डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या जन्मदिनानिमित्त (२ फेब्रुवारी) त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख...
समाजप्रबोधनासाठी जीवनभर अत्यंत निर्धारपूर्वक झटलेले व 'भारतीय जातिसंस्थेचा इतिहास' या आपल्या अत्यंत अभ्यासपूर्ण पुस्तकाने देशाबरोबरच पाश्चात्य जगातही मान्यता पावलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर. एक समाजशास्त्रज्ञ, विचारवंत आणि लेखक म्हणून ते लोकप्रिय ठरले हे खरे; पण ज्ञानकोशकार केतकर म्हणून ते विशेष प्रसिद्ध झाले. त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या व्यापक कार्याचा हा अल्पसा आढावा.
डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा जन्म २ फेब्रुवारी १८८४ रोजी झाला. रत्नागिरी जिल्ह्याच्या गुहागर तालुक्यातील अंजनवेल हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे वडील पोस्टमास्तर होते. नोकरीनिमित्त त्यांची बदली मध्य प्रांतातील रायपूर या गावी झाली. तेथेच वडिलांचे छत्र लहानपणीच नाहीसे झाल्यामुळे आईच्या मदतीने त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. ते अकरावीत असताना त्यांच्या आईचे निधन झाले. शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या श्रीधरपंतांनी अनेक हालअपेष्टांना तोंड देत उच्च विद्या संपादन केली. शिवाय शालेय जीवनात जोपासलेल्या वाचन, कविता करणे, इतिहास, वाङ्मय, राजकारण, रोमन कायदा यांत विशेष रस घेण्याचा फायदा त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यात झाला. त्यानंतर ते पुढील शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला गेले.
आपला शैक्षणिक खर्च भागवण्यासाठी त्यांनी इंग्लंड येथे काही नियतकालिकांत लेखन केले. त्या पैशांतूनही त्यांचा खर्च भागत नसे, तेव्हा ते दिवसातून एकदाच जेवत; पण आपले हे दैन्य त्यांनी इतरांना दाखवून दिले तर नाहीच; पण त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये याची खबरदारीही त्यांनी घेतली. ऑक्टोबर १९१२मध्ये उच्चविद्याविभूषित होऊन ते जेव्हा मायदेशी परतले तेव्हा त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. त्या काळी अनेक भारतीय लोक पदवी संपादून मायदेशी येत व बड्या पगाराची नोकरी मिळवून ऐषारामी जीवन जगत; पण डॉ. केतकर यांनी अनुकरण केले ते रँग्लर अप्पासाहेब परांजपे यांचे. त्यांनी त्यागपूर्वक जीवन जगण्याचा निर्धार केला होता. त्याच मार्गाने डॉ. केतकर गेले.
१९१३-१४च्या दरम्यान त्यांनी कलकत्ता विद्यापीठात पदवीधर विद्यार्थ्यांना राजकारण व अर्थशास्त्र शिकवण्याचे काम स्वीकारले खरे; पण त्यांच्या सत्यवादी बाण्यामुळे त्यांना ती नोकरी सोडून द्यावी लागली. कलकत्ता येथील वास्तव्यात त्यांनी 'इंडियन इकॉनॉमिक्स' हे पुस्तक लिहिले. हिंदू लॉ' या दुसऱ्या पुस्तकात त्यांनी अर्थकारण व समाजनियमन या दोन क्षेत्रांतील विचारांना चालना दिली. शिवाय सामाजिक, राजकीय विषयांवर अभ्यासपूर्ण लेख लिहून समाजमन जागृत करण्याचे काम केले. याच काळात त्यांनी ज्ञानकोशाच्या भव्य कार्यात स्वतःला अक्षरशः झोकून दिले. तोपर्यंत तेलुगू, बंगाली, हिंदी, गुजराथी, उर्दू यांसारख्या भारतीय भाषांत ज्ञानकोश तयार झाले होते. केतकरांनी मराठी ज्ञानकोशाचा ध्यास घेतला.
१९१५च्या ऑगस्टमध्ये त्यांनी सर्वप्रथम ज्ञानकोशाची कल्पना मांडली व आर्थिक अडचणींवर मात करून आणि असंख्यांचे सहकार्य घेऊन बारा वर्षांत त्यांनी हा ज्ञानकोश तयार केला. डॉ. केतकर यांनी मनाचा पक्का निश्चय करून ज्ञानकोशाचे कार्य पूर्ण करायचेच असा निर्धार केला, अनेकांनी त्यांच्या या कार्याविषयी शंका निर्माण केली; मात्र डॉ. केतकर यांनी आपल्या प्रचंड मेहनतीने हे अपूर्व व असामान्य काम बारा वर्षांत पूर्ण केले. त्यांच्या या अद्वितिय कार्याची पावती देऊन त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या 'श्रीधर व्यंकटेश केतकर' या नावाऐवजी त्यांना 'श्रीधर व्यंकटेश ज्ञानकोशे' असे संबोधून त्यांचा गौरव केला. १० एप्रिल १९३७ रोजी श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे निधन झाले.
(संकलित)
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment