इरावती कर्वे

प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ आणि लेखिका इरावती कर्वे यांचा १५ डिसेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने, त्यांच्याविषयीचे हे टिपण...

इरावती कर्वे मुख्य फोटो
मुख्य फोटो

इरावती (करमरकर) कर्वे यांचा जन्म १५ डिसेंबर १९०५ रोजी झाला. त्या एक प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ आणि लेखिका होत्या. त्या महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या स्नुषा आणि फर्ग्युसन महाविद्यालयाचे माची प्राचार्य दि. धों. कर्वे यांच्या पत्नी होत्या. त्यांचा जन्म ब्रह्मदेशात एका मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबात म्यिंजान येथे झाला. त्यांचे वडील त्या वेळी तेथे अभियंता म्हणून काम करत होते. इरावतीबाईंचे बीएपर्यंतचे शिक्षण पुण्यात झाले. त्या वेळी त्यांना रँग्लर र. पु. परांजपे यांचे बहुमोल साह्य लाभले. पुढे त्यांनी डॉ. घुर्ये यांच्या मार्गदर्शनाखाली ‘चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण’ या विषयावर प्रबंध लिहून एमए पदवी मिळवली व पुढील शिक्षणासाठी त्या जर्मनीला गेल्या.
‘मनुष्याच्या डोक्याच्या कवटीची नेहमीची असमप्रमाणता’ या विषयावर प्रबंध लिहून बर्लिन विद्यापीठातून त्यांनी पीएचडी पदवी प्राप्त केली. तेथे असताना त्यांचा दि. धों. कर्व्यांशी परिचय झाला व त्याचे विवाहात रूपांतर झाले. काही वर्षे त्यांनी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठात कुलसचिव म्हणून काम केले. १९३९मध्ये पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये समाजशास्त्र व मानववंशशास्त्र या विषयांच्या प्रपाठक म्हणून त्यांची नेमणूक झाली. या विभागाच्या त्या अखेरपर्यंत विभागप्रमुख होत्या.
इरावतीबाईंनी मानववंशशास्त्र, समाजशास्त्र व मानसशास्त्र या विषयांत विपुल संशोधन केले. त्यांचे सुमारे ८० संशोधनपर निबंध प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या ग्रंथांपैकी हिंदू सोसायटी – ॲन इंटरप्रिटेशन (१९६१), किन्‌शिप ऑर्गनायझेशन इन इंडिया (१९५३), महाराष्ट्र लँड अँड पीपल (१९६८) हे इंग्रजी व परिपूर्ती (१९४९), भोवरा, मराठी लोकांची संस्कृती (१९५१), युगान्त (१९६७) हे मराठी ग्रंथ महत्त्वाचे आहेत. यांतील बहुतेक इंग्रजी ग्रंथाना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. युगान्त या महाभारतावरील चिकित्सक ग्रंथाला साहित्य अकादमी आणि महाराष्ट्र शासन यांचा पुरस्कार लाभला. याशिवाय त्यांनी इंग्रजी व मराठी नियतकालिकांतून स्फुट लेखनही केले. त्या १९४७ मध्ये दिल्लीच्या सायन्स काँग्रेसच्या मानवशास्त्र विभागाच्या अध्यक्षा होत्या. त्यांच्या मानववंशशास्त्रातील संशोधनामुळे त्यांची १९५५मध्ये लंडन विद्यापीठात व्याख्यात्या म्हणून एक वर्षाकरिता नियुक्ती झाली. त्याच साली प्रागैतिहासिक सकल आफ्रिकी काँग्रेसमध्ये त्यांनी भारत सरकारचे प्रतिनिधित्व केले. वयाच्या पासष्टाव्या वर्षी, ११ ऑगस्ट १९७० रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे पुण्यात निधन झाले.

(संकलित माहिती)

Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 15-12-2025 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 104 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news
Publisher: Kaumudi Paranjape News publisher name | Date: 15-12-2025 News publication date | Time: 12:00 AM News publication time | Views: 104 Number of times this news has been viewed | District: nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words