अनंत बाळाजी भट ऊर्फ चिमाजी अप्पा उर्फ चिमणाजी अप्पा यांचा १७ डिसेंबर हा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, त्यांच्याविषयीची ही माहिती...
चिमाजी अप्पा यांचा जन्म १७०७ साली झाला. हे पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांचे पुत्र आणि बाजीराव पेशव्यांचे धाकटे भाऊ होते. त्यांनी महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी पोर्तुगीज वर्चस्वातून मुक्त करण्यासाठी यशस्वी मोहीम राबवली. त्यांनी दोन वर्षे झुंज देऊन वसईचा किल्ला जिंकला. साष्टी बेटांवर मराठ्यांची सत्ता स्थापन केली. वसईची लढाई ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाची मानली जाते. या कामगिरीसाठी चिमाजी अप्पांची नेमणूक झाली. त्यांनी आपल्या थोरल्या भावाचा विश्वास सार्थ ठरवला. या लढाईची कथाही तितकीच विस्मयजनक व नाट्यमय आहे.
१७ फेब्रुवारी १७३९ रोजी मराठ्यांनी चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली वसईवर चाल केली. चालून येत असलेली फौज पाहून पोर्तुगीजांनी आपली शिबंदी वसईच्या किल्ल्यात घेतली व वसईचा वेढा सुरू झाला. मराठ्यांनी शिताफीने पूर्ण किल्ल्याभोवती घेरा घातला व किल्ल्याची पूर्ण नाकेबंदी करून टाकली. अत्यंत चिकाटीने चालवलेल्या वेढ्यासोबतच त्यांनी किल्ल्यावर गनिमी काव्याने हल्ले चालू ठेवले. अशाच एका हल्ल्यात पोर्तुगीजांचा सेनापती सिल्व्हेरा दी मेंझेस मृत्युमुखी पडला. तरीही पोर्तुगीजांनी लढा चालू ठेवला आणि चालून येणार्या मराठ्यांच्या लाटांचा हातबाँब, बंदुका आणि उखळी तोफा वापरून प्रतिकार चालू ठेवला. वरचढ तंत्रज्ञान, अस्त्रे व शस्त्रांनी पोर्तुगीजांनी मराठ्यांचे बरेच नुकसान झाले. परंतु मराठ्यांनी आपला वेढा सैल होऊ दिला नाही.
इकडे आंग्र्यांच्या आरमाराने समुद्री मार्गही बंद केले होते आणि तेथूनही रसद मिळणे बंद झाले. शेवटी १६ मे १७३९ रोजी वेढा धसास लागला आणि मराठ्यांनी किल्ल्यावर एल्गार केला. चिमाजी अप्पांनी स्वतः पहिली तोफ डागली आणि नारो शंकर दाणी याच्या नेतृत्वाखालील घोडदळ आणि आंग्र्यांचे आरमार दोन्ही बाजूंनी पोर्तुगीजांवर तुटून पडले. तोफखान्याच्या सरदार गिरमाजी कानिटकराने किल्ला पुरता भाजून काढला आणि मानाजी आंग्र्याच्या बरकंदाजांनी बुरुजांवरून पोर्तुगीज शिपाई टिपून काढणे सुरू ठेवले. या भडिमारापुढे पोर्तुगीज बचावाने नांगी टाकली आणि त्यांनी मराठ्यांकडे शरणागती मागितली. शरण आले असतानाही आपल्या सैन्यास मानाने वाट काढून द्या, अशी विनवणी पोर्तुगीज सैनिकांनी केली. चिमाजींनी ती दिलदारपणाने मान्य केली. त्यामुळेच काही सैनिक दीव, दमणला तर काही गोव्याला पोहोचू शकले.
आपण स्वत: किंवा पुत्र सदाशिवरावभाऊ केव्हाही ‘पेशवा’ बनणार नाही, हे ठाऊक असूनही ते कायमच पेशवाईशी एकनिष्ठ राहिले. मराठ्यांच्या राजकारणाला उत्तराभिमुख बनवून मराठा साम्राज्यविस्ताराला चालना देण्यात बाजीराव पेशव्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते आणि चिमाजींचे सारे जीवितकार्य त्याला पूरक होते. आपल्या बंधूंप्रमाणेच राजकारण आणि रणांगण यांचा उत्तम मेळ त्यांनी साधला. चिमाजी अप्पा यांचे १७ डिसेंबर १७४१ रोजी निधन झाले.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment