वसंत कानेटकर

काही लेखक त्यांच्या अद्वितीय लेखनशैलीने कायम स्मरणात राहतात. असेच एक साहित्यिक म्हणजे वसंत कानेटकर. ३० जानेवारी हा त्यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांचा हा अल्प परिचय...

वसंत कानेटकर मुख्य फोटो
मुख्य फोटो

वसंत कानेटकर यांचा जन्म सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर या गावी २० मार्च १९२२ रोजी झाला. कानेटकरांनी १९४२-४३ मध्ये पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून बीए ही पदवी संपादन केली. उच्च शिक्षण घेत असताना कानेटकरांना वि. स. खांडेकर आणि कन्नड साहित्यिक व तत्कालीन विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राचार्य वि. कृ. गोकाक या दोन ज्ञानपीठ पुरस्कारविजेत्या साहित्यिकांचे मार्गदर्शन लाभले. या काळात मराठीतील गडकरी, फडके, खांडेकर, आपटे, केतकर या लेखकांच्या साहित्याचा आणि पाश्चात्य जगातील इब्सेन, शॉ आणि शेक्सपियर या नाटककारांचा कानेटकरांवर खोलवर प्रभाव पडला. १९४६मध्ये कानेटकर नाशिकमधील गोखले एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या एचपीटी आर्ट्स कॉलेजमध्ये मराठी व इंग्रजीचे व्याख्याते म्हणून रुजू झाले. पुढे त्यांना प्राध्यापक म्हणून बढती मिळाली आणि या संस्थेचे ते आजीव सदस्यदेखील झाले. 

शिकवत असतानाच त्यांनी लघुकथालेखक आणि कादंबरीकार म्हणून आपली लेखन कारकीर्द सुरू केली. १९५७मध्ये कानेटकरांनी 'वेड्याचे घर उन्हात' हे आपले पहिले नाटक लिहिले. त्यानंतर त्यांचे 'प्रेमा, तुझा रंग कसा?' हे एक हलकेफुलके विनोदी, खेळकर नाटक झाले. या नाटकाला अभूतपूर्व व्यावसायिक यश मिळाले व आजही ते त्यांच्या सर्वांत लोकप्रिय नाटकांपैकी एक म्हणून गणले जाते. कानेटकरांचे 'अश्रूंची झाली फुले' हे सर्वांत यशस्वी नाटक. ते एक सामाजिक, भावनाप्रधान नाटक होते. १९७३मध्ये कानेटकरांनी अध्यापनातून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि ते पूर्णवेळ व्यावसायिक नाटककार बनले. ५४ वर्षांच्या लेखन कारकीर्दीत त्यांनी तीन अंकी ४२ नाटके, चार कादंबर्‍या आणि अनेक एकांकिका, लघुकथा, चिंतनपर लेख, चित्रपट आणि टीव्ही मालिकांसाठी पटकथा लिहिल्या. त्यांची अनेक नाटके हिंदी व गुजराती भाषांमध्ये रूपांतरित झालेली आहेत. कानेटकरांनी आपल्या ऐतिहासिक नाटकांमध्ये महापुरुषांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि संवेदनांचा शोध घेतला. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयापासून ते छत्रपती संभाजीराजेंच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने महाराष्ट्रावर केलेली स्वारी या कालखंडावर आधारित पाच ऐतिहासिक नाटकांचे 'नाट्यपंचक' त्यांनी साकारले. ती पाच नाटके म्हणजे 'रायगडाला जेव्हा जाग येते,' 'इथे ओशाळला मृत्यू,' 'तुझा तू वाढवी राजा,' 'आकाशमिठी' आणि 'जिथे गवतास भाले फुटतात' ही होत. महाराष्ट्रातील अनेक प्रख्यात व्यक्तींच्या आयुष्यावर कानेटकरांनी चरित्रनाटके लिहिली. हिमालयाची सावली (धोंडो केशव कर्वे), वादळ माणसाळतंय (बाबा आमटे), विषवृक्षाची छाया (इतिहासाचार्य वि. का. राजवाडे), कस्तुरीमृग (हिराबाई पेडणेकर) आणि तू तर चाफेकळी (बालकवी ठोंबरे) ही ती नाटके आहेत. १९७१ मध्ये ते कुर्ला (मुंबई) येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ते निवडले गेले. १९७७ मध्ये त्यांना 'कस्तुरीमृग' या नाटकासाठी सर्वोत्कृष्ट नाटक व सर्वोत्कृष्ट नाटककार असे कलादर्पण पुरस्कार मिळाले. त्यांना संगीत नाटक अकादमीने १९८४ साली सर्व भारतीय भाषांमधील सर्वोत्कृष्ट नाटककार म्हणून गौरवले आहे. १९८८मध्ये ठाण्यात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे १९९० साली महाराष्ट्र गौरव आणि भारत सरकारतर्फे १९९२मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

३० जानेवारी २००१ रोजी वसंत कानेटकर यांचे नाशिकमध्ये निधन झाले. त्यांना शतश: नमन!

(संकलित)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 30-01-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 70 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 30-01-2026 News publication date | Time: 10:55 AM News publication time | Views: 70 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words