भर कार्यक्रमात गव्हर्नरवर झाडल्या होत्या गोळ्या
सहा फेब्रुवारी १९३२चा तो दिवस.... कलकत्ता विद्यापीठाचा पदवीदान समारंभ होता. पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या आनंदाने भरलेले उत्साही वातावरण अचानक झाडलेल्या पिस्तुलाच्या आवाजाने थरारून गेले. समारंभाला आलेल्या एका तरुणीने पिस्तुल चालवले आणि तेही थेट बंगाल प्रांताचा गव्हर्नर स्टॅन्ले जॅक्सन याच्यावर! ती युवती भारतीय इतिहासात 'अग्निकन्या' म्हणून अजरामर झाली... तिचे नाव बीना दास.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलांनीही तसेच शौर्य दाखवले होते अन् त्यांपैकीच एक होती बीना दास. २४ ऑगस्ट १९११ रोजी बंगालच्या कृष्णनगरमध्ये जन्मलेली ही भारतीय अग्निकन्या तरुणपणी ब्रिटिशविरोधी मोर्चे, आंदोलनांमध्ये सहभागी होत असे; पण ब्रिटिशांची पाळेमुळे उखडून फेकायची, त्यांच्या मनात धडकी भरवायची तर केवळ मोर्चे काढून काम होणार नाही त्याकरिता सशस्त्र लढा दिलाच पाहिजे, याच विचारांनी बीना दास यांनी बंगालमधील छत्री संघ या सशस्त्र क्रांतिकारक संघटनेत सहभाग घेतला. त्या वेळी स्टॅन्ले जॅक्सन बंगाल प्रांताचा गव्हर्नर होता. याच स्टॅन्ले जॅक्सनचा वध करून सशस्त्र लढ्याची सुरुवात करण्याची योजना छत्री संघाने आखली.
सहा फेब्रुवारी १९३२ रोजी कलकत्ता विद्यापीठाचा पदवीदान समारंभ स्टॅन्ले जॅक्सनच्या उपस्थितीत पार पडणार होता अन् याच समारंभात सर्वांसमक्ष त्याचा वध करण्याची योजना होती. या समारंभात बीना दास यांनाही पदवी दिली जाणार असल्याने ही हत्या घडवण्याची जबाबदारी त्यांनीच उचलली. समारंभात आपल्या साडीत पिस्तुल लपवून न्यायचे आणि जॅक्सनची हत्या करायची अशी ती योजना होती. ठरल्याप्रमाणे समारंभाच्या दिवशी बीना दास यांनी पिस्तुल लपवून नेले. कार्यक्रमाचा मुख्य अतिथी असलेला गव्हर्नर स्टॅन्ले जॅक्सन भाषणाला उभा असतानाच बीना दास यांनी त्याच्यावर एकामागोमाग एक पाच गोळ्या झाडल्या. परंतु पिस्तुल चालवण्याचे कधीच प्रशिक्षण न घेतलेल्या बीना दास यांचा नेम चुकला. गोळ्या जॅक्सनला न लागता हवेत झाडल्या गेल्या आणि गव्हर्नर जॅक्सन सुखरूप वाचला.
बीना दास यांना तत्काळ अटक करण्यात आली आणि पुढे त्यांना नऊ वर्षे सश्रम कारावास भोगावा लागला. गव्हर्नर स्टॅन्ले जॅक्सनच्या हत्येची ही योजना अपयशी ठरली, तरी या घटनेने ब्रिटिश शासनाच्या मनात दहशत बसवण्याचे काम मात्र चोख केले. ब्रिटिश शासन मन मानेल तसा कारभार करून भारतीयांवर अन्याय करतच राहील अन् भारतीय तो निमूटपणे सहन करतील ही अपेक्षाच त्यांनी करणे चूक ठरणार होते. बीना दास यांची कारावासातून सुटका झाल्यानंतर पुढे त्यांचे ‘चले जाव’ चळवळीतही मोठे योगदान होते. परंतु कालौघात इतर सशस्त्र क्रांतिकारकांच्या बाबतीत जे घडले, त्यातून बीना दास यांचीही सुटका झाली नाही दुर्दैवाने बहुसंख्य भारतीय नागरिकांना आजही अशा हजारो क्रांतिकारकांचे स्मरण नाही. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अतिशय सामान्य आयुष्य व्यतीत करून २८ डिसेंबर १९८६ रोजी बीना दास यांचा हरिद्वारमध्ये मृत्यू झाला.
त्यांनी दाखवलेल्या शौर्यामुळे बीना दास यांना ‘अग्निकन्या’ हे नाव मिळाले. एका तरुणीने ब्रिटिश सरकारची उडवलेली झोप या अग्निकन्येला इतिहासात अजरामर करून गेली.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment