. तो त्यांचे शिष्य म्हाइंभट यांनी संकलित केला आहे. 'सूत्रपाठ' हा त्यांच्या वचनांचा संग्रह आणि 'दृष्टान्तपाठ' हा त्यांच्या दृष्टान्ताचा संग्रह हे महानुभाव पंथाचे महत्त्वाचे आधारग्रंथ आहेत. स्वामींच्या जयंतीला 'अवतारदिन' साजरा केला जातो. तो भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला असतो.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment