मेहनत, सातत्य आणि नवकल्पना ही उद्योगाच्या यशाची त्रिसूत्री

परभणीतील अमृत उद्योग कौशल्यवर्धन कार्यक्रमात उद्योगपती आनंद भगत यांनी केले मोलाचे मार्गदर्शन

मेहनत, सातत्य आणि नवकल्पना ही उद्योगाच्या यशाची त्रिसूत्री मुख्य फोटो
मेहनत, सातत्य आणि नवकल्पना ही उद्योगाच्या यशाची त्रिसूत्री अतिरिक्त फोटो

परभणी : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे परभणीमध्ये अमृत उद्योग कौशल्यवर्धन (ईडीपी) प्रशिक्षण कार्यक्रम सुरू आहे. त्याअंतर्गत प्रसिद्ध उद्योगपती आनंद भगत यांच्या परभणीतील कनिष्का कोरोगेटर्स या उद्योगाला भेट देण्यात आली. नवउद्योजकांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव, मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळावी हा या भेटीचा उद्देश होता. मेहनत, सातत्य आणि नवकल्पना ही यशाची त्रिसूत्री असल्याचे भगत यांनी या वेळी सांगितले.

या प्रशिक्षण कार्यक्रमात वीस लाभार्थी सहभागी झाले आहेत. त्यांना आनंद भगत यांनी उद्योजकतेच्या वाटचालीतील अनुभव, अडचणी व संधी याविषयी मार्गदर्शन केले. तसेच स्थानिक पातळीवर उद्योग उभारणीसाठी आवश्यक असलेली नियोजन प्रक्रिया, गुणवत्ता व्यवस्थापन आणि रोजगारनिर्मितीचे महत्त्व याबद्दल सविस्तर माहिती दिली. कच्च्या मालाची गुणवत्ता आणि कच्चा माल खरेदी प्रक्रिया या विषयांवरही त्यांनी सखोल माहिती दिली. उत्पादनाचा दर्जा हा कच्च्या मालाच्या गुणवत्तेवर थेट अवलंबून असतो. त्यामुळे उद्योगाच्या यशामध्ये कच्च्या मालाची गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची असून, योग्य पुरवठादारांची निवड, वेळेवर खरेदी, दर्जा तपासणी व खर्च नियंत्रण या बाबींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  आनंद भगत यांनी त्यांच्या औद्योगिक प्रवासातील यशस्वी टप्पे, सुरुवातीला आलेल्या अडचणी आणि त्यावर केलेल्या उपाययोजना असे अनुभव प्रशिक्षणार्थांना सांगितले. 

उपस्थितांना उद्योग पाहण्याची व प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून शंका निरसन करून घेण्याची संधी मिळाल्याने कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरला. ईडीपी कार्यक्रमामुळे तरुणांमध्ये स्वयंरोजगाराची आवड निर्माण होत असून भविष्यात अधिकाधिक यशस्वी उद्योजक घडावेत, अशी अपेक्षा अमृत संस्थेचे परभणी जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे यांनी व्यक्त केली. या वेळी अमृतमित्र अनंतराव जोगदंडदेखील उपस्थित होते.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/


Publisher: Anirudha Kate News publisher name | Date: 05-02-2026 News publication date | Time: 12:47 PM News publication time | Views: 1,535 Number of times this news has been viewed | District: parbhani Related district of the news
Publisher: Anirudha Kate News publisher name | Date: 05-02-2026 News publication date | Time: 12:47 PM News publication time | Views: 1,535 Number of times this news has been viewed | District: parbhani Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words