अडथळ्यांवर मात करून जिद्दीने खेळणारी जिम्नॅस्ट
दीपाचे पाय सपाट असल्याने ती कधी जिम्नॅस्ट खेळाडू होऊच शकणार नाही, असा निष्कर्ष तज्ज्ञ मंडळींनी काढला होता. परंतु जिम्नॅस्टिकमध्ये तिने चमकावे असे तिच्या वडिलांचे स्वप्न होते. आणि अडथळ्यांवर मात करत ती ऑलिंपिकमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला बनली.
दीपा कर्माकर हिचा जन्म ९ ऑगस्ट १९९३ रोजी आगरतळा इथे (त्रिपुरा) झाला. तिने वयाच्या सहाव्या वर्षी जिम्नॅस्टिक्सला सुरुवात केली. तिचे प्रशिक्षक होते विश्वेश्वर नंदी. जिम्नॅस्टिक क्लासमध्ये नोंदणीच्या वेळी दीपाचे पाय सपाट होते. अशा पायांमुळे खेळाडूला संतुलन राखणे, धावणे किंवा उडी मारणे यात अडचणी येतात. यावर मात करणे हे दीपा आणि तिच्या प्रशिक्षकांसाठी मोठे आव्हान होते. परंतु जिम्नॅस्टिकपटू व्हायचेच अशी मनाशी खूणगाठ बांधलेल्या दीपाने कठोर परिश्रमाने हे आव्हान पेलले. वडील दुलाल यांच्याकडे वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षण घेता घेता ती जिम्नॅस्टिकपटू कधी झाली हे तिच्या वडिलांनाही कळले नाही.
पाय सपाट असूनसुद्धा तिने जिम्नॅस्टिकसाठी अत्यंत कठीण प्रकार निवडला होता तो म्हणजे प्रोदुनोव्हा व्हॉल्ट. समोरच्या बाजूने उडी मारून दोन वेळा हवेत कोलांटी उडी घेऊन जमिनीवर परतताना दोन्ही गुडघे छातीजवळ घेऊन उतरायचे असा हा अवघड प्रकार होता. भलेभले खेळाडूही हा प्रकार करायला घाबरतात. २०१५मध्ये ग्लासगो वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिने हा प्रकार करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये दीपा जीव गमावेल किंवा मान तरी मोडून घेईल, अशी भीती तिच्या प्रशिक्षकाला वाटत होती. परंतु काही नवे करण्याच्या जिद्दीने पछाडलेली दीपा मागे हटली नाही. आणि तिने हा प्रकार यशस्वीरीत्या करून दाखवला.
२०१४मध्ये तिने राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. असे करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. त्याच वर्षी झालेल्या आशियाई स्पर्धेत ती चौथ्या स्थानावर राहिली. त्यानंतर आशियाई जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले. या विजयानंतर, २०१६मधील रिओ ऑलिंपिकमध्ये महिलांच्या व्हॉल्टिंगच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट ठरली. २०१८मध्ये तुर्कीतील मेर्सिन येथे झालेल्या FIG आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड चॅलेंज कपमध्ये व्हॉल्ट स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट होती. क्रीडा क्षेत्रातील तिच्या योगदानाबद्दल भारत सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न (२०१६) आणि पद्मश्री (२०१७) या पुरस्कारांनी तिला सन्मानित केले आहे.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment